कृषीमंत्र्यांनी अधिकार्यांना मस्टर काढण्याच्या सक्तीच्या सूचना द्याव्यात
बीड (रिपोर्टर)- शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार हमी योजनेतून फळबाग योजना राबवण्यात येत आहे. बीड पंचायत समिती अंतर्गत अनेक शेतकर्यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. शेतकर्यांनी फळबागांची लागवड करून काही महिने उलटले मात्र अद्यापही शेतकर्यांचे फळबागांचे मस्टर काढण्यात आले नाही. मस्टर काढण्याकडे अधिकार्यांसह कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. याची दखल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेऊन शेतकर्यांचे मस्टर तात्काळ काढण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना द्याव्यात, अशी मागणी बीड तालुक्यातील शेतकर्यांकडून केली जात आहे.
गेल्या वर्षी आणि यावर्षी बीड तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांनी शेवगा, तुती, मोसंबी यासह इतर फळबागांची लागवड केली. ही योजना रोजगार हमी योजनेतून राबविली जात आहे. शेतकर्यांची आर्थिक उन्नती व्हावी या दृष्टीकोनातून योजना राबविली जाते मात्र योजना योग्य पद्धतीने राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. फळबागांची लागवड करून अनेक महिने उलटले तरी तालुक्यातील शेतकर्यांचे मस्टर काढण्याकडे अधिकार्यांसह कर्मचार्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होऊ लागले. आज नाही उद्या, उद्या नाही परवा अशा पद्धतीची चालढकल बीड पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी करू लागले आहेत. गेल्या वर्षी तर चार ते पाचच मस्टर काढण्यात आले. चार ते पाच मस्टरमध्ये शेतकर्यांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार, शेवगा लागवडीमध्ये तीन वर्षात शेतकर्यांना सगळे पैसे अदा करावयाचे आहेत, वर्षाला तीन किंवा चार मस्टर निघल्यावर संपुर्ण पैसे मिळायला दहा वर्षेे तरी लागतील. दरम्यान अधिकारी आणि कर्मचार्यांच्या दिरंगाईबाबतची दखल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेऊन बीड तालुक्यातील फलोत्पादक शेतकर्यांचे मस्टर तात्काळ काढण्याचे आदेश द्यावेत आणि शेतकर्यांची फरफट थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.
नवीन बीडीओंना चार्ज होण्यास किती दिवस लागणार?
बीड पंचायत समितीमध्ये नवीन गटविकास अधिकारी आलेले आहेत. ते आल्यानंतर त्यांना कारभार व्यवस्थीतपणे हाताळण्यासाठी किती दिवस लागणार? तोपर्यंत फळबागांचे मस्टर असेच रखडत राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन अधिकारी आल्यानंतर तात्काळ मस्टर निघत नाही. सदरील नवीन अधिकार्यांनी फळबागांचे नियमितपणे मस्टर काढण्याची मागणी केली जात आहे.