मॅराथॉन अग्रलेख भाग-3
गांधींचे तुकोबा
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत, लिहित आलो आहोत, या विश्वातल्या प्रत्येक देशाला केवळ भूगोल आहे, मात्र भूतलावरच्या अखंड हिंदुस्तानला भूगोलाबरोबर जाज्वल्य, धगधगता आणि सुवर्ण अक्षरात लिहिला गेलेला इतिहास आहे. अखंड हिंदुस्तानातले प्रत्येक राज्य आपआपल्या जाज्वल्य इतिहासाची जेव्हा साक्ष देतात तेव्हा या भारतात जन्मलेला प्रत्येक नागरीक किती श्रीमंत आहे हे स्पष्ट होते. सत्ताकारणाच्या इराद्यात इथं संत महात्म्यांसह क्रांतीकारक समाजसुधारकांचे कर्तव्य-कर्म झाकण्याचा प्रयास होत असला तरी त्या महात्म्यांसह समाज सुधारकांचे कर्तव्य-कर्म हिर्यासारखे चमकत राहतात. तेच गांधींचे कर्तव्य कर्म आज देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर चमकतायत. मोहन करमचंद गांधी ते महात्मा हा प्रवास करताना महात्मा गांधींवर कोणाच्या विचाराचा पगडा असेल, तो विचार सौराष्ट्राचा असेल की महाराष्ट्राचा असेल असे एक ना अनेक प्रान जेव्हा पडतात तेव्हा महात्मा गांधींवर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचाराचा पगडा अधिक असल्याचे आपल्याला पहावयास मिळते. आम्ही सातत्याने लिहितो, जागतिक शांतीचे दूत भगवान बुद्धानंतर आम्हाला जगद्गुरू तुकोबा दिसतात आणि त्यानंतर आम्हाला दिसतात ते महात्मा गांधी. या देशाचा इतिहास संत-महंत-सुफींपासून समाज सुधारकांपर्यंत पहाताना हा देश किती पावन,
पावन देश कोणता?
हा प्रश्न जेव्हा ुपस्थित केला जातो तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार जेथे हरीचे दास जन्म घेतात तो पावन देश. तुकोबा म्हणतात, पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म-धर्म त्याचे झाला नारायण, त्याचेनी पावन तिन्ही लोका’ या अभंगातून गांधींच्या सौराष्ट्राचे आणि तुकोबांच्या महाराष्ट्राचे दर्शन नक्कीच होईल. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र हे दोन्ही प्रदेश अती पावन. संतांची मांदियाळी दोन्हीकडे बहरली. गांधीजी सौराष्ट्रातलेच. दुदैर्व हे की सौराष्ट्रातली जातीची उतरंड अजूनही पूर्णपणे ढळलेली नाही. महाराष्ट्रात अशी एकही जात नव्हती ज्यात त्याकाळी एकही संत झाला नाही. तुकोबांनी आपल्या अभंगात या संतांची जातवार यादीच दिली आहे. हा एक सामाजिक दस्तावेजच आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या बहिणाबाईंच्या अभंगा इतकाच मोलाचा. तुकोबा ज्यांना समजले त्याने स्वकर्तृत्वात कर्तव्य कर्माचे झेंडे फडकवले हे त्रिवार सत्य नाकारता येणार नाही.
गांधींचे तुकोबा
हे तेव्हाच लक्षात आले जेव्हा येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधींनी जगद्गुरू संत तुकोबांच्या गाथेतले 16 अभंग इंग्लिशमध्ये भाषांतर केले. 10 ते 28 ऑक्टोबर 1930 दरम्यान गांधी कारागृहात होते. या अठरा दिवसांच्या कालखंडात 16 अभंगांचे भाषांतर तर त्यांनी केलेच परंतु गांधींना अवघी गाथा भाषांतरीत करायची होती, मात्र तेवढा पुरेसा वेळ गांधींना मिळाला नाही. परंतु नागपूरचे डॉक्टर इंदूभूषण भिंगारे आणि कृष्णाराव देशमुख लेखकांनी संपादीत केलेला इ.स. 1945 मध्ये श्रीसंत तुकारामांची राष्ट्रगाथा हा ग्रंथ जेव्हा प्रकाशीत झाला तेव्हा या ग्रंथाला स्वत: महात्मा गांधींनी प्रस्तावना लिहिली. त्यात गांधींनी तुकाराम मुझे बहोत प्रिय है, असे नमूद करत त्या संग्रहाच्या मुखपृष्ठासाठी तेव्हाचे प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांना खास विनंती केली होती. गांधींच्या आग्रहामुळे बोस यांनी त्या पुस्तकासाठी चित्र काढले होते. गांधींच्या आणि तुकोबांच्या जवळकीबाबत भाष्य करताना
गांधींच्या तीन
माकडांचा जन्म
दखलपात्र म्हणावा लागेल. वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका हे सांगणारे तीन माकडे दिसले की, तुम्हा-आम्हाला गांधींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. परंतु हे माकडे किवा या माकडांची संकल्पना गांधीजींच्या डोक्यात कुठून आली असावी, तेव्हा तुकोबांच्या एका अभंगाचा दाखला येथे द्यावासा वाटतो. तुकोबांचं एक अभंग आहे ‘पापाची वासना नको दावू डोळा, त्याहून आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करूनी ठेव देवा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याजहुनी मुका बराच मी, नको मज परस्त्री संगती, जणातून माती उठता भली’ हा अभंगही वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, आणि वाईट पहायचं नाही, हे स्पष्टपणे सांगतो. याचाच अर्थ 16 ऑक्टोबर 1930 रोजी महात्मा गांधींनी स्वत:च्या मुलाला लिहिलेल्या पत्रात या अभंगाचा उल्लेख आढळतो आणि येरवडा कारागृहात याच अभंगाचे भाषांतर जाल्याचे दिसून येते. तेव्हा गांधीजींचे तीन माकडे हे तुकोबांच्या गाथेतून आल्याचे दिसून येते. गांधींनी जे अभंग भाषांतरीत केले त्या सोळाही अभंगांचे महत्व तेवढेच मोठे आहे. मग त्यामध्ये जे काय रंझले गांजले हा अभंग असेल, अथवा नाही संतपण मिळते ही हाती, हिंडता कपाटी रानेवणी, अथवा वेद आनंत बोलला, अर्थ इतकाच शोधला पुण्य परोपकार पाप ती परपिड या अभंगांसह जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती, हे अभंग जर पाहितले तर गांधींवर तुकोबांचा प्रभाव किती होता हे जाणून घेता येते.
‘चले जाव’
करेंगे या मरेंगे, हे राम अशा साध्यासुध्या शब्दांना या देशात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. चले जाव या वाक्यात आणि करेंगे या मरेंगे या निर्धारात अखंड भारताच्या पारतंत्र्याचा अस्त अन् स्वातंत्र्याचा उदय दिसून येत असायचा. हे तिन्ही वाक्ये साधासुधा आणि हरकुडा असलेल्या अहिंसेच्या वीराचे आहेत आणि तो वीर जगद्गुरू संत तुकोबांच्या प्रभावाखाली आहे, तेव्हा भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी, हे सांगणारे तुकोबा नक्कीच तुमच्या-आमच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत, आपल्या मराठी मनावर कळत न कळत असे काही संस्कार होत असतात पण ते रिसवण्या आणि पचवण्याआधी तो संस्कार कापरासारखा उडून जातो, परंतु गांधीजींनी तुकोबारायांचे संस्कार कसे पचवले होते ते समजून घेण्याचा सोपा मार्ग गांधींनी तुकोबांच्या 16 अभंगांचे भाषांतर वाचण्याचा गांधींच्या भाषांतरात साहेबांच्या भाषेचा, त्या भाषेचा संपुर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा न होता तुकोबांचे विचार जशास तसे वाचकांपर्यंत पोहतात. लेखक आणि भाषांतरातले असे योग्य आणि स्पष्ट भाषांतरीत लिखान क्वचीत पहायला मिळते, ते तुकोबा आणि गांधी या दोन वैष्णवांमध्ये तुम्हा-आम्हाला पहायला मिळाले. गांधी जयंतीनिमित्त आम्ही महात्मा गांधींचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा इथे नक्कीच प्रयत्न केला. हा पैलू मांडतानाच जगद्गुरू संत तुकोबांचे महाराष्ट्रातल्या अन्य समाजसुधारक क्रांतीकार्यांवर तेवढाच प्रभाव होता हे आम्ही सांगण्यापेक्षा इतिहासाचे दाखले दिले तर ते अधिक बरे होईल, म्हणून
तुकोबा, टिळक, गांधी
इथे मांडावे लागतील. गांधी आणि टिळक हे दोन टोके असल्याचे सातत्याने सांगण्यात येते. मात्र हे दोन्ही टोके जगद्गुरू संत तुकोबांच्या विचार छत्राखाली येतात हेही तेवढेच खरे. ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका’ नावाचं सदाशिव विनायक बापट यांचं पुस्तक आहे. त्यात 1917 सालच्या आठवणींमध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘आश्रमाची सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असता निम्या वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चालले आम्हास भेटले. भगवद्भक्त श्री तुकोबाप्रमाणे ती शांत वैराग्यमूर्ती डोक्यास गुजराथी पांढरे पागोटे घालून अंगात खादीचा अंगरखा घातलेली अनवाणी येत असलेली आम्ही दुरून पाहिली‘.लोकमान्यांच्या प्रभावात असलेल्या बापटांचे हे निरीक्षण आहे, हे विशेष. वास्तविक टिळकवादी बड्या नेत्यांनी गांधीजींना कधीच आपले मानले नाही. उलट राष्ट्रीय लढ्याचे केंद्र पुण्यातून हलले याविषयी कायम हळहळ व्यक्त केली. त्यात ब्राह्मण बहुजन असा संघर्षाचाही एक पदर होता. त्यातून मग गांधीजींवर विखारी टीका झाली. असं असलं तरी गांधीजींना टिळकांविषयी प्रचंड आदर होता. आपल्या महाराष्ट्रयात्रेचे वर्णन करताना त्यांनी लिहिलं आहे, जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला. आधुनिक युगाचे नायक असलेले शिवाजी महाराजांची जी भूमी आहे. जिथे तुकारामांनी आपले कार्य केले. ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे महाराष्ट्राने एकदा ठरवलं की तो कोणतीही अशक्य गोष्ट वास्तवात उतरवू शकतो, असं मी नेहमीच म्हणतो. वादाचे, कार्यपद्धतीतले फरक असले तरी टिळक आणि गांधी या दोन्ही महापुरुषांमधले अद्वैतही आगळे होते. त्यामुळेच तर टिळकांच्या नेतृत्त्वाची धुरा गांधीजींनी यशस्वीपणे खांद्यावर घेतली. दोघांच्याही तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान श्रीमद्भगवद्गीताच होते. गांधीजींवर तुकारामांचा प्रभाव होता. टिळकांवरही तो होताच होता. गीतारहस्याची सुरुवात तुकोबांच्याच अभंगाने झाली आहे. गीतारहस्यात तुकोबांचे एकूण 23 अभंग आहेत. टिळक आणि गांधी उपकारे देह कष्टवणार्या या दोन विभूती होत्या. हे सर्व आजच्या पिढीसाठी सचीन परब यांनी अधिक उलगडून यापुर्वीच मांडले आहे. यातून जगद्गुरू संत तुकोबा आणि गांधी या वैष्णवांचे दृढ नाते आणि महात्मा होण्यासाठी गांधींवरचा विचाराचा प्रभाव लक्षात येतोच. (समाप्त)