Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडआष्टी, पाटोदा, शिरूरचे पदाधिकारी मुंबईत;जिल्हाप्रमुख पदाचा तिडा अद्याप कायम

आष्टी, पाटोदा, शिरूरचे पदाधिकारी मुंबईत;जिल्हाप्रमुख पदाचा तिडा अद्याप कायम

शिवसेनेला नगरपंचायत लढवायची की नाही ?


बीड (रिपोर्टर)- शिवसेनेने स्थगिती दिलेल्या सेना जिल्हाप्रमुखाच्या कार्यक्षेत्र असलेल्या आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात नगरपंचायतीची निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख अवघ्या दोन ते तीन दिवसांवर आलेली असताना जिल्हाप्रमुख पदाच्या लॉबिंगसाठी या तिन्ही नगर पंचायतीतले शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून असल्याने शिवसेनेला ही निवडणूक लढवायची की नाही, असा एकीकडे सूर निघत आहे.


गेल्या पंधरवाड्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शिवसेनेने त्यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती दिली. त्याच दरम्यान राज्यातील नगरपंचायत निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून झाली. स्थगिती देण्यात आलेल्या जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रामध्ये तब्बल तीन नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतीत निवडणुका होत आहेत. खांडे यांच्या पदाला स्थगिती मिळाल्याने शिवसेनेतील अन्य इच्छुक जिल्हाप्रमुख पद आपल्यालाच मिळावं म्हणून मुंबईत डेरेदाखल झाले. शिवसेना भवनात दोन दिवस पदाधिकारी लोकप्रतिनिधींना भेटले आणि ते परत आले. त्या दोन दिवसांच्या कालखंडात खांडेंनी जामीन मिळवला. माध्यमासमोर आपली बाजू तालुका पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मांडली आणि गेल्या दोन दिवसांपासून खांडेंसह आष्टी, पाटोदा, शिरूर येथील शिवसेनेचे तालुका प्रमुखांसह इतर पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. दुसरीकडे नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेकडूनही जिल्हाप्रमुख पदाचा तिडा सोडविला जात नाही आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या तालुक्यात दिसून येत नाहीत. त्यामुळे शिवसेनेला नगरपंचायत लढवायची की नाही, असा सवाल उपस्थित होत असतानाच या तिन्ही नगरपंचायतीतला निष्ठावंत सैनिक मात्र अस्वस्थ असल्याचे दिसून येते.

Most Popular

error: Content is protected !!