Home बीड 23 दिवसानंतर बीडमधून बससेवा सुरू, बसस्थानकातून दोन बस, एक गेवराईसाठी तर दुसरी...

23 दिवसानंतर बीडमधून बससेवा सुरू, बसस्थानकातून दोन बस, एक गेवराईसाठी तर दुसरी अंबाजोगाईसाठी, कर्मचारी कामावर परतू लागले


प्रशासकीय सेवेत 144 तर कार्यशाळेत 28 कर्मचारी रुजू, दोन वाहक, दोन चालकांची महत्वपूर्ण भूमिका, संपकर्‍यांचे आंदोलन सुरुच, महिला कर्मचार्‍याला भुरळ, पुरुष कर्मचार्‍याच्या छातीत कळ
बीड (रिपोर्टर)- गेल्या 23 दिवसांपासून बंद असलेली बससेवा अखेर आज बंदोबस्तात सुरू झाली. बीड बसस्थानकातून आज सकाळी साडे दहा वाजता बीड-गेवराई आणि बीड-अंबाजोगाई या दोन बस प्रवासी घेऊन फेर्‍यासाठी निघाल्या. दुसरीकडे आंदोलक विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचे दिसून आले. आंदोलकांनी आज आपला संसार बसस्थानकात आंदोलनस्थळी थाटून त्या ठिकाणी भाकरी थापल्या तर एका महिला आंदोलकाला भुरळ आली तर दुसर्‍या एका आंदोलकास छातीत दुखू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. आज पावेत प्रशासकीय सेवेत 144 तर कार्यशाळेत 28 कर्मचारी रुजू झाले आहेत.


एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी गेल्या 23 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. सरकारसोबत अनेक बोलण्या झाल्यानंतरही आणि शासनाने काही मागण्या मान्य केल्यानंतरही संपकरी विलिनीकरणाचा हट्ट धरून आहेत. दोन दिवसांपूर्वी शासनाने कर्मचार्‍यांची तब्बल 41 टक्के वेतनवाढ केली. तरीही संपातील काही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असताना काही कर्मचारी मात्र हळूहळू कामावर रुजू होताना दिसून येत आहेत. बीडच्या एसटी विभागातील प्रशासकीय सेवेत असलेले 144 आणि कार्यशाळेत काम करणारे 28 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. दोन वाहक आणि दोन चालक कामावर रुजू झाल्यानंतर आज सकाळी पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेदहा वाजता बीड-गेवराई ही बस बसस्थानकातून सोडण्यात आली. यामध्ये सहा प्रवासी होते तर बीड-अंबाजोगाईसाठी निघालेल्या बसमध्ये तब्बल तीस प्रवाशांनी प्रवास केला. दुसरीकडे आंदोलक संपकरी एकजुटीच्या विजयाचा जयघोष करत आंदोलन करताना दिसून आले. काही आंदोलकांनी बसस्थानकात संसार थाटत भाकरी थापल्या. बससेवा सुरू झाल्यानंतर एका महिला कर्मचार्‍यास भुरळ आली तर अन्य एका कर्मचार्‍याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version