Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमबोगस लग्न करणार्‍यांची टोळी जिल्ह्यात कार्यरत कारीच्या लग्नाळूला लाखोंना फसवले

बोगस लग्न करणार्‍यांची टोळी जिल्ह्यात कार्यरत कारीच्या लग्नाळूला लाखोंना फसवले


बीड/दिंद्रूड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात मुलींचा दर कमी असल्याचे चित्र पुन्हा एकदा या घटनेने समोर आले असून एका लग्नाळू तरुणाला आपल्या झाशात अडकवून नातेवाईकांसमक्ष विवाह उरकून लग्न झाल्याच्या तिसर्‍या दिवशी नवरी घरातून पसार झाल्याने आपली फसगत झाल्याचे उघड झाल्यानंतर लग्नाळू तरुणाने दिंद्रूड पोलीसात तक्रार दिली. यावरून चार ते पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारूर तालुक्यातील कारी येथील तरुण अशोक ताराचंद मोरे (वय २८) हा तरुण तेलगाव येथील विखे कारखान्यावर कामाला होता. आपल्या लग्नाचे वय झाले तरी लग्न होत नसल्याने तो मित्र परिवारासह पाहुण्याराऊळ्यांना मला मुलगी पहा म्हणून सांगत होता. त्याचवेळी राधाकिसन विखे रा.तेलगाव याच्याशी त्याची ओळख झाली आणि विखे हे तेलगाव कारखान्यावर मुकादम असल्याने मी तुला नवरी मुलगी पाहतो असे म्हणून अशोक मोरे यांना त्याने सांगितले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी राधाकिसन विखे या मुकादमाने अशोक मोरे याला सांगितले की मी तुला मुलगी पाहिली आहे, तिला घेवून येण्यासाठी गाडी करावी लागेल, त्यासाठी ५ हजार रुपये दे असे म्हणून नवरा मुलाकडून ५ हजार रुपये घेवून २ नोव्हेंबरला नवरी मुलगी अनिता प्रल्हाद शिंदे, मुकादम राधाकिसन विखे, नवरीचा मामा, नवरीची बहिण, नवरीचा भाऊ हे नवरा मुलाच्या गावी कारी ता.धारूर येथे आले व तेथे नवरा मुलाच्या आई-वडिलांसोबत बैठक घेवून तेथे मुलीला ५० हजार रुपये दिले. दुसर्‍या दिवशी पुन्हा १ लाख रुपये मुलीकडच्यांनी मागिलत्याने दिले व २ नोव्हेंबरलाच लग्न लावून दिल्यानंतर ३ तारखेला देवदेव करून ४ तारखेच्या पहाटे ५ वाजता नवरी मुलगी घरातून पळून गेली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अशोक मोरे यांनी दिंद्रूड पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. या प्रकरणी दिंद्रूड पोलीसात नवरी मुलीसह मुकादम राधाकिसन आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खेत्रे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!