Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमनांदुर फाट्यात 14 महिन्याच्या मुलीचा बंधार्‍यात मृतदेह ,घातपाताची शक्यता

नांदुर फाट्यात 14 महिन्याच्या मुलीचा बंधार्‍यात मृतदेह ,घातपाताची शक्यता

कालपासून मुलगी होती बेपत्ता, घातपाताची शक्यता, नेकनूर पोलिसांनी चौकशीसाठी संशयितांना घेतले ताब्यात
नेकनूर (रिपोर्टर) कालपासून बेपत्ता असलेल्या 14 महिन्याच्या मुलीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या बंधार्‍यात आज सकाळी आढळून आल्याने नांदूरफाटा परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या तोंडावर थोड्याफार जखमा आढळून येत असून ही दूर्घटना नाही तर घातपात असल्याचे प्रथमदर्शी स्पष्टपणे दिसून येत असल्याने 14 महिन्याच्या मुलीची हत्या कोणी व का केली? अशी चर्चा होत असतानाच पोलिसांनी मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी डेरेदाखल होत चौकशीसाठी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते.
   याबाबत अधिक असे की, नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या नांदूरफाटा येथील बाबासाहेब पडुळकर यांची 14 महिन्यांची मुलगी कालपासून बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेतला जात होता. आज सकाळी 14 महिन्याच्या अक्षराचा मृतदेह पडुळकर यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका बंधार्‍यात तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा, विलास जाधव, क्षीरसागर, सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन बंधार्‍याच्या पाण्यात तरंगत असलेल्या अक्षराचा मृतदेह बाहेर काढत घटनास्थळ पंचनामा केला. या वेळी तिच्या चेहर्‍यावर काही खुणा आढळून आल्या. प्रथमदर्शी पाहणार्‍यांना अक्षराची दुर्घटना नव्हे तर घातपात असल्याचा संशय आला. अक्षराची हत्या का व कशासाठी झाली, यावर गावात चर्चा होत असून उत्तरीय तपासणीसाठी अक्षराचा मृतदेह अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. 14 महिन्याच्या निरागस मुलीचा मृतदेह सापडला आणि तिची हत्या झाल्याची चर्चा होत असल्याने नेकनूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

Most Popular

error: Content is protected !!