Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडगुटखा प्रकरण भोवलं; खांडेंच्या पदाला स्थगिती लवकरच नवीन जिल्हाप्रमुख निवडण्याचा निर्णय

गुटखा प्रकरण भोवलं; खांडेंच्या पदाला स्थगिती लवकरच नवीन जिल्हाप्रमुख निवडण्याचा निर्णय


बीड (रिपोर्टर)- गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. त्याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून प्रकाशीत झाले असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलेल्या या वृत्तामध्ये लवकरच शिवसेनेच्या नवीन जिल्हाप्रमुखाची घोषणा केली जाणार असल्याचे म्हटल्याने कुंडलिक खांडे यांना गुटखा प्रकरण आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विरोधात जात असलेल्या तक्रारी भोवल्याचे दिसून येते.

शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकात बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती दिल्याचे वृत्त आल्याने खांडे गटात प्रचंड खळबळ उडाली. गेल्या पाच दिवसांपूर्वी कुंडलिक खांडे यांच्याविरोधात गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचे प्रकरण माध्यमातून समोर आल्यानंतर या प्रकरणात शिवसेना कारवाई करील, असे वाटत असतानाच कुंडलिक खांडे हे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्या स्वागताबरोबर जाहीर कार्यक्रमातही उपस्थित राहिल्याचे दिसून आले. यावर अनिल देसाई यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे निर्णय घेणार असल्याचे परवाच म्हटले. त्यापुर्वीही शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखावर झालेल्या हल्ल्याचा आरोपही खांडे यांच्यावर होता. तशा जाहीर तक्रारी पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती देण्यात आली आहे. सामना दैनिकातून देण्यात आलेल्या वृत्तात लवकरच बीडच्या नव्या जिल्हाप्रमुखाची निवड केली जाणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयतून हा आदेश काढण्यात आला असून कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदावर पक्षाने अधिकृत निर्णय घेतल्याने खांडे गटात खळबळ उडाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!