बीड (रिपोर्टर)- बीड शहरातील बशीरगंज, जालना रोड, पांगरी रोड, शाहूनगर, बार्शी रोड, तेलगाव नाका यासह अन्य परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आढळून येतात. ही जनावरे रस्त्यामध्येच बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता असून याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेऊन जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीड शहरात विविध भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असतानाच आता मोकाट जनावरांचीही संख्या जिथे तिथे दिसून येऊ लागली आहे. शहरातील बशीरगंज, भाजी मंडई, पांगरी रोड, जालना रोड, शाहूनगर, बार्शी रोड, नगर रोड यासह अन्य परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरे दिसून येतात. जनावरे रस्त्यामध्ये बसत असल्याने याचा त्रास वाहनधारकांना होऊ लागलाय. नागरीक ही जनावरे शहरामध्ये मोकाट सोडून देतात, या जनावरांचा नगरपालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जाऊ लागलीय.