Friday, January 28, 2022
No menu items!
HomeUncategorizedखुन्नसवर संयम भारी, सत्तेची दोन वर्ष!

खुन्नसवर संयम भारी, सत्तेची दोन वर्ष!

inbound8423322051357352164

तीन पक्षाचं सरकार म्हणजे रिक्षा, तो कधी ही उलटू शकतो. असं म्हणुन विरोधक महाआघाडी सरकारची हेटाळणी करत होते. उध्दव ठाकरे यांना प्रशासन कधी जमणार नाही. त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणुन यशस्वी होणार नाही असं ही विश्‍लेषण विरोधक करत होते. त्यांचे हे दावे, भाकीत खोटे ठरले. उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याने कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. त्यामुळे राज्यात विकासाच्या कामाला काही प्रमाणात ब्रेक लागलं. मुख्यमंत्री म्हणुन नवखे असलेले ठाकरे यांच्या समोर कोरोनाचे महासंकट होते. राज्यात कोरोनावर कशी मात करता येईल याचा ते बारकाईने अभ्यास करत होते. लॉकडाऊन लावण्यापासून ते संपुर्ण परस्थिती हातळण्यापर्यंत ते योग्य पध्दतीने नियोजन करत होते. तशा सुचना प्रशासनाला देत होते. जनतेला फेसबुकवर मार्गदर्शन करत होते. कोरोना हा फक्त राज्यातच नव्हता, तो देशात आणि जगात ही होता. कोरोनाच्या काळात भाजपाने राजकारण करणं काही सोडलं नाही. ठाकरे यांच्या नाकर्त्यापणामुळे लोक जास्त मरु लागले, त्यांना कोरोनावर मात करण्यात अपयश आलं. असे वक्तव्य भाजपाचे नेते करत होते. तेच भाजपावाले गंगेत वाहणार्‍या मृतदेहा बाबत बोलत नव्हते. कोरोनात सहकार्याची भावना भाजपाने ठेवली नाही. उलट हे सरकार बदनाम कसं होईल त्या दिशेने पाऊले टाकण्याचे काम भाजपाचे नेते करत होते. धार्मिक स्थळे काही महिने बंद होते. धार्मिक स्थळे बंद करण्याचं कारण म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढू हाच उद्देश होता, पण भाजपावाल्यांनी धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन केले, ही एक आश्‍चर्याची बाब दिसून आली. राजकारण कुठं करावं आणि कशात करावं याचं भान भाजपाला नव्हतं. भाजपाला लोकांचं काही देणं घेणं नव्हतं, असं यातून दिसून येतं. सरकारला कसा इंगा दाखवला येईल हाच एकमेव त्यांचा अजेंडा ठरलेला होता. ठाकरे यांनी भाजपाच्या या विखारी राजकारणाला जशाच तसे उत्तर देत आपलं काम सुरु ठेवलं. कोरोनात चांगले काम करुन दाखवले.

राज्यपाल आणि सरकार

जेव्हा तीन पक्ष एकत्रीत आले, तेव्हा सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला, हा चमत्कार घडवला खा. शरद पवार यांनी. पवार यांनीच उध्दव ठकारे यांना मुख्यमंत्री व्हा म्हणुन सुचना केली. ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे पुढारी सुधरु देणार नाहीत, ते फक्त नावाला असतील असं काहींचं म्हणणं होतं, पण दोन वर्षापासून हे सरकार काम करत आहे. तसा कुठलाही प्रकार समोर आला नाही. उध्दव ठाकरे हे नवखे असतांना ते एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखे काम करतांना दिसतात. राज्यात महाआघाडी स्थापन झाली ती भाजपाच्या ओव्हारपणामुळे, नसता हा सगळा खेळ होत नव्हता. शिवसेना, भाजपा यांची युती होती. भाजपाने शिवसेनेला जास्त किंमत दिली नाही. शिवसेनेमुळे आपल्याला काही फरक पडणार नाही. शिवसेनेला भाजपाशिवाय पर्याय नाही असा जो काही भाजपाचा तोरा होता. तो पुर्णंता उतरवण्याचं काम खा. पवार यांनी केला. भाजपा एक पाऊल मागे सरकत होता, तर तीन पक्षाचं सरकार राज्याच्या सत्तेवर आलं नसतं. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची हौस होती ती हौस पुर्ण करण्यासाठी ते अजित पवार यांना सोबत घेवून पहाटे त्यांनी शपथ घेतली. लोकं जागे झाल्यानंतर लोकांना कळलं राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निवडले गेले. त्यांचं हे पद काही तासाचं होतं. राज्यपाल कोश्यारी हे पहाटेचा वेळ काढून या दोघांना शपथ देतात ही नवलाईचीच बाब म्हणावी लागेल. भाजपाचे सरकार नसल्यामुळे कोश्यारी यांची भुमिका सहकार्याची नसते. भाजपाच्या सत्तेविना त्यांनाही राजभवनात करमेला. त्यामुळे राज्यपाल मंत्र्यासारखे दौरे काढून आढावा बैठका घेवू लागले. मध्यंतरी, कोश्यारी यांनी हिंगोली, परभणीसह आदि जिल्हयाचा दौरा काढला होता. राज्यपालाचं हे असं कृर्त्य कोणालाच आवडलं नाही, भाजपाला मात्र आवडलं. राज्यपालांनी घटनात्मकच जबाबदारी पार पडायची असते. राजकारण करायचं नसतं. दोन वर्षात विरोधक राज्यपालाकडेच अनेक वेळा तक्रारी घेवून गेले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता राज्यपालाकडे जावून येत असे. राज्याचा कर्ताधर्ता मुख्यमंत्री आहे, पण मुख्यमंत्र्यापेक्षा भाजपाला राज्यपाल महत्वाचे वाटत होते. त्यामुळे राजभवनात नेहमीच भाजपाची गर्दी होत असे. राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात आता पर्यंत अनेक वेळा खटके उडाले. राज्यपालाच्या अधिकारात असलेल्या विधानपरिषदेच्या जागांचा निकाल लागला नाही. राज्यपाल फाईलवर सही करायला तयार नाहीत. त्यांना सही करायला वेळ मिळेला, हे राज्यपाल पदाचं दुर्भाग्य समजायचं का?
#आत्महत्या प्रकरण
सुशांतसिंंग राजपूत या अभिनेत्याने काही महिन्यापुर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येचं आणि राज्य सरकारचं काही देणं-घेणं नव्हतं. मात्र भाजपाने असं काही रान उठवलं. की, ही आत्महत्या नसून तो एक खुनच आहे, अशी या घटेनला कलाटणी देण्यात आली. यात सरकारला गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेचा तपास राज्याच्या पोलिसाऐवजी सीबीआयकडे देण्यात आला. राज्य सरकारच्या पोलिसांवर अविश्‍वास दाखवण्यात आला. यात इतकं राजकारण करण्यात आलं की, दोन महिने सरकारला कोंडीत पकडण्याचं काम केलं. काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी यात अतिरेकपणा करुन जणू काही सुपारी घेतल्यागतच वृत्तवाहिन्या या घटनेच्या बातम्या दाखवत होते. उरलं सुरलं अभिनेत्री कंगना रनोट हीने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. कंगनाने महाराष्ट्र,मुंबई, पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आपल्या जीवाचा आटापीटा केला. कंगनाच्या वक्तव्याला भाजपावाले दाद देत होते. तिला केंद्राने संरक्षण पुरवले. विनाकारण सुशांतसिंंग प्रकरणावरुन हंगामा करण्यात आला. शेवटी या प्रकरणातून काहीच साध्य झालं नाही. सुशांतने आत्महत्याच केली होती हे समोर आलं. उगीच सरकरला दोषी ठरवण्याचं काम भाजपाने केलं होतं. या प्रकरणात भाजपाचं चांगलं तोंड फुटलं.

चौकशा लावल्या

राज्य सरकारला कसं घेरता येईल याचा रात्र-दिवस अभ्यास भाजपावाले करत असतात. ईडी, सीबीआय ह्या संस्थांना राज्यात कामाला लावण्यात आलं. बेहिशोबी मालमत्ता आणि भ्रष्टाचार फक्त राज्यातील सत्ताधारीच करत असल्याचा जावाई शोध ईडी, सीबीआयला लागला आहे. ईडीने गेल्या एक वर्षापुर्वी खा. शरद पवार यांनाच नोटीस पाठवली होती. पवारांनी मीच स्वत:च ईडी कार्यालयात जातो असं जाहीर केल्यानंतर ईडीने माघार घेतली. त्यानंतर ईडीने अनेकांवर आपली नजर टाकायला सुरुवात केली. अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे मारण्यात आले. नातेवाईकांच्या घरी छापे मारुन पवारांना जाणीव पुर्वक टॅार्चर करण्याचं काम होवू लागलं. गृहमंत्री असलेले देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. हा आरोप मोघमपणे पोलिस अधिकारी परमबिरसिंह यांनी केला. या मोघम आरोपवर देशमुख याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. परमबिर सिंंह हेच सध्या बेपत्ता आहेत, ते कोर्टासमोर यायला तयार नाहीत. देशमुख तर कोठडीत आहेत. आरोप खरा आहे हे सिध्द झालं नाही तरी देशमुख यांना अजुन जमीन झालेला नाही. याची किंमत चुकवावी लागले असा इशारा खा. शरद पवार यांनी दिला आहे. पवार योग्य तेच बोलले, या प्रकरणात किती प्रमाणात तथ्य आहे हे समोर येईलच पण जाणीवपुर्वक कसा फास आवळला जातो हे अशा कारवायातून दिसून येतं. वानखेडे प्रकरणातून ही मोठा फ्रॅाड समोर आला. आर्यन खान याच्यासह अन्य काही तरुणावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई कशी खोटी होती. याचा जबरदस्त पर्दाफाश करण्याचं काम मंत्री नवाब मलीक यांनी केले. केवळ राज्य सरकारला टार्गेट करण्याच्या उद्देशाने वानखेडे यांनी कारवाई केली होती, हे मलीक यांनी पुराव्यानिशी समोर आणलं, त्यामुळे भाजपाची चांगलीच गोची झाली. या प्रकरणाबाबत भाजपावाले आता तोंड लपवू लागले.

मुर्हूत अजुनही पाहितलं जातं

सरकार पडणार, आमचं सरकार येणार असं गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. भाजपावाल्यांना ह्या सरकारची इतकी काय ऍलर्जी आहे हेच समजेना? विरोधात भाजपाला बसू वाटेना. सत्तेशिवाय भाजपाला झोप येत नाही का? सत्ता मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायचा उद्योग सुरु आहे. युती तोडून भाजपाने स्वत:च आपल्या पायावर धोंडा मारुन घेतलेला आहे. त्यामुळे आता रडीचा डाव खेळण्यात फायदा काय? महाआघाडी सरकार भ्रष्ट आहे. इतका भ्रष्टाचार आता पर्यंत कोणत्याच सरकारच्या कार्यकाळात झाला नाही, असा एक चुकीचा प्रचार भाजपावाले करत असतात. किरीट सोमय्या हे रोज काही ना काही चुकीचे दावे करत असतात. सोमय्या यांनी आता पर्यंत जे आरोप केले. त्यातील एक ही आरोप पुराव्यानिशी ते सादर करु शकले नाहीत. नुसत्या हवेत गोळ्या झाडण्याचं काम सोमय्या करत असतात. हिंसाचार सारख्या घटनेला खतपाणी घालण्याचे काम केले जावू लागले. अमरावती येथे जातीय हिंंसा भडकली होती. त्यात भाजपाने काडी टाकण्याचे काम केल्याचे समोर आलेेले आहे. राज्य अस्थिर कसं होईल याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार पडणार, म्हणुन गेल्या दोन वर्षापासून मुर्हूत सांगीतलं जात आहे. भाजपाचे नेते सरकार पडण्याच्या तारखा घोषीत करुन नवीन मंत्रीमंडळाची यादी खिशात घेवून फिरत असतात. सरकार काही पडत नाही. भाजपाचे नेते मर्हुत सांगण्याचे काही थांबत नाही. तीन्ही पक्षात अलबेल आहे. त्यामुळे भाजपाने विरोधात चांगली भुमिका निभावून विरोधी पक्ष नेत्यांची भुमिका पार पडायला हवी. विरोधकांनी नेहमीच वैचारीक व्यक्त झालं पाहिजे. तसा वैचारीकपणा विरोधकात दिसत नाही. केंद्रात भाजपाला विरोधक ठेवायचे नाहीत, आणि राज्यात इतरांना सत्तेत बसू द्याचयं नाही अशीच अघोरी राजकीय निती भाजपावाले वापरू लागले. ‘‘आम्ही सत्तेत असलो तरच सगळं काही चांगलं आणि इतर सत्तेत बसले की वाईट’’ अशी विचारश्रेणी भाजपाची आहे का? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सरळ मनाचे आहेत. त्यांना कधी सत्तेचा अहंकार झाला नाही, तसा तो दोन वर्षात तरी दिसून आला नाही. राज्यातील लोकांनी त्यांना स्विकारलं. देशातील सगळ्यात चांगले मुख्यमंत्री म्हणुन त्यांचा लौकीक होत आहे ही महाराष्ट्राच्या मानाने भुषणाची बाब आहे. भाजापाने आपलं राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादीत ठेवलं पाहिजे. खुनशीपणाने राजकारण करु नये. महाराष्ट्र नेहमीच विचारात अग्रेसर राहिलेला आहे, तो पुढे तसाच रहावा असचं राजकारण करणं हे राज्याच्या हिताचं आहे. सत्ता येत असते, जात असते, पण सत्तेसाठी वेगवेगळे पायंडे पाडून राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न होवू नये. दोन वर्ष महाआघाडीला झाली. आणखी तीन वर्षही होतील अशीच आजची राज्यातील राजकीय परस्थिती आहे, त्यामुळे विरोधक भाजपाने सरकार पडण्याचं मुर्हूत पाहणं बंद केलं पाहिजे.

Most Popular

error: Content is protected !!