बीड (रिपोर्टर)- धार्मिक ध्रुवीकरणाने पछाडलेल्या भाजपाने लोकसभेत पुन्हा 2024 ला सत्ता प्रस्थापीत करण्या हेतू पाच राज्यातल्या निवडणुका झाल्या की, महाराष्ट्रासह देशभरात मणिपूरसारख्या दंगली घडवून आणण्याची तयारी सुरू केल्याचा खळबळजनक दावा करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अशा दंगलींमध्ये गृहमंत्री शहांनी स्वत:चा मुलगा आणि भाूजपाच्या अन्य लोकप्रतिनिधींसह नेत्यांनी आपली मुले दंगलीमध्ये उतरावेत, असे म्हणत हल्लाबोल केला. राज्यातलं शिंदे-फडणवीस आणि पवारांचं सरकार हे निजामाचं सरकार असल्याचे सांगून महाराष्ट्रातली रयत ही छत्रपतींच्या विचारांवर चालणारी आहे म्हणून ते आरक्षण मागत आहेत, असंही आंबेडकरांनी आज म्हटलं. (पान 7 वर)
ते बीड येथे आयोजीत वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी बीडमध्ये आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वार्तालाप केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील भाजप आणि संघाला नेहमीच संभ्रमावस्था निर्माण करावयाची असते. धर्माच्या नावावर सामान्य लोकांना रिअॅक्ट करून मतदान आपल्याकडे वळवून घ्यायचे असते. 2024 नंतर मोदी-शहा सत्तेवर आल्यावर खर्या अर्ताने हुकुमशहा बनणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरीकांनी मतदान करताना त्यांचा कांगावा ओळखावा. देशातील आणि राज्यातील सरकार यांना सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय जाणीवपुर्वक घ्यायचे नाहीत, सध्या देशपातळीवर आणि राज्य पातळीवर विविध उपक्रमांचे खासगीकरण करण्यात येत आहे. मी तर म्हणतो, मतदारांनी इथून पुढे मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरा, अशी मागणी करावी. त्यासोबतच राज्यातील मुख्यमंत्री सकाळी एक निर्णय घेतात आणि दुपारी उपमुख्यमंत्री दुसर्या निर्णयाचा शासनादेश काढतात. राज्यात अशी गोंधळाची परिस्थिती आहे. सरकार नेमकं कोण चालवतं आणि सरकारचं चाललय काय? हेच कळायला मार्ग नाही. जनसे राज्यातले आहे तसेच देशातले आहे. भाजप सोडता इतर पक्षांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली आहे, मात्र नुकत्याच घोषीत झालेल्या पाच राज्यात इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र लढत नाहीत तर ते आपल्याला वेगवेगळे लढताना दिसतात. अशीच परिस्थिती लोकसभेची राहिली तर पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण करून येनकेन प्रकारे मोदी सत्ता हस्तगत करतील. भाजप-संघ सत्ता हस्तगत करील आणि मोदी हुकुमशहा (पान 7 वर)
बनण्याला बळ मिळेल. मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचे तर मराठवाड्यातील लोकांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना इथे थारा दिला नाही पाहिजे. स्वतंत्रपणे आपली लिडरशिप विकसित केली तर या मराठवाड्याचा विकास होईल. गेल्या 20 वर्षांपासून मराठवाडा दुष्काळा भागासाठी गोदावरी नदी पात्रातील वाया जाणारे पाणी लिफ्टींगद्वारे आणायच्या चर्चा घडवून येतायत, मात्र त्याचा फार्म्यूला आणि त्याची अंमलबजावणी काहीच होत नाही. जळगाव जिल्ह्यातील एकाही धरणातील 90 टीएमसी पाणी हे मोठ्या प्रमाणात सुरतजवळ असलेल्या समुद्राला मिळते. तेच पाणी लिफ्टींगद्वारे आणले तर अर्धी मराठवाड्यातील जमीन ही पाण्याखाली येईल, मात्र सरकारला चर्चा, घोषणा आणि गोंधळ याच्याशिवाय काहीच करायचे नाही, गेल्या वीस वर्षात देश आणि राज्य पातळीवरील राजकारणाची नैतिकता पुर्णपणे ढासळलेली आहे. सामान्य लोकांच्या कल्याणासाठी, वंचित बहुजन आघाडी रयतेतील मराठा समाजासाठी आरक्षण द्यावयाचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी मतदान करावे, असेही आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा श्रीमती रेखाताई ठाकूर, अॅड. विष्णू जाधव, अशोक हिंगे, जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे व वंचितचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आंबेडकरांची तोफ धडाडणार
आज दुपारी दोन नंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांची बीड शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने श्रमिक बांधवांसह कष्टकरी, शेतकर्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवणार आहे. जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने लोक सभास्थळी डेरेदाखल होत आहेत. अॅड. आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पंकजाताई या गोळवलकर यांच्या
पक्षाच्या त्यामुळे त्यांच्यावर अन्याय
एका प्रश्नाच्या उत्तरात पंकजाताई जरी बहुजन असल्या तरी त्या भाजप-संघ, गोडसे, गोळवलकर यांच्या विचाराच्या पक्षात काम करतात म्हणून त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. त्या जर बहुजनांच्या पक्षात काम करत असत्या तर अन्याय झाला नसता. अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी स्वत:चा बहुजनाचा पक्ष काढावा किंवा जेव्हा सल्ला विचारतील ज्येष्ठ या नात्याने सल्ला देऊ असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.
युतीबाबत ठाकरेंनाच विचारा
वंचित बहुजन आघाडी लोकसभा आणि विधानसभेला मोठ्या प्रमाणात मतदान घेते, मात्र या आघाडीचे उमेदवार काही निवडून येत नाहीत त्यामुळे या वेळी आपण कोणासोबत आघाडी करणार का? असे विचारले असता युती बाबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आणखी प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस काही ओव्हर कॉन्फडन्समधून बाहेर येत नाही त्यामुळे वंचितच्या युतीबाबत आपण उद्धव ठाकरेंनाच विचारावे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले.