Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeसंपादकीयरिपोर्टर भवन सुनंसुनं

रिपोर्टर भवन सुनंसुनं

शेख मजीद । बीड

कालचा दिवस रिपोर्टरसाठी अत्यंत दु:खद होता. रिपोर्टरचे ‘पितामह’ शेख सिकंदर यांनी आम्हाला पोरकं केलं. दोन महिन्याची झुंज अपयशी ठरली, ते पुन्हा बरे होऊन येतील आणि आमच्यात असतील अशी आम्हाला अशा होती, पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. नियतीने घाला घातलाच, त्यांना आमच्यातून हिरावून घेतलं. एक संपादक घडवणारं व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. अजुनही विश्‍वास बसत नाही, पण जड अंतकरण करुन सांगावं लागत आहे ते नाहीत, ते नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र कायम स्मरणात राहतील. शेतकरी असलेले शेख सिकंदर, बीड तालुक्यातील नागापूर येथील, कुटूंबाचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी ते शेतीसह मजूरी करत होते. आपल्या मुलाने शिक्षण घेवून मोठं व्हावं अशी त्यांची नेहमीच अपेक्षा असायची, रिपोर्टर पेपर जेव्हा डबघाईला होता. तेव्हा ते प्रचंड तळमळ करत असे, पैशाविना कधी-कधी पेपर बंद ठेवावा लागत होता, तेव्हा ते आपल्या जवळील पैसे तय्यब साहेब यांना देत होते. दरवर्षी काही ना काही कापसाचे पैसे आले की, ते आवर्जुन सांगत असायचे पेपरला पैसे लागत असेल तर घेवून जा, पण पेपर काही बंद ठेवत जावू नको, २००४ च्या पुर्वी रिपोर्टरची आर्थिक स्थिती खुपच बिकट असायची, आपला पेपर आर्थिक संकटातून बाहेर निघाला अशी ते नेहमी अपेक्षा करत होते. त्यासाठी ते स्वत: पंधरा, वीस दिवसाला कार्यालयात येवून पेपरची परस्थिती जाणून घेत होते, त्यावेळी कार्यालय नगर रोडवरील वैद्य कॉम्प्लॅक्समध्ये होतं. वृत्तपत्र ट्रेडर मशीनवर निघत होतं. कधी,कधी लाईट गेल्यानंतर मशीन हाताने फिरवावी लागत होती, एखाद वेळेस ते आले आणि लाईट गेली की, दोन कर्मचारी मशीन फिरवत होते, कर्मचारी मशीन फिरवत असल्याचे पाहून ते स्वत: पुढे येत होते, आणि म्हणत होते, सरका बाजुला तुम्ही, आणि ते एकटे मशीन फिरवत होते. शंभर ते दीडशे पेपर छापेपर्यंत ते मशीन फिरत होते. पेपरसाठी शेती विकायची त्यांची तयारी असायची, अथक परिश्रमानंतर २००४ साली परिस्थिती बदलली आणि वृत्तपत्राने नवी झेप घेतली. पेपर अत्याधुनिक नवीन मशीनवर छापायला सुरुवात झाली. पेपरची प्रगती होत असल्याचे पाहून ते समाधान व्यक्त करायचे. कधी चर्चा सुरु झाली, की ते जुन्या आठवणी सांगत असायचे. आम्ही किती काम करत होतोत. याची इत्यभूत माहित सांगत होते. आमच्या परिसरात आम्ही जुन्या काळात विहीरी फोडत होतोत. विहरी फोडण्यात आमचा कुणी हात धरत नव्हतं. ऊस खोदण्याचं काम करत होतोत. ऊस खोदण्याचे गुत्ते घेतले जात होते. त्यामुळे नागापूर परिसरातील सर्व लोक मला ‘मुकादम’ म्हणुन ओळखत होते. एकदा त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. रिपोर्टरचा वर्धापन दिन होता. या कार्यक्रमाला नागापूर परिसरातील नामंकीत व्यक्ती आली होती. त्यावेळी ते नेहमीप्रमाणे गेटवर खुर्चीवर बसले होते. ‘ती’ व्यक्ती म्हणाली, मुकादम तुम्ही इकडे कसे, आता कुठं पर्यंत काम करता, द्या सोडून आता सगळे कामं, आपलं गावाकडे बसावं, असं म्हणत ती व्यक्ती आत गेली, त्या ठिकाणी गेल्यानंतर ते तय्यब साहेबांना म्हणु लागले, ते समोरचे व्यक्ती आहेत ना, ते आमच्या परिसरातील असून, फार चांगले आहेत, विशेष करुन मेहनती आहेत… साहेब म्हणाले कोणते, ती व्यक्ती म्हणाली, ते खुर्चीवर बसलेले, तितक्यात साहेब म्हणाले अहो ते माझे वडील आहेत, काय म्हणता? तितक्यात ती ‘व्यक्ती’ पुन्हा त्यांच्याकडे आली आणि त्यांना अलींगन देत तय्यब तुमचा मुलगा आहे, हे मला माहीत नव्हतं बरं का? चुकलं माझं, तुमच्या कष्टाचं चीज झालं … असे अनेक किस्से ते सांगत होते….. जेव्हा एखादी गोष्ट सांगत असे तेव्हा ते कधी भावनीक ही होत होते…. ते म्हणायचे जेव्हा मी तय्यबला बीडला शिक्षणासाठी पाठवलं होतं… तेव्हा एकाने मला म्हटलं होतं, शहरात कुणी ही लेकरं शिकवत नसतं, लेकरं आम्हीच शिकवू जाणं, लेकरं शिकवायला तितके पैसे लागतात. त्यानंतर जिद्दीला पेटलो आणि ठरवलं मी तर माझ्या मुलाला शिकवणारच, मी माझी जिद्द पुर्ण केली. तय्यबला बीडमध्ये शिक्षणासाठी पाठवलं. त्यावेळी त्याला सुनील क्षीरसागर यांनी खुप मदत केली. वाट्टेल तितके पैसे खर्च करायची माझी तयारी असायची, माझ्या जिद्दीनूसार तो शिकला, असं म्हणुन ते तय्यब साहेबाचं गुणगौरव करत असे, ‘‘मुबीन तरी थोडा तापड स्वभावाचा आहे, पण तय्यबने कधीच माझा शब्द ओलांडला नाही, मी कितीही बोललो तरी परत कधी बोलला नाही.’’ आपल्याकडे तु, गणेश, काशीद आणि जगताप मामा हेच जुने आहेत. तुम्ही तय्यबला सोडलं नाही….. तय्यबने तुम्हाला कधी परक धरलं नाही, असं ते अवर्जुन सांगत होते. मला ते नेहमी म्हणाचये, तुच लवकर येतो…. बाकी उशिरा येतात. मी म्हणायचो मला लवकर येण्याची सवय लागली. थंडीच्या दिवसात ते मला नेहमी सांगायचे, घरीहून येतांना जॉकेट घेवून येत जा…. आणि घरी लवकर जात जा….त्यांचे प्रत्येक शब्द आज ही जशास तसे आठवतात. जेव्हा त्यांना फिनिक्स हॉस्पीटलमध्ये ऍडमीट केलं, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो, ते मला म्हणाले, बस इथं माझ्याजवळ… अरे मुबीन याला चहा पाजला की नाही? मुबीन म्हणाला त्यांना चहा पाजण्याची काय गरज आहे, ते घरचेच आहेत. ‘‘नाही रे चांगलं लेकरं आहे, त्याला चहा पाजून आण’’, असं म्हणुन वेगवेगळ्या विषयावर चर्चा सुरु केली, त्यानंतर कधी बोलणं झालचं नाही….. ते औरंगाबादला गेले ते परत आलेच नाहीत. मी रोज कार्यालयात आलो की, ते ऑफीसच्या गॅलरीत बसलेले असायचे, संध्याकाळच्या दरम्यान, दाराच्या कोपर्‍यात खुर्ची टाकून बसलेले असतं, आज ती खुर्ची रिकामी झाली, ते कायमचं सगळ्यांना सोडून गेले. आणखी काही वर्ष त्यांच्या आर्शीवादाची आणि मार्गदर्शनची गरज होती, पण नियतीला कदाचीत हे मान्य नसावं. त्यांच्या विना ‘‘रिपोर्टर भवन सुनंसुनं’’ आहे.

Most Popular

error: Content is protected !!