मुंबई (रिपोर्टर)- भाजपा विरोधात जे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन इंडिया आघाडी लढणार असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांना इंडियामध्ये घेण्यासाठी अनुकुल असल्याचे सांगून देशात खासगीकरण वाढत आहे. कंत्राटी नोकर्या बरोबर आता शाळाही खासगी लोकांना दत्तक देत असल्याने ते त्याचा गैरवापर करतील, अशी भीती आज शरद पवारांनी व्यक्त करत अजित पवार मुख्णयमंत्री होणार हे स्वप्नच असल्याचे त्यांनी म्हटले.
सरकारी शाळा खासगी कंपन्यांना दत्तक देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तिरकस शैलीत भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एका शाळेत गणेशोत्सवानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शाळेत आयोजित केल्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात शरद पवार यांनी अकोल्यातील सहकार महामेळाव्यात भाष्य केले. राज्य सरकारकडून सर्वच क्षेत्रांमध्ये खासगीकरण सुरु असल्याची टीका त्यांनी केली. अन्य क्षेत्रांमध्ये खासगीकरणाची पद्धत आली त्याप्रमाणे सरकारी शाळाही खासगी कंपन्यांना दत्तक दिल्या जात आहेत. संबंधित कंपन्या वैयक्तिक कामांसाठी या शाळांचा उपयोग करु शकतात किंवा प्रशासनात हस्तक्षेप करु शकतात, या शंका रास्त असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
यावेळी शरद पवार यांनी नाशिकमधली जिल्हा परिषदेच्या शाळेचे उदाहरण दिले. नाशिक जिल्ह्यात द्राक्षं हे मोठं पीक आहे. या द्राक्षापासून दारु तयार केली जाते. एका दारु तयार करणार्या कंपनीला जिल्हा परिषदेची शाळा दत्तक देण्यात आली आहे. या शाळेबद्दल माहिती घेतली तेव्हा समजले की, गेल्या महिन्यात ज्या मद्य कंपनीला ही शाळा चालवायला दिली आहे त्यांनी शाळेत एक कार्यक्रम ठेवला होता. गौतमी पाटील नाव ऐकलंय का? गौतमी पाटील हिचं नृत्य त्या शाळेत झालं. तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा द्यायचा का?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थितांना विचारला. आपण काय करतोय, कोणत्या पद्धतीने करतोय, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे सांगत शरद पवार यांनी राज्य सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.