Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रगडकिल्ल्यांचा जाणता काळाच्या पडद्याआड! बाबासाहेब पुरंदरेंचं निधन;शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गडकिल्ल्यांचा जाणता काळाच्या पडद्याआड! बाबासाहेब पुरंदरेंचं निधन;शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


पुणे (रिपोर्टर):- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. आज सकाळी त्यांच्या पार्थिवदेहावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

babasaheb


रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचं निधन झालं. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात आले. याठिकाणी अंत्यदर्शनासाठी पर्वती पायथ्यावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटयचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं उभं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाशन टाकण्यासाठी वाहिलं. त्यांनी महाराजांच्या जीवनावर अनेक पुस्तके लिहिली. २०१९ मध्ये त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि २०१५ साली महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्माानित करण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा पार्वती येथून वैकुंठ स्मशानभूमीकडे निघाली असता हजारोच्या संख्येने या अंत्य यात्रेत लोकांनी सहभाग नोंदवत बाबासाहेबांना अखेरचा निरोप दिला. वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही-मुख्यमंत्री
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.


उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून श्रद्धांजली
ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे.


इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली-पंतप्रधान मोदी
साहित्य,कला क्षेत्रातील अध्वर्यू
गमावला-शरद पवार
बाबासाहेबांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या प्रेरणा
जागृत ठेवील-मोहन भागवत
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत,जेष्ठ इतिहास
संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी-गडकरी
शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनानं व्यथित झालोय-गृहमंत्री अमित शाह
मनाला अतिशय वेदना होत आहेत-फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!