मंदिर परिसरात बॉम्बशोध पथक दाखल
परळी (रिपोर्टर)- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाचं मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे विश्वस्तांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सतर्क होत मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान तपासासाठी दुपारी बॉम्बशोध पथक दाखल झाले होते.
काल प्रभू वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी टपाल द्वारे आलेले पत्र वाचल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्या पत्रात 50 लाखांची मागणी करत वैद्यनाथचं मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. याची गंभीर दखल घेत त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. संबंधित पत्र पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तात्काळ वैद्यनाथ मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवला. सध्या मंदिर बंदोबस्तासाठी 9 कर्मचारी आणि एक अधिकारी ठेवण्यात आले असून 85 सीसीटव्ही कॅमेर्यांद्वारे बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान तपासासाठी बॉम्बशोध पथकाला पाचारण करण्यात आले . मंदिर परिसरात या पथकाने डिटेक्टर मार्फत तपासणी सुरू ठेवली होती. मंदिर क्षेत्र मोठं असल्याने ही तपासणी बराच काळ चालणार आहे.