एकनाथ शिंंदे गटाचे नाव ठरले
‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देणार
बंडखोर आमदारांचे पोलीस संरक्षण काढल्याचा एकनाथ शिंदेंचा आरोप
कुठल्याही आमदाराचे संरक्षण काढले नाही -गृहमंत्री
मुंबई/पुणे/औरंगाबाद (रिपोर्टर) महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता मुद्दयावरून गुद्यावर येत आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयाला लक्ष्य करत शिवसैनिक तोडफोड करत असून आज पुण्यातील कात्रज भागात असलेल्या तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची एकीकडे तोडफोड केलेली असताना दुसरीकडे औरंगाबादेतही शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचा दिसून आला. त्याठिकाणी आमदार भुमरेंच्या पोस्टरला काळे फासण्यात आले आहे. आता थेट आव्हानात्मक इशारे आणि रस्त्यावरच्या लढाईला शिवसैनिक तयार झाल्याचे सांगण्यात येते असून ठिकठिकाणी ते रस्त्यावरही उतरत आहेत.
पुण्यातील बालाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे औरंगाबादेतही शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. औरंगाबादमध्ये लावण्यात आलेल्या आमदार भुमरे यांच्या पोस्टरला शिवसैनिकांनी काळे फासले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील बंडखोर विरुद्ध शिवसैनिक हा संघर्ष आता मुद्यावरून गुद्यावर येत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील शहरात पोलीस शिवसैनिकांकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येते.
गटाच्या नावाची आज
घोषणा होण्याची शक्यता
शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बंडखोर आमदारांच्या गटावर आक्रमक होत हिम्मत असेल तर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, असं म्हटल्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटाने आपल्या गटाचं नाव ठरवलं असल्याचे विश्वसनीय वृत्त असून शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव आपल्या गटाला एकनाथ शिंदे देणार असल्याचे सांगण्यात येते.
या नावाची घोषणा आज संध्याकाळी
होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण!
ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झालं आहे, असं एकनाथ शिंदेंनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
बंडखोरी केलेले शिवसेना आमदार आणि अपक्ष यांचं पोलीस संरक्षण राज्य सरकारने काढून घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमवीर आता राज्य सरकारकडून त्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच ट्विटरवरून यासंदर्भात खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस विभागाला पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिलेल्या स्पष्टीकरणात असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.