Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- कॉंग्रेसविना दिल्ली जिंकणं अशक्य

प्रखर- कॉंग्रेसविना दिल्ली जिंकणं अशक्य

२०२४ च्या लोकसभा निवडणुका लांब असल्या तरी त्याची चर्चा आता पासूनच होवू लागली. कोण कोणावर मात करेल, आघाडी होईल की नाही. कॉंग्रेस कुठल्या भुमिकेत असेल, कॉंग्रेसचं काय होईल असे विश्‍लेषण केले जावू लागले. भाजपा हा तुल्यबळ पक्ष आहे. भाजपाने दोन्ही निवडणुकीत चांगले यश मिळवले. त्यामुळे भाजपाला सहजा, सहजी हरवणे हे शक्य नाही. रणनिती करुनच भाजपाला हरवता येऊ शकते. नुसत्या मोकळ्या गप्पा मारुन आणि दोन, चार पक्षाला सोबत घेवून कधीच भाजपाचा पराभव केला जाऊ शकत नाही. भाजपाच्या विरोधात महागाईमुळे जनतेत रोष आहे. इंधनाचे दर दुपटीने वाढले. खाद्य तेल वाढले. यासह अन्य मुद्दयांना घेवून निवडणुकीला सामोरे जाता येते, पण तितकं जनमत निर्माण करता आलं पाहिजे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. काही प्रादेशीक पक्ष आपल्या राज्यापुरतं राजकारण करण्यात धन्यता मानत असतात. काहींना दिल्लीचे स्वप्न पडत असतात, यापुर्वी मुलायमसिंह यादव, शरद पवार, नितीशकुमार, मायावती यांना पंतप्रधानपदाची आस होती, पण त्यांचे स्वप्न पुर्ण होवू शकले नाही. महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न अनेक वेळा झालेला आहे. त्याचा तितका प्रभाव पडला नाही. कॉंग्रेस नंतर एक हाती सत्ता आली ती भाजपाच्या ताब्यात. मध्यंतरी म्हणजेच १९८९ ते १९९९ दरम्यान, देशात स्थिर सरकार नव्हतं. भाजपाच्या रुपाने स्थिर सरकार आलं असलं तरी भाजपाची राजकीय नीती ही हुकुमशाही वृत्तीची असल्याने या राजकीय वृत्तीला लोकांचा विरोध होवू लागला. दहा वर्षानंतर राजकारणात बरेच बदल होत असतात. २०२४ साली भाजपाच्या सत्तेला दहा वर्ष पुर्ण होतील. आगामी निवडणुकीत आपला प्रभाव दाखवण्यासाठी कॉंग्रेस,भाजपा आणि ममता बॅनर्जीसह अन्य काही घटक पक्ष जोमाने तयारीला लागू लागले.

ममता यांची भेट

पश्‍चिम बंगाली निवडणुक ममता बॅनर्जी यांनी स्वत:च्या हिंमतीवर जिंकली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची केंद्राच्या राजकारणात चर्चा होवू लागली. बलाढ्य भाजपाला ममता यांनी हरवलं. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय राजकारणात कौतूक होवू लागले. ममता यांचा राजकीय प्रवास जुना असला तरी त्याचं मुळ पुर्वी कॉंग्रेसमध्ये होतं. त्या काही वर्ष केंद्रात मंत्री होत्या. एक महिला असून ही राजकारणात त्या खंबीर आहेत. ममता यांनी मुर्ंबइत येवून खा. शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यात चर्चा झाल्या. ममता यांच्या मुंबई भेटीचं कारण म्हणजे त्या केंद्रात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. आपल्या सोबत कोण, कोण येतयं याची त्या चाचपणी करत असाव्यात. शिवसेना पुर्वीपासून ममता यांना जवळची मानते. शिवसेनेने नेहमीच ममता याचं कौतूक ही केलेलं आहे. ममता यांनी शिवसेनेच्या नेत्यासोबत ही चर्चा केल्या आहेत. ममता यांनी यापुर्वी कधी मुबंईत येवून अशा भेटीगाठी घेतल्या नव्हत्या. उद्योजक आणि काही फिल्म क्षेत्रातील लोकांसोबत त्यांनी चर्चा केल्या. एकुणच आपलं राजकारण प्रभावी ठरावे या उद्देशाने ममता ह्या आपल्या विचाराच्या राजकीय नेत्यांसह आणि विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या ह्या भेटी किती फलदायी ठरतील हे आगामी काळात दिसून येईल.

प्रशांत किशोर यांची निती

प्रशांत किशोर हे राजकारणातील रणनितीकार म्हणुन ओळखले जातात. राजकारणात फक्त रणनिती करुन फायदा होत नसतो, त्याला तसे कामे करावे लागतात, तेव्हाच जनता लोकप्रतिनिधीकडे वळत असते. नुसत्या रणनीत्या ठरवून खुर्च्या मिळवता येत नाही. काहींचा असा समज आहे की, ज्यांच्याकडे प्रशांत किशोर यांची रणनिती आहे. त्यांच्याकडे कोणतंही पद जातं? किशोर गेल्या एक वर्षापासून चांगलेच चर्चेत आले. त्यांनी अनेकांना राजकारणाची रणनिती ठरवून दिली, आणि ते यशस्वी झाले असं काही विश्‍लेष्काचं म्हणणं आहे. किशोर यांनी यापुर्वी कॉंग्रेसचे राहूल गांधी यांची भेट घेतली होती, ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असं ही ठरलं होतं, पण त्यांच्या प्रवेशाला कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला. कॉंग्रेसमध्ये त्यांना चांगलं पद हवं होतं असं ही समजलं जातं. त्याचं आणि कॉंग्रेसचं पटलं नाही. त्यामुळे ते कॉंग्रेस पासून दुर झाले. त्यांनी तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते ममता बॅनर्जी यांना मार्गदर्शन करत आहे. पवार, शिवसेना यांची जी भेट झाली ती भेट किशोर यांच्या रणनितीचाच भाग असावा. अशा भेटीगाठीतून फक्त प्रसिध्दी माध्यमात चर्चा होत असतात. त्यातून विशेष काही साध्य होत नसतं. किशोर हे कॉंग्रेसला प्रभावहीन समजत आहेत, तेच किशोर काल कॉंग्रेसच्या दारात जावून पद मागत होते, म्हणजे आपलं जमलं तर सगळं काही चांगलं आणि नाही जमलं की वाईट हीच रणनिती किशोर यांची आहे का?

चमत्काराची आशा

ममता बॅनर्जी यांना वाटतं आगामी काळात काही तरी चमत्कार घडेल. भाजपाला कमी जागा मिळाल्या आणि प्रादेशीक पक्षांच्या जागा बर्‍यापैकी आल्या तर आपण त्यात निर्णायक ठरू शकतोत. या सगळ्या गोष्टी ह्या जर, तरच्या आहेत. यापुर्वी अल्पमतावर सरकार बनलेलं आहे, आणि कोसळलेलं सुध्दा आहे. अटलबिहारी याचं सरकार दोनदा अल्पमतावर पडलेलं आहे. एकदा तर फक्त एका मताने सरकार पडलं होते. १९८९ या काळात लोकसभेची निवडणुक झाली. या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला केवळ १९१ जागा मिळाल्या. तर व्ही.पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाला १४१ जागा मिळाल्या. भाजपाला ही ८६ तर कम्युनिष्ट पक्षांना ४४ जागा मिळाल्या होत्या. कॉग्रेसने सत्तेचा दावा केला नाही. जनता दलाचे व्ही. पी सिंग यांना भाजप, कम्युनिष्ट पक्षाने बाहेरुन पाठींबा दिला. त्यामुळे व्ही. पी सिंग पंतप्रधान होवू शकले. असंच काही तरी होईल आणि आपण पंतप्रधान होतोल असं तर ममता यांना वाटत नाही?

कॉंग्रेस टक्कर देवू शकतो

दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला विरोधीपक्ष नेतेपद मिळाले नाही, त्यामुळे कॉंग्रेस पक्ष भविष्यात चांगली कामगिरी करेल का याचा अनेकांना विश्‍वास वाटत नाही, पण कॉंग्रेस पक्ष हा भाजपाला टक्कर देवू शकतो हे नाकारुन चालणार नाही. आज फक्त तीन राज्यात कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या पश्‍चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणुकीत कॉंग्रेस आपली विशेष कामगिरी दाखवू शकला नाही. सतत कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागत असल्याने कॉंग्र्रेसचे कार्यकर्ते ही नेहमीच संभ्रमात आणि द्विधा मनस्थितीत असतात. कॉंग्रेसचे बुर्जुग नेते नेहमीच काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करुन पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांचं जनतेत अस्तित्व नाही, अशी मंडळी पक्षाच्या विरोधात बंड करुन उठतात. त्यांच्या बंडाचं नवल वाटतं. अनेक पदे भोगल्यानंतर ही ज्येष्ठांची कुरकुर सुुरु आहे, ही पक्षनिष्ठा असू शकते का? पक्ष चुकीचं वागत असेल तर अंधारात चार कानगोष्टी सांगणं हे ज्येष्ठाचं कर्तव्य असतं, मात्र जाहीरपणे वाभाडे काढणे योग्य आहे का? कॉंग्रेस पक्षाची सर्व कमांड राहूल गांधी यांच्यावर आहे. राहूल गांधी यांचा विशेष करिष्मा दिसून येत नसला तरी भाजपाला प्रखरपणे विरोध करण्याचं काम राहूल गांधी हे करत असतात, हे कमी आहे का? इतर कुणीही भाजपाच्या विरोधात तीव्रतेने बोलत नाही. भाजपाच्या विरोधात बोलणं म्हणजे काहींना भीती वाटते. त्यामुळे काही नेते भाजपाच्या विरोधात बोलणं टाळतात. सध्या ममता बॅनर्जी ह्या केंद्राच्या विरोधात आक्रमण भुमिका घेवू लागल्या. भाजपाच्या विरोधात लढणं हे एक, दोन पक्षाचं काम नाही. केंद्रीय पातळीवर आघाडी करायची असेल तर त्या आघाडीत कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, तेव्हाच आघाडीत जीव येवू शकतो. कॉंग्रेस पक्ष आज पराजीत असला तरी कॉंग्रेसचं ‘बळ’ आहे. या पक्षाचा गावात एक तरी कार्यकर्ता आहे. तसं इतर पक्षाचं नाही. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौर्‍यावरुन जी काही राजकीय खळबळ माजली. या बाबत खा. शरद पवार यांनी कॉंग्रेस शिवाय आघाडी होणं शक्य नाही, असं महत्वाचं विधान केलं. शिवसेनेची ही तिच भुमिका आहे. त्यामुळे एकट्या ममता यांनी दंडाच्या बेंडकुळ्या दाखवून फायदा नाही. आघाडीत कॉंग्रेस असली तरच भाजपाशी दोन हात करता येईल. तसं न झाल्यास २०२४ ला सगळे आप, आपल्या पध्दतीने लढले तर ही लढाई लुटूपुटूची ठरु शकते. त्यात विशेष काही साध्य होईल असं वाटत नाही.

Most Popular

error: Content is protected !!