Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडलक्षणं नाहीत तरीही 19 वृद्ध पॉझिटिव्ह, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

लक्षणं नाहीत तरीही 19 वृद्ध पॉझिटिव्ह, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल


आज सर्वांच्या सिटीस्कॅनसह अन्य चाचण्या, जिल्ह्याचे आरोग्य विभाग खडबडून जागे, जिल्हा रुग्णालयात येणार्‍या प्रत्येकाची झाली कोरोना चाचणी
बीड(रिपोर्टर) डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा बाहेर जाणार्‍या 22 वृद्धांची कोरोना अँटीजेन चाचणी केल्यानंतर त्यात तब्बल 19 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यामुळे जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून आज जिल्हा रुग्णालयामध्ये येणार्‍या प्रत्येक रुग्णासह नातेवाईकांची अँटीजेन चाचणी बंधनकारक करून तपासण्या करण्यात आल्या. वडवणीत जे 19 रुग्ण बाधीत आढळून आले होते त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांना कोरोनाचे कुठलेही लक्षण नाहीत. असे असताना ते पॉझिटिव्ह आल्यामुळे आज त्यांच्या सिटीस्कॅनसह अन्य चाचण्या करण्यात येणार आहेत. या दोन महिन्यांच्या कालखंडात एकाच वेळी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ.


डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी अहमदनगरला निघालेल्या 22 वृद्धांची काल कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये 19 जण बाधीत आढळले. त्या सर्वांना बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. संतोष धूत हे त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. उपस्थित 19 रुग्णांना कुठलेही लक्षणे नाहीत. शासनाच्या गाईड लाईननुसार ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. परंतु कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आल्याचे डॉ. धूत यांनी सांगितले. आज या सर्वांच्या सिटीस्कॅनसह अन्य कोरोना चाचण्या करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले. हे सर्व वडवणी तालुक्यातील असल्याने त्या परिसरात खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांच्या कालखंडात प्रथमच एकाच वेळी 19 रुग्ण आढळून आल्याने जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. आज सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी स्वत:हून रुग्णालयाच्या परिसरात आणि रुग्णालयात राऊंड मारत नवीन रुग्णांसह रुग्णालयात येणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली. रुग्णालयात जे येईन त्याच्या चाचण्या करा, असे सक्त आदेश या वेळी डॉ. साबळे यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!