Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांच्या अनुदानासाठी सरपंचांनी महामार्ग रोखला

शेतकर्‍यांच्या अनुदानासाठी सरपंचांनी महामार्ग रोखला


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात ११ पेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. त्या नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात आली. मात्र बीड जिल्हा प्रशासनाने बीड तालुक्यातील पाली महसूल मंडळ यातून वगळल्याने या भागातील २५ ते ३० गावांच्या शेकडो शेतकर्‍यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले. त्या शेतकर्‍यांना अनुदान द्या या मागणीसाठी आज सरपंच संघटनेच्या वतीने पाली येथे रस्ता रोको आंदोलन केले. एक ते दीड तासाच्या या आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक ठप्प केली होती. सदरील आंदोलनाला भाजपाने पाठिंबा देत जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शविली.

259166519 3160820300906659 4447490872838201548 n

माहे सप्टेंबर २०२१ मध्ये बीड जिल्ह्यासह पाली भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. जिल्ह्यात ११ पेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झाली. शेतकर्‍यांचे पिकच नाही तर शेत वाहून गेले. त्यात शेतकर्‍यांना प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली, परंतु बीड जिल्हा प्रशासनाने या नुकसान भरपाईच्या अनुदानातून पाली सर्कलला वगळले. २५ ते ३० गावातील शेकडो शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याने या भागातील सरपंच परिषदेने आंदोलनाचा निर्णय घेतला. आज या भागातील २५ ते ३० सरपंच शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरले. सोलापूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. एक ते दीड तासाच्या आंदोलनाने या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, ही प्रमुख मागणी आंदोलन-कर्त्यांची होती. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जि.प. सदस्य भारत काळे यांनी केले. या वेळी सरपंच परिषदेचे पदाधिकारी, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोपर्यंत या भागातील शेतकर्‍यांना अनुदान मिळत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहिल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

Most Popular

error: Content is protected !!