Home राजकारण नगरपंचायतीसाठी भाजपाला गटबाजीची पंचायत, आष्टीत धस-धोंडेंची बोलणी सुरू, वडवणीत मुंडे-आंधळेंचा वाद;...

नगरपंचायतीसाठी भाजपाला गटबाजीची पंचायत, आष्टीत धस-धोंडेंची बोलणी सुरू, वडवणीत मुंडे-आंधळेंचा वाद; आमदार असलेल्या केजमध्ये भाजपाची चर्चाही नाही


राष्ट्रवादीकडून कुठं महाविकास आघाडीची मोट तर कुठे स्वतंत्र लढण्याची तयारी
आष्टी/केज/वडवणी (रिपोर्टरकडून) जिल्ह्यातील पाच नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पाचही शहरातील मातब्बर नेत्यांनी आपले पॅनल उभे करण्यासाठी नाराज गटासोबत बोलणी आणि मनधरणीला सुरुवात केली आहे. आष्टी, केज आणि वडवणीत अत्यंत चुरशीची निवडणूक होण्याचे चिन्हे असून आष्टी नगरपंचायतीसाठी धस-धोंडे गट एकत्र आला नाही तर तिरंगी लढत होईल. वडवणीत मुंडे-आंधळे यांचे सख्ख्य जमले नाही तर इथेही तिरंगीची शक्यता असून केजमध्ये या वेळेस चौरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केजमध्ये भाजपाचा आमदार असला तरी नगरपंचायत लढवण्यासाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. अन्य चार नगरपंचायतीत मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशा सरळ लढती पहावयास मिळत आहेत.


जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, केज या पाच नगरपंचायतींची निवडणूक घोषीत झाली. रात्रीपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या आष्टीसह पाटोदा आणि शिरूर नगरपंचायतीत काय होईल, यावर चर्चा होत असतानाच आष्टी नगरपंचायतीसाठी आ. सुरेश धस आणि माजी आ. भीमराव धोंडे यांचा भाजपाकडून एक पॅनल येतो की धस-धोंडे आपले सवतेसुभे उभे करतात हे येत्या दोन दिवसात कळून येईल. धोंडे-धस यांच्या वाटाघाटीच्या बैठका चालू असून महाविकास आघाडीकडून आ. बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीची निवडणूक लढवली जाणार आहे. इकडे शिरूर आणि पाटोद्यात भाजपाचं नेतृत्व हे आष्टीतून केलं जाईल तर महाविकास आघाडीचं नेतृत्व हे बाळासाहेब आजबेंसह शेख महेबूब आणि स्थानिक नेतृत्वाच्या विचारातून त्याठिकाणी उमेदवार दिले जाणार आहेत. वडवणी नगरपंचायतीत मात्र निवडणूक लढवण्यापासूनच भाजपाला डोकेदुखी होणार असल्याचे चित्र समोर येत असून याठिकाणी मुंडे-आंधळे या गटात धुसमूस पहावयास मिळते. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राजाभाऊ मुंडे आणि माजी आ. केशव आंधळे यांच्या गटात सख्ख्य निर्माण करण्यात यश मिळाले तर या ठिकाणी भाजप हा तगडा पॅनल उभा करू शकतो. राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीची रुपरेषा देण्याचे काम आ. प्रकाश सोळंके यांच्या हातात आहे. काँग्रेस आणि शिवसेना ही प्रकाश सोळंकेंचं नेतृत्व स्वीकारेल का? हे येत्या दोन दिवसात दिसून येईल. बोलणी आणि मनधरणी इथेही सुरू आहे. तिकडे भाजपाचा आमदार असलेल्या केजमध्ये नगरपंचायतीसाठी भाजपाकडून कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील आणि जनविकास पॅनलचे हारुण इनामदार यांचे स्वतंत्र पॅनल पडण्याची दाट शक्यता असली तरी यांच्यातही वाटाघाटी आणि बोलणी, मनधरणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. पाचही नगरपंचायतींचे नेतृत्व हे मातब्बर नेते करत असल्याने इथे सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागणर आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version