Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडबीडसाठी सेनेचा सस्पेन्स, इच्छुकांची लॉबिंग आदित्य ठाकरे लक्ष ठेवून, दोन दिवसात होणार...

बीडसाठी सेनेचा सस्पेन्स, इच्छुकांची लॉबिंग आदित्य ठाकरे लक्ष ठेवून, दोन दिवसात होणार जिल्हाप्रमुखाची घोषणा


बीड (रिपोर्टर)- शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीचे सस्पेन्स पक्षाकडून आज दुपारपर्यंत कायम ठेवल्यानंतर इच्छुकांनी मुंबईत पक्षातील अन्य लोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांसोबत भेटीगाठी वाढवून लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. मात्र बीडसाठी शिवसेना कडवट शिवसैनिकाच्या शोधात असल्याचे विश्‍वसनीय वृत्त असून या कामी दस्तुरखुद्द युवा शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत. पारदर्शक, वक्तृत्व आणि पक्ष वाढवणारा कर्तृत्ववान शिवसैनिकालाच जिल्हाप्रमुख पदावर निवडले जाणार असल्याचे सांगण्यात येते. बीडसाठी अनेक जण बाशिंग बांधून शिवसेना भवनासह मध्यवर्ती कार्यालयात तर काही पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत.
कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला काल शिवसेनेने स्थगिती दिल्यानंतर बीडमधील अनेक इच्छुकांनी थेट मुंबई गाठली.

पक्षाकडून बोलवणं आल्याचा बोलबाला केला. मात्र शिवसेनेने कुठल्याही पदाधिकार्‍याला अथवा इच्छुकाला आज दुपारपर्यंत बोलावलेलं नव्हतं. शिवसेनेने बीडच्या जिल्हाप्रमुख पदाबाबत सस्पेन्स कायम ठेवले आहे. दुसरीकडे आपलीच या पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी लोकप्रतिनिधींसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. अनेकजण आपआपल्या पद्धतीने शिवसेनेतील पदाधिकार्‍यांच्या भेटी घेऊन बीडचे जिल्हाप्रमुख पद पदरी पाडण्याचे मनसुबे आखत आहे परंतु शिवसेनेने या वेळेस मात्र बीड जिल्हाप्रमुखाची निवड करण्यासाठी अनेक अपेक्षा ठेवल्या असून तो पारदर्शक असावा, वर्क्तृत्व चांगलं असावं, शिवसेना वाढवण्यासाठी त्याचं कर्तृत्व कामी यावं, याचबरोबर शिक्षणाची पात्रताही या वेळेस लक्षात घेतली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील शिवसेनेची अंतर्गत बंडाळी अनेक वेळा पक्षासमोर गेली आहे. माजलगावातील जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिकांमध्ये झालेली हाणामारी, संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत झालेले आरोप-प्रत्यारोप, उपजिल्हाप्रमुखावर झालेला हल्ला, या सर्व तक्रारींची गोळाबेरीज पक्षाकडून केली जात असून बीडसाठी कडवट शिवसैनिकाचा शोध जिल्हाप्रमुख पदासाठी घेतला जात असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. या सर्व घडामोडींवर दस्तुरखुद्द युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत. येत्या दोन दिवसात बीडच्या जिल्हाप्रमुख पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या इच्छुकांच्या यादीत दिलीप गोरे, अनिल जगताप, परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, युद्धजित पंडित, नितीन धांडे यांच्यासह आदींचा समावेश आहे. हे सर्व मुंबई-पुण्यात डेरेदाखल असून पद आपल्यालाच मिळावं यासाठी पदाधिकार्‍यांच्या भेटी घेत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!