ऊस वाहतूक दरात दुपटीने वाढ करण्यासाठी उपोषण
बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार नेहमीच चव्हाट्यावर आलेला असून कधी कर्मचार्यांची कमतरता तर कधी औषधाचा साठा कमी असतो. आरोग्य विभागाने आपला कारभार सुधारावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. तर ऊस वाहतूक दरात दुपटीने वाढ करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम-कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील आरोग्य सेवेमध्ये नेहमीच काही ना काही त्रुटी आढळून येत असते. कधी कर्मचार्यांची संख्या कमी असते तर कधी औषधसाठा मुबलक नसतो त्यामुळे रुग्णांना व्यवस्थीतपणे उपचार मिळत नाहीत, अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात जातात, सरकारी दवाखान्याने आपला कारभार सुधारावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण ढवळेंसह आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. ऊसतोड कामगारांना प्रतिटन 500 रुपये देण्यात यावे, ऊस वाहतूक दरात दुप्पट वाढ करण्यात यावे, मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.