मारफळ्यात दारूबंदीसाठी महिला आक्रमक
पोलिसांना निवेदन देऊनही दारूविक्री सुरुच
बीड (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मारफळा गावात सर्रासपणे दारूची अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याने गावातील बहुतांशी घरातील लोक व्यसनाधीन होत चालले आहेत. यामुळे संतप्त महिलांनी गेल्या पाच दिवसांपूर्वी तलवाडा पोलिसात गावातील दारू बंदीबाबत निवेदन देऊनही अद्याप पावेत गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्याने महिलात संताप व्यक्त केला जात आहे. तेथील अवैध दारू विक्री तात्काळ थांबविण्यात यावी, अशा आशयाची मागणी तेथील महिलांनी लावून धरली आहे.
मारफळा या गावामध्ये पाच ते सहा जण अवैध पद्धतीने दारूची विक्री करतात. त्यामुळे गावामध्ये व्यसनाधीनता प्रचंड वाढली आहे. अनेक कुटुंबियांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. संबंधित दारू विक्री बंद करण्यात यावी, यासाठी गेल्या
आठ दिवसांपूर्वी महिलांनी संघटीत होत ग्रामपंचायतीसह पाच दिवसांपूर्वी तलवाडा पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना निवेदन दिले. पहिले दोन दिवस दारू विक्री बंद झाली, मात्र नंतर पुन्हा सर्रासपणे गावात अवैध दारूची विक्री सुरू झाली आहे. गावात दारूबंदी करण्यासाठी महिला पुढे सरसावल्या असल्या तरी प्रशासन त्यांना याबाबत मदत करत नसल्याचे दिसून येते. गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी महिलांमधून होत आहे.
बीट अंमलदारासह पीआयला जबाबदार धरा
आपआपल्या बीटमध्ये आणि कार्यक्षेत्रामध्ये अवैध धंदे सुरू असतील तर त्याला बीट अंमलदार आणि पीआय जबाबदार राहतो, महिलांनी निवेदन दिल्यानंतरही तलवाडा पोलीस ठाण्याचे पीआय आणि मारफळा गावचे बीट अंमलदार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने या दोघांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मराठा युवकांनी दखल घ्यावी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर युवक एकत्रित आले आहेत. मारफळा येथे अवैध पद्धतीने दारूविक्री होत आहे. त्याबाबत महिला एकत्रित आल्या आहेत मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आणि दारू विक्रेते हे मनी आणि मसल्स पॉवरचा प्रयोग करत असल्याने मराठा आंदोलनात एकजूट झालेल्या युवकांनी एकत्रित येत मारफळ्याची अवैध दारू दुकाने बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा.