Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- सोशलमीडीया, राजकारण आणि हिंसाचार

प्रखर- सोशलमीडीया, राजकारण आणि हिंसाचार


सोशल मीडीयाचा जन्म 2000 नंतर झाला. पुर्वी सोशल मीडीया नावाचं कुठलं ही ‘अस्त्र’ नव्हतं. लोकांनी कधी तसा विचार केला नव्हता. स्वातंत्र्य पुर्वी काळात वृत्तपत्र होते, ते वृत्तपत्र विचाराला आणि चळवळीला वाहिलेेलेे होते. आज तितका विचार दिसत नाही. विशेष करुन वृत्तवाहिन्यात, वृत्तवाहिन्या ह्या सुपारी घेतल्यासारख्या पत्रकारिता करु लागल्या हे दुर्देव आहे. स्वातंत्र्य संग्रामात वृत्तपत्राची भुमिका महत्वाची होती. स्वातंत्र्यानंतर ही वृत्तपत्राने समाजहिताचीच पत्रकारीता केली. 1990 नंतर जगात बदल झाले. नवं तंत्रज्ञान आलं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल झाला. आज सर्वसामान्यांच्या हाती स्मार्ट फोन आले. या फोनमध्ये व्हॉटसॉफ, फेसबुक, व्ट्टिटर, इस्टाग्राम इत्यादी प्रकारचे मत व्यक्त करता येणारे पर्याय सुरु झाले. कुठल्या ही गोष्टीचा वापर कसा करायचा हे ठरवता आलं पाहिजे. एखादी गोष्ट चांगली वापरली तर त्याचा चांगलाच परिणाम दिसून येतो, आणि वाईट वापर झाला तर त्याचे परिणाम वाईट होतात. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. लोक बोलू शकतात, लिहू शकतात. तसे अधिकार घटनेने बहाल केलेले आहेत, मात्र काय बोललं पाहिजे, काय लिहलं पाहिजे याला काही नियम आहेत,मर्यादा आहे. काहींना नियमाचं पालन करावं असं वाटत नाही. बरेच लोक समाजात तेढ निर्माण होईल असचं वक्तव्य करत असतात. काहींना वाईट बोलण्याची हौस असते. काहींना वादग्रस्त बोलून नेहमीच चर्चेत राहयचं असतं, तर काही जण मुद्दामहून वादग्रस्त बोलून आपली ‘राजकीय दुकानदारी’ चालवत असतात. वादग्रस्त बोलणारांना किती भाव द्यायचा हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे. उगीच एखाद्या ‘वेड्याला’ जास्तच भाव देण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. ज्यांची कुठलीही किंमत नाही. तसं मोठं काम नाही,अशांना मीडीयात चांगलं स्थान मिळू लागलं हा वैचारीक पराभव नाही का? आजचा माणुस प्रगत असला तरी त्याला तितकी बौध्दीकता आलेेली नाही, तो आपल्या मेंदुचा वापर कमी आणि दुसर्‍याच्या मेंदूवर जास्त चालतो. एखाद्याने चुकीची गोष्ट सांगितली तर ती गोष्ट खरी मानणारे देशात बहुसंख्याक आहे. मात्र समोरचा खरं बोलतो की, खोटं बोलतो याचा विचार करणारे खुपच कमी आहेत, जे विचार करतात, ते कुठल्याही भावनेला, अमिषाला, आणि फेकूगिरीला भीक घालत नसतात, हे तितकचं खरं आहे.


निवडणुकीत वापर
निवडणुकीत सगळीच ‘अस्त्र, शस्त्र’ काढली जातात, म्हणजे जात, पात, धर्म यांचा वापर होत असतो. कोणत्या जाती, धर्माच्या नावावर आपल्याला मते मिळतील याचा विचार करुनच त्या पध्दतीने राजकारणात त्याचा वापर केला जातो. विकासापेक्षा जाती, धर्माला राजकारणात जास्त महत्व आलं. त्यामुळे जास्तीत, जास्त जाती, धर्मात कशी विभागणी करता येईल हे राजकारणी ठरवत असतात. 2014 च्या पुर्वी ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत सोशल मीडीया कुठलेच नव्हता, मात्र 2014 च्या लोकसभेत भाजपाने सोशल मीडीयाचा वापर मोठया प्रमाणात केला. या मीडीयाच्या माध्यमातून नको ते लोकांच्या मनावर थोपवण्यात आलं, खोटा प्रचार करण्यात आला. खोटे आश्‍वासने दिली गेली. सोशल मीडीयावर आलेलं सगळं खरचं असतं, असा काहींचा समज असतो, त्यामुळे लोक खोट्या प्रचाराला बळी पडत असतात. 2014 नंतर सोशल मीडीयाची क्रेझ वाढत गेली, प्रत्येक निवडणुकीत सोशल मीडीया प्रचारासाठी अग्रेसर ठरू लागला. पुर्वी निवडणुकीत भिंती रंगवल्या जात होत्या. आज तशी परस्थितीत राहिली नाही. आता सोशल मीडीयातून प्रचाराची सुरुवात होवू लागली. कोण काय बोलतयं, कोणाची कुठं सभा आहे याचे मॅसेज तात्काळ फॉरवर्ड केले जातात. पुढार्‍यांच्या सभा ही फेसबुवर लाईव्ह दाखवल्या जात आहेत. कोणाला आमंत्रण द्यायचं म्हटलं तरी सोशल मीडीयाचा वापर केला जात आहे. काही जण प्रेस कॉन्फ्रन्स सोशल मीडीयाच्या माध्यमातून घेत आहे. जनतेला संदेश सोशल मीडीयातून दिला जावू लागला. इतका सोशल मीडीया महत्वाचा ठरु लागला.


तरुणाई त्यात गुरफटली
सोशल मीडीयाचा किती प्रमाणात वापर करावा याला काही मर्यादा असतात. काही जण झोपले तरच शांत असतात, नाही तर दिवस, रात्र मोबाईलच्या स्क्रीनवर असतात. कोणाचा मॅसेज आला, कोणी काय पोस्ट टाकली याकडे लक्ष असतं. सोशल मीडीयामुळे तरुण मुलं आपलं करीअर करण्याकडे तितकं लक्ष देत नाहीत ते फक्त सोशल मीडीयावरच असतात, हे तरुणाईसाठी धोक्याचीच घंटा म्हणायची. विविध मोबाईल कंपन्या बाजारात उतरलेल्या आहेत. जास्तीत, जास्त ग्राहक आपल्या सोबत जोडले जावेत म्हणुन कंपन्या कमी पैशात मोबाईल डाटा देत असल्याने तरुण मंडळी डाटा उडवत ऑनलाईन असतात. मोबाईल हा गरजेचा असला तरी अतिगरजेचा नाही. आपली कामे सोडून कुणी फक्त सोशलमीडीयावर असेल तर तो व्यक्ती किंवा तरुण भविष्यात काहीच करु शकत नाही. शहरी भागासह ग्रामीण भागात मोबाईल वापरणारांचे प्रमाण वाढले. विशेष करुन जो तो स्मार्ट फोनची बात करत असतो, घरी शौचालय नसतं, पण हातात दहा, वीस हजाराचा मोबाईल असतो, म्हणजे लोकांना स्वत:च्या आरोग्याची तितकी काळजी वाटत नाही,मात्र चांगला महागडा मोबाईल महत्वाचा वाटतो, त्यात व्हॉटसॉफ, फेसबुक असणं गरजेचं वाटत असतं. मोबाईलच्या क्रांतीमुळे जग जवळ आलं असलं तरी लोक तितकेच मोबाईलमुळे एकलकोंडे आणि आपल्या धुंदीत राहत आहेत, हे नुकसानदायक ठरू लागलं.


टार्गेट करणारी टोळधाड
सोशलमीडीया हा विचाराच्या आदान, प्रदानासाठी चांगला असला तरी त्याचा तितका चांगला फायदा होतांना दिसत नाही. पुढार्‍यांनी आपल्या राजकारणासाठी सोशल मीडीया हाताशी घेतला. आपल्या विरोधात कुणी काही बोललं की, त्याच्यावर तुटून पडण्याची यंत्रणा सोशल मीडीयावर तयार करण्यात आली आहे. काही पक्षाच्या लोकांनी आपल्यासाठी सोशल मीडीयावर काम करण्यासाठी पेड कार्यकर्त्यांची नियुक्ती केली, हे पेड कार्यकर्ते समोरच्या व्यक्तीचे ‘वस्त्रहरण’ करत असतात. अगदी खालच्या पातळीवर जावून आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत. शिव्या देण्यापासून ते महिला, मुलीवर बलात्कार करण्याच्या धमकीपर्यंत माथेफिरुंची मजल जात असते. काही प्रमुख पक्षाने सोशलमीडीया सेलची नियुक्ती केलेली आहे, हे सेलचे प्रमुख विरोधकावर पातळीसोडून चिखलफेक करत असतात. काहींना विखारी आरोप, प्रत्यारोप करणं महाग पडलेलं आहे, खालच्या पातळीवर जावून आरोप केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे. सोशलमीडीयावर विखार पसरणार्‍या विरोधात कठोर कारवाईची तरतुद नाही. कारवाई झाली तरी किरकोळ होते, कारवाई झाल्यानंतर ही पुन्हा सोशलमीडीया चालवणारे विखार पसरवणार्‍या पोस्ट टाकत असतात. अशांना त्या, त्या पक्षांचे, संघटनेचे समर्थन असते. त्यामुळे ते भीत नाहीत. याला फेसबुक कंपनी काही करत नाही, कारण त्यांना त्यांचा व्यवसाय करायचा असतो. त्यामुळे कंपनी ‘विखारी पोस्टला’ ब्रेक लावत नाहीत. सोशल मीडीया हा वादाचा विषय ठरु लागला. कुणी तरी काही तरी भावना भडकवणारी पोस्ट टाकतो, त्याचा परिणाम समाज जीवनावर होतो. त्याचे पडसाद समाजात होत असतात. भांडणे व दंगली घडवण्याचे काम काम सोशलमीडीयाच्या माध्यमातून होत आहे. काही महिन्यापुर्वी दिल्लीत जी दंगल झाली होती, त्याला सोशलमीडीया तितकाच जबाबदार होता. आता ही अमरावतीत दंगल झाली, त्याला सोशलमीडीया व काही जातीय राजकारण करणारे लोक जबाबदार आहे. पुर्वी जास्त करुन जातीय भांडणे विटंबना प्रकरणावरुन होत असे, आता त्याचे स्वरुप बदलले, वादग्रस्त बोलण्यावरुन भांडणे होवू लागले, ही चिंतेची बाब आहे.


हिंसा कुणाच्याच फायद्याची नाही
हिंसा घडवून कुणी समाजात वाद निर्माण करत असेल तर यातून काहीच निष्पन्न होत नसतं. उलट एकमेकांचे मने दुषीत करण्याचं काम केलं जात आहे. ऐरवी एकमेकांची गळाभेट घेणारे जातीय तेढ निर्माण झाले की, एकमेकांचा शिव्या शाप देत असतात. समाज आज प्रगतीच्या वाटेवर असला तरी दंगेखोरांना समाज शांत नको नसतो. कुठं काही थोडं झालं की, सोशल मीडीयावरुन त्या घटनेचे खोटे, नाटे, व्हीडीओ, मॅसेज पाठवले जातात. ज्यांना पाठवले असतात, तो पुढे असे वादग्रस्त मॅसेज पाठवत असतो. त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण संभ्रम आणि चुकीच्या माहितीचा प्रसार तात्काळ होतो. एखाद्याने थिनगी टाकायची आणि मग माथेफिरु संधी साधून वातावरण दुषीत करत असतात. दंगेखोर जाती, धर्माचे नाव घेवून दंगे करण्यास पुढे येत असतात. भारतीय समाज अनेक वर्षापासून एकत्रीत राहत आलेला आहे. आज पर्यंत ज्या काही दंगली घडलेल्या आहेत. त्यात मोठं नुकसान झालेलं आहे. यातून बरचं काही शिकायला मिळालेलं आहे. समाजात मोठ्या प्रमाणात वैचारीक लोक आहेत, पण अवैचारीकांचा जास्त प्रमाणात धुमाकूळ आज ही असतो हे नाकारुन चालणार नाही. रस्त्याने दंगामस्ती करणारे जसे ‘मदमस्त’ असतात. त्याच प्रमाणे सोशलमीडीयावर ‘मदमस्तांची’ संख्या वाढू लागली. इतर िंठकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद इतर ठिकाणी उमटणे हे काही चांगले लक्षण नाही. तिकडं दंगल झाली म्हणुन इकडं होवू द्या, अशी जातीय लोकांची मानसीकता असते. दंगलीत पुढारी आपला स्वार्थ साधून घेत असतात, ते अशाच संधीची वाट पाहून असतात. त्यासाठी समाजाने शहाणे होण्याची गरज आहे. मग तो कोणताही समाज का असेना? आग लागल्यावर नुकसान होवू शकतं, हे प्रत्येकाला ओळखता आलं पाहिजे. आग लावणे सोपे असते पण ती विझवणं खुप अवघड असतं. आग लागून गेल्यानंतर जी राख राहते, ती राख पाहून फक्त पश्‍चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच करता येत नसतं. दंगलीत आणि जातीय भांडणात झालेलं नुकसान ते भरुन न येणारं असतं. त्यासाठी प्रत्येकांनी जागृक असणं गरजेचं आहे. निवडणूका आल्या की, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न असतो. याची जाण लोकांना असायला हवी. आपल्या खांद्याचा वापर होणार नाही याची जाण प्रत्येकाला असायला हवी, कारण हिंसा घडवण्यासाठी स्वत: राजकारणी कधीच रस्त्यावर येत नसतात, ते लोकांना भडकावून स्वत: घरात बसत असतात. जगाचा विचार केला तर जगातील काही देशात हिंसेच्या घटना घडत आहेत, आणि आता पर्यंत ज्या घडल्या आहेत, त्याला सोशल मीडीया तितकाच जबाबदार असल्याचे समोर आलेले आहे. आपल्याकडे सोशल मीडीया हा वादाचा मुद्दा ठरू लागला. समाजात वावरतांना तरुणांनी आधी स्वत:च्या आयुष्याकडे पाहावे आणि वादग्रस्त पुढार्‍यांच्या व भावना भडकवणार्‍या लोकाकडे दुर्लक्ष करुन आपलं चांगलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. दंगल, जातीयवाद, धर्मवाद यामुळे कधीच कोणाचं भलं झालेलं नाही. माणसाने माणुस म्हणुन जगलं पाहिजे, एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. वाईट गोष्टी सोडा आणि चांगल्या गोेष्टीचं अनुकरण करा, यातच सगळ्याचं हित आहे.

Most Popular

error: Content is protected !!