Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबीड शहर पोलिसांची तोंड बघून वसुली

बीड शहर पोलिसांची तोंड बघून वसुली


बीड (रिपोर्टर) सध्या एसटी कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणार्‍या एसटी बंद असल्याने शेतकर्‍यांना बीडमध्ये छोट्या-मोठ्या कामासाठी, शेतीच्या खरेदीसाठी दुचाकीवर यावे लागते. मात्र ग्रामीण भागातून आलेल्या शेतकर्‍याची बीड शहर पोलीस वाहतुकीच्या नियमावर बोट ठेवून त्यांच्या खिशावर दरोडा टाकतात तर बीड शहरातील ट्रिपल सीट नागरिकांची साधी विचारपूसही करत नाहीत. त्यामुळे तोंड बघून होणारी वसुली बीड शहर पोलिसांनी थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.


एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या मोठ्या खरेदीसाठी बीड शहरात दुचाकीवर यावे लागते. अशा वेळेस बीड शहर पोलीस ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनाच बाजुला घेऊन त्यांची एखाद्या अपराध्यासारखी विचारपूस करतात. तुझ्याकडे लायसेन्स आहे का, गाडी तुझीच आहे का, असे एक ना अनेक प्रश्‍न करून त्यांना सक्तीने चलन देतात. मात्र दुसरीकडे त्यांच्या समोरून शहरातील नागरिक ट्रिपल सीट सुसाट जातात. त्यांना साधे विचारलेही जात नाही. त्यामुळे बीड शहर पोलिसांनी तोंड बघून वसुली करणे थांबवावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतून होत आहे. याबाबत एका शेतकर्‍याने शहर पोलीस ठाण्याचे पीआय यांना अशी वसुली करू नका, अशी विनंती केली असता ‘तु आम्हाला सांगणारा कोण, तुझ्यावर गुन्हा दाखल करू का’ असे म्हणून त्याला धमकी दिली. शेतकर्‍यांची ही पिळवणूक थांबली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!