देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी देशाची अवस्था हालकीची होती. इंग्रजांचं राज्य होतं. जेव्हा दुष्काळ पडत होते. तेव्हा लोक अन्न, अन्न करत होते. दुष्काळात इंग्रजी सत्ता कुठलीही ठोस भुमिका घेत नव्हती. लोकांचे अन्नाविना हाल होत होते. भुकेपायी लोकांचा मृत्यू होत होता. मुळात शेतीचं उत्पन्न मर्यादीत निघत होतं. त्यामुळे अन्नाची टंचाई निर्माण होत होती. धनीक लोक मात्र मजेत असायचे. लोकांना खायला मिळाले पाहिजे याचा विचार करणारा शास्त्रज्ञ म्हणुन ज्यांचं नाव घेतलं जातं ते एम.एस स्वामीनाथन, त्यांनी संशोधनातून बदल घडवण्याचा विडा उचलला. परदेशातील नौकरी सोडून देशासाठी आणि येथील जनतेसाठी काही तरी करायचं याचा ध्यास मनात धरुन त्यांनी शेतीत बदल घडवला. भुकेला मुक्ती देण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांनी आपलं स्वप्न साकार करुन दाखवलं. हारीतक्रांतीतून देशात धान्याच्या रुपाने सोनंं उत्पादीत करण्यात आलं. याचं सगळं श्रेय स्वामीनाथन यांना जातं. 1900 वे शतक संपल्यानंतर या शतकात चांगलं काम करणार्या जगातील वीस लोकांची यादी जागतीक पातळीवरील टाईम्स या साप्ताहिकाने 1999 साली प्रसिध्द केली होती. त्यात भारतातील तीन व्यक्तीचा समावेश होता. एक महात्मा गांधी, दुसरे, रविंद्रनाथ टागोर, तिसरे स्वामीनाथन, इतक्या मोठ्या उंचीचे स्वामीनाथन होते.
दुष्काळाने हाहाकार
1942-43 मध्ये बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. या दुष्काळात सर्वत्र हाहाकार माजला. लोकांच्या घरात अन्नाचा दाणा नव्हता. अन्नावाचुन माणसं तडफडू लागली. विहीरी, तलाव, नद्या, कोरडया पडल्या. हिरवी शेत ओसाड झाली. जनावरे चार्याविना मरु लागली. मरण यातनांनी त्रस्त असलेले शेतकरी शहराकडे जाऊ लागले. गावचे गावे ओसाड पडू लागले. कलकत्ता शहराच्या रस्त्यावर हाडाचे सापळे झालेले माणसं दिसू लागले. अन्ना वाचुन तडफडून मरणारी माणसं कोलकत्ता शहराने पाहिले. जगण्यासांठी महिलांवर देहविक्रीची वेळ आली. या दुष्काळात व्यापारी सर्वसामान्यांना लुटत होते. व्यापारी आणि ब्रिटीश सरकार यांची मिलीभगत होती. नरसंहारक दुष्काळाने तीस लाख लोकांचा बळी घेतला. व्यापार्यांनी दीडशे कोटी रुपयांचा फायदा लुटला. दुष्काळाच्या बातम्या वृत्तपत्रात येत होत्या. ह्या बातम्या वाचून स्वामीनाथन अस्वस्थ होत होते. शेतात अन्नधान्य वाढवल्याशिवाय हे थांबणार नाही याचा विचार ते करत होते. त्यांनी ठाम निर्धार केला. भुकेला कायमचं मुक्त करण्यासाठी आपणच काही तरी केलं पाहिजे!
#देशासमोरील मोठंं आव्हान
1948 सालच्या जानेवारीत पं. नेहरु शेती शास्त्रज्ञांंच्या भेटीसाठी भारतीय शेती संशोधन परिषद या संस्थेत आले. पंडीतजींना ऐकायला मिळणार असल्यामुळे स्वामीनाथन यांनी या बैठकीला चहापाणी देण्याचं काम स्विकारलं. विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांचे कान आतूर झाले होते, भुकेल्यासाठी भाकरीच परमेश्वर असते. नौखालीमध्ये बापू म्हणाले होते. यापुढे आपल्याला ब्रिटीशांनी दिलेला दुष्काळाचा वारसा गाडून टाकायचा. इतर कुठल्याही बाबतीत चालढकल खपुन जाते. शेतीमध्ये मात्र सवड घेताच येत नाही. असे उदगार काढून पंडित नेहरु यांंनी शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी उपाय सुचवायचं आवाहन शास्त्रज्ञांना केलं. जनुकशास्त्रज्ञ व पीक पैदासकार म्हणाले आधुनिक बियाणं वापरलं तर वीस टक्क्यांनी उतारा वाढेल. कीटकशास्त्रज्ञांनी कीटकनाशक फवारणी व उंदिरांचा बंदोबस्त केल्यास पंचवीस टक्क्यांनी उत्पादन वाढीची खात्री दिली. मृदशास्त्रज्ञांनी खताची मात्रा योग्य देऊन तीन टक्के वाढीचं भाकीत वर्तवलं. विविध शास्त्रज्ञांचा सल्ला ऐकल्यांवर पंडीत नेहरु म्हणाले. याचा अर्थ शेतीचं उत्पादन वाढवणं खुपचं सोपं आणि आवाक्यातलं आहे. मला केवळ दहा टक्के उत्पादन वाढ साधून दिलीत तरीही मी समाधानी असेल. नेहरुंच्या या बोलण्यातून स्वामीनाथ यांच्या मानात बदल घडवून आला.
#रासायनिक खताची निर्मीती
शेतीतील उपन्न वाढवण्यासाठी बदल करावे लागणार होते. नवं संशोधन निर्माण करावे लागणार होते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा म्हैसुरजवळ रासायनिक खताचे कारखाने होते. 1954-55 मध्ये देशभरात खत वापराची चाचणी झाली. खताविषयी शेतकर्यात जागृकता निर्माण करण्यात आली. रासानिक खताबाबत शेतकरी तितके अग्रेसर नव्हते. खताबाबत नकारात्मक सुर होता. ज्यांनी खत टाकणं सुरु केलं. त्यांच्या शेतीत उत्पन्न वाढू लागलं. हळूहळू बदल घडू लागले. खत वापरणार्या शेतकर्यांची संख्या वाढत गेली. देशात खत उत्पन्नाने जोर धरला. 1960 ते 1980 मध्ये धान्याचे उत्पन्न वाढले. 1961-62 मध्ये खताचा वापर दोन लाख टन होता. त्यावेळी धान्य उत्पादन साडेसात कोटी टन होते. 1995-96 मध्ये खताची गरज एक कोटी सत्तर लाख टन झाली. धान्य उत्पन्न सतरा कोटी टन झाले. खतामुळे हरित क्रांतीचा जन्म झाला.
#गव्हाची नवीन जात
1940-1950 च्या दशकात जगभरातील अनेक राष्ट्रात धान्यांची कमतरता होती. 1942 साली मेक्सिकोमध्ये गरजेपेक्षा निम्मंच उत्पादन व्हायचं, पन्नास टक्के गहू, मका, आयात होत असे. त्यावेळी मेक्सिकोमध्ये कृषी वैज्ञानिकांची वानवा होती. त्यानूसार 1943 साली वनस्पतीशास्त्रज्ञ, कीटकनाशक शास्त्रज्ञ, मातीशास्त्रज्ञ, पीक पैदास शास्त्रज्ञ मेस्किोमध्ये अभ्यासाठी आले. त्या गटामध्ये काही महिन्यांनी डॉ. नॉर्मल बोरलॉग सामील झाले. गव्हाचं उत्पादन कमी येण्यामागील सर्व शास्त्रीय कारणांचा या मंडळींनी शोध घेतला. सर्व शाखामध्ील शास्त्रज्ञांनी एकत्र प्रयत्न चालू केले. संशोधन प्रकल्पात नव्या पिढीतील वैज्ञानिकांना घेतलं. गव्हाचं उत्पादन वाढवणं ही त्या वेळी जगभरातील सर्व राष्ट्रांची समस्या होती. नवीन जातीची पैदास करण्यासाठी अनेक देशातील गव्हांच्या जातीचे नमुने आणुन डॉ. बोरलॉग यांनी त्यांच्यातील गुणांचा अभ्यास केला. अमेरिका, कॅनडा, अर्जेटिना, ऑट्रेलिया, जपान, आफ्रिकेतून आणलेल्या जातींचा संकर करुन बहुगुणी गव्हाची जात तयार करण्याचे प्रयोग चालत होते. जपान मधील नोरिन या खुज्या जातीमध्ये खुजेपणा आणण्यासाठी तीन प्रमुख जनुक जबाबदार होते. तिन्ही जनूक असल्यास दीड फुट उंचीचे तर एकच जनुक असल्यास तीन फुट उंचीचे गव्हाचे रोप तयार होत असे. डॉ. बोरलॉग यांनी नोरिन जातीमधील खुजेपणाचा जनुक वेगळा केला आणि मेक्सिकन व कोलंबियन गव्हाच्या जातीमध्ये मिसळून नवीन जातीची पैदास केली. या प्रयोगातून भरघोस उत्पादन देणारी गव्हाची खुजी जात बोरलॉग यांनी विकसीत केली. त्या वाणामुळे मेस्किकोत दर एकरी उत्पादन चौपटीनं वाढलं.
#थेट शेतीत प्रयोग केले
1954 मध्ये केंद्रीय भात संशोधन केंद्रात वनस्पती शास्त्रज्ञपदी स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. भारतामध्ये हजारो वर्षापासून गहू पिकवला जातो. मोहेजोंदारोच्या उत्खन्नात ट्रिटिकम अॅस्टेव्हिअम उपजाती स्कॅरोकोकुम या गव्हाचे दाणे सापडले होते. नावाप्रमाणे दाणे गोल आकाराचे आणि रोप खुज असे. गव्हाची उत्पादकता वाढवण्यासाठी चिकित्सक अभ्यास 1905 नंतर सुरु झाला. जागतीक पातळीवर बोरलॉग यांनी गव्हाच्या जातीचं संशोधन केले. त्यांचं संशोधन यशस्वी ठरलं. बोरलॉग यांच्या प्रयोगाची माहिती स्वामिनाथन यांना होती. 1962 सालच्या मार्चमध्ये बोरलॉग यांनी पाठवलेल्या वाणाची चाचणी भारतीय शेती संशोधन परिषदेत घेतली. उंची कमी करुन ओब्यांची लांबी वाढवण्याची कल्पना साकार झाली. शास्त्रज्ञ खुष झाले. बोरलॉग यांनी भारतीय शेतीला भेट देऊन मार्गदर्शन केलं. नवीन सुधारीत वाणांचा प्रयोग थेट शेतीत करण्यात आला. दीडशे ठिकाणी प्रयोग करण्यात आले. प्रयोगासाठी शेतकर्यांना बियाणं देण्यात आले. गहू पारंपारीक पध्दतीने न पेरता दोन बियात अंतर ठेवून पेरला. यामुळे उत्पन्न तिपटीने वाढलं. यशस्वी प्रयोगामुळे सगळेच समाधानी झाले. या प्रयोगामुळे हेक्टरी चाळीस ते पन्नास क्विटंल गहू उत्पादीत झाला. मेस्किकोहून आलेलं गव्हाचं बियाणं संकरीत नव्हतं. मुळ स्वरुपात सुधारीत होतं. नवीन बियाणाचं वाण सर्वत्र लागवडीसाठी देण्यात आलं. विशेष करुन छोटया शेतकर्यांना दिलं गेलं. या नवीन वाणाची उत्सुकता सगळ्यांनाच होती. कृषीराज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे, कृषीमंत्री सुब्रण्यम व पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री हे नवीन वाणाच्या गव्हाची पाहणी करायला थेट शेतात जायचे. स्वामीनाथन यांच्या अथक परिश्रमातून हे सगळं होऊ शकलं. गव्हाचं उत्पादन वाढल्याने लोकांना 1977 साली राशनवर गहू उपलब्ध करुन देण्यात आला. भुकेल्या लोकांना भरपूर अन्न मिळून देण्याची किमया स्वामीनाथन यांच्यामुळे झाली, ते देशातील भुकमुक्तीचा दाता ठरतात. स्वामीनाथन यांनी आयुष्यभर शेतीतासाठी काम केले. शेती परवडत नसल्याने त्यांनी केंद्र सरकारला काही सुचना केलेल्या आहेत. त्यात प्रमुख सुचना आहे की, उत्पादीत खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळाला पाहिजे. शेतकर्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी अशी मागणी सतत होत असते. मात्र त्याची दखल आज पर्यंत घेतली गेली नाही. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणं हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.