Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाराष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन


करोनाने दुसर्‍यांदा गाठले होते
पुणे (रिपोर्टर)- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भालके यांची प्राणज्योत मालवली असून राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक केली होती.


भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र, त्यात यश आले नाही आणि शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भालके यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी त्यांचे वय 60 वर्षे इतके होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. भालके यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर वेळीच उपचार घेत त्यांनी करोनावर मातही केली होती. मात्र, काहीच दिवसांत त्यांची तब्येत पुन्हा खालावली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. तिथे चाचणीअंती त्यांना पोस्ट कोविड झाल्याचे निदान झाले होते. वास्तविक भालके याना शुगर व रक्तदाबाचा त्रास असल्याने करोनाकाळात त्यांनी काळजी घ्यावी, असा कुटुंबीयांचा आग्रह होता. मात्र, गोरगरिबांसाठी ते कायम रस्त्यावर उतरून मदत करत राहिले आणि कुटुंबीयांना जी भीती होती ते संकट ओढवले. एकदा करोनावर मात केल्यानंतर दुसर्‍यांदा त्यांना करोनाने गाठले आणि त्यातून ते बरे होऊ शकले नाहीत. भालके यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पंढरपूरकरांवर खूप मोठा आघात झाला आहे

Most Popular

error: Content is protected !!