हे आहे पालकत्वाचं कर्तृत्व, बीड जिल्ह्याचा विकास हाच ध्यास
बीड (रिपोर्टर)-बीड जिल्ह्याच्या बाबतीत नेहमीच ऊसतोड कामगारांचा जिल्हा आणि मागासला जिल्हा अशी चर्चा केली जाते, मात्र मी कृषीमंत्री या नात्याने जिल्ह्यातील शेतकर्यांना शेती करण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाची जोड देणार आहे. शेतकर्यांनीही आपल्या आर्थिक प्रगतीसाठी यांत्रिकीकरण स्वीकारावे आणि आपली प्रगती करून घ्यावी, सोबतच दिवाळीपुर्वी पीक विम्याची अग्रीम 25 टक्के रक्कम शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा करायला लावणारच, जर ही रक्कम दिवाळीपुर्वी शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर एक शेतकर्याचा मुलगा म्हणून कृषीमंत्री असलो तरी दिवाळी साजरी करणार नाही, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
येथील सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रीय कृषीविकास योजना व राज्य प्रोत्साहन कृषी विकास योजनेतून जिल्ह्यातील 212 शेतकर्यांना मोठे आणि छोटे ट्रॅक्टर कृषी मंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. व्यासपीठावर आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी दीपका मुधोळ-मुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अधीक्षक कृषी अधिकारी
बाबासाहेब जेजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत नेहमीच हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा आहे, मागासलेला जिल्हा आहे, अशा चर्चा केल्या जातात मात्र कृषीमंत्री या नात्याने राज्यासह जिल्ह्यात कृषी विभागात अनेक प्रयोग केले जातील, ज्या योजनांचे पैसे मिळत नाहीत, अशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार ज्यांच्याकडून निधी खेचून आणला जाईल. त्यामुळे कोणत्याही योजनेला निधी कमी पडू देणार नाही, शेतकर्यांनीही स्वावलंबनाची शेती ही मानसिकता बदलून शेतीला अनेक जोड धंद्यांची साद द्यावी, यांत्रिकीकरण स्वीकारावे, ज्यांना ट्रॅक्टर दिले आहे, ते सर्व शेतकरी सहा एकरच्या आतील शेतकरी आहेत, त्यामुळे सहा एकर शेतीवर ट्रॅक्टर परवडत नाही, त्यांनी इतर शेतकर्यांना आपले ट्रॅक्टर किगरायने द्यावे मात्र अवाजवी किराया आकारू नये, ट्रॅक्टरधारक शेतकर्यांनी आपले इमान काळ्या मातीशी राखावे, बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळांना सोयाबीनसाठी 25 टक्के अग्रीम पिक विमा मंजूर केलेला आहे. ज्यांना विम्याबाबत काही कळत नाही, असे काही लोक विमा मिळणारच नाही, कंपन्या ऐकत नाहीत, अशा वल्गना करतात, मात्र मी एक शेतकर्याचा मुलगा म्हणून सर्व शेतकर्यांना दिवाळीच्या अगोदर 25 टक्के अग्रीम विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणार, जर ही रक्कम दिवाळीपुर्वी जमा झाली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही, असेही या वेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
दिवसभरात मुंडेंच्या चार बैठका
बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्याहेतू राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कंबर कसल्याचे दिसून येते. पालकमंत्र्यांची जबाबदारी मुंडेंवर आल्यापासून बीड जिल्ह्यात निधीचा वर्षाव होत असल्याचे याआधीच संभाजीनगरमधील कॅबिनेट बैठकीत दिसून आले आहे. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडेंच्या एकूण 4 बैठका होत असून जे पोटात तेच ओठात ठेवत मुंडे बीड जिल्ह्यातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, ऊसतोड मजूर आणि सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. आज दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक होत असून या बैठकीत 410 कोटी रुपयांच्या वार्षीक आराखड्याला मंजूरी मिळणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता बीड जिल्हा खनिजन नियामक परिषदेची बैठक मुंडेंच्या उपस्थितीत होत आहे.