Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeराजकारणनगर पंचायतीसाठी नेत्यांनी हाबुक ठोकला उद्या बीड जिल्ह्यातील केज,आष्टी,पाटोदा,शिरूर आणि वडवणी नगर...

नगर पंचायतीसाठी नेत्यांनी हाबुक ठोकला उद्या बीड जिल्ह्यातील केज,आष्टी,पाटोदा,शिरूर आणि वडवणी नगर पंचायतीसाठी आरक्षण सोडत


बीड (रिपोर्टर):- राजकीयदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, केज,वडवणी नगर पंचायतीसाठी आरक्षण सोडत उद्या होत असून या पाचही नगर पंचायती आपल्या ताब्यात याव्यात यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाच्या नेत्यांनी आत्तापासूनच कंबर कसली असून आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये विद्यमान भाजपाचे आ.सुरेश धस, राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे हे आपली प्रतिष्ठापणाला लावणार आहेत. तर ईकडे केजमध्ये खासदार रजनीताई पाटील, भाजपाचे रमेश आडसकर, आ.मुंदडा यासह राष्ट्रवादीचे नेते आपली ताकद आजमावणार आहेत. तर वडवणीत आंधळे, मुंडे आणि सोळंके आपली ताकद या निवडणूकीत लावणार असल्याने उद्याच्या आरक्षण सोडतीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार केज, आष्टी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी या पाच नगर पंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच आयोगाकडून घोषीत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला प्रवर्गासाठी आरक्षित वार्ड यासाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. केज नगर पंचायतसाठी तहसील कार्यालय केज, आष्टी नगर पंचायतसाठी तहसील कार्यालय आष्टी, पाटोदा नगर पंचायतीसाठी पाटोदा तहसील कार्यालय, शिरूर कासार नगर पंचायतसाठी शिरूर तहसील कार्यालय आणि वडवणी नगर परिषदसाठी वडवणी येथील तहसील कार्यालयात दुपारी 3 वाजता संबंधित विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे आरक्षण सोडत करण्यात येणार आहे. त्यामुळे हे आरक्षण सोडत झाल्यावर नगर पालिकेसाठी इच्छुक असलेल्या विविध राजकीय पक्ष आणि नगरसेवक पदाची उमेदवारी लढवु इच्छिणारे कामाला लागतील. हे सर्वश्रुत असतांनाच या पाचही नगरपंचायतीची निवडणूक ही पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेसह विधानसभा निवडणूकीची एक प्रकारे रंगीत तालीम असणार आहे. या पाचही नगर पंचायतीमध्ये मातब्बर नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. आरक्षण सोडतीपुर्वीच आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये गटाने निवडणुक लढवण्याची तयारी सुरू ठेवली आहे. या तीन नगर पंचायतीमध्ये धस-धोंडे गट पहायला मिळतील तर केज नगर पंचायतीतही भाजपाची गटबाजी पहायला मिळण्याची शक्यता आहे. वडवणीतही आंधळे आणि मुंडे यांच्यात तडजोड होणार का? याकडे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!