Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- विद्यवत्तेपेक्षा पैशाला महत्व, कुंपनच शेत खावू लागलं

प्रखर- विद्यवत्तेपेक्षा पैशाला महत्व, कुंपनच शेत खावू लागलं


प्रशासन कसं चालवायचं, त्याला कशी शिस्त लावायची हे शासनाच्या कार्यप्रणालीवर अवलंबून असतं. राजकारणात तितका चांगलेपणा राहिला नाही. त्यामुळे प्रशासनावर वचक नाही. राज्याच्या प्रत्येक खात्यात काही ना काही दोष असतात. ज्यांची सत्ता असते. त्या पक्षातील लोकप्रतिनिधी आपल्याला चांगले खाते मिळावे यासाठी प्रयत्नात असतात. चांगले खाते म्हणजे चांगलं उत्पन्न देणारे मग ते उत्पन्न कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या मंत्र्याकडे येत असतं. खात्या अंतर्गत जी काही कामे असतात. त्यात सरळ, सरळ व्यवहार पध्दत असते. टक्केवारी घेतल्याशिवाय कामे होत नाही हे सगळ्यांना माहित आहे. अगदी जिल्हा कार्यालयापासून ते मंत्र्यालयापर्यंत ही साखळी असते. साखळी पध्दतीने लुटा,लुटीचा धंदा जोमाने सुरु असतो. सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्यात अशा गोेष्टी होत नाही असं थोडचं आहे, पण त्यात कमी,अधिक प्रमाणात गैरप्रकार होत असतात. काही गैरप्रकार उघडकीस येतात. काही उघडकीस येत नाहीत. आज महाआघाडीचं सरकार आहे, हे सरकार तीन पक्षाचं असल्याने तिन्ही पक्षाकडे महत्वाची खाते आहेत. सरकार स्थापन होवून दोन वर्ष झाली. या दोन वर्षात अनेक प्रकरणं ह्या सरकारची बाहेर आली. गैरप्रकारामुळे अनिल देशमुख सारख्या मंत्र्याला पदाला मुकावे लागले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना जेलची हवा खावी लागली. अन्य काही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या खात्यात नौकर भरती होत असते. काही भरती प्रक्रिया सुरळीत चालते आणि काही भरती प्रक्रियेत गोंधळ होतो. या गोंधळात भ्रष्टाचाराचा शिरकाव झालेला असतो. त्यात अनेकांचे हात गुंतलेले असतात.

आरोग्य विभागाचे लक्तरे
आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. रिक्त जागा वेळेवर भरल्या जात नाहीत. जागा न भरण्याचं कारण म्हणजे सरकारकडे तितकं बजेट नसतं. त्यामुळे सरकार आहे त्या कर्मचार्‍यावरच काम चालवत असतं. कोवीडच्या कार्यकाळात आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या तुटवड्यामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण पडला होता. कंत्राटी पध्दतीवर कर्मचारी नियुक्त करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. कायम स्वरुपी जागा भरण्यासाठी अजुनही आरोग्य विभाग हालचाल करत नाही, ही दुर्देवाची बाब आहे. आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्याची परिक्षा झाली. परिक्षेत गैरप्रकार झाला. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची सायबरकडून चौकशी सुरु झाली. चौकशीत पेपर फुटल्याचे निष्पन्न झालं. यात बीडसह लातूर येथील पाच जणांना अटक करण्यात आली. अन्य काही जणांवर ही कारवाई झाली. पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. पैसे घेवून पेपर फोडण्यात आला. काही उमेदवारांनी नौकरीसाठी दलाल, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या माध्यमातून लाखो रुपये दिलेले आहेत हे आता पर्यतच्या चौकशीत समोर आले. ज्यांनी पैसे दिले ते लोक ही चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची शक्यता आहे, ही साखळी खुप मोठी असू शकते. अलीकडच्या काळातील पेपर फुटीचा हा सर्वात मोठा प्रकार आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाची इभ्रत मातीत मिसळली गेली.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आज पर्यंतचे काम चांगले असले तरी त्यांच्या खात्यातील अधिकारी, कर्मचारी किती भ्रष्ट आहेत हे यातून दिसून आले. टोपे यांची आरोग्य विभागावर वचक नाही का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे, पेपर फुटीच्या प्रकरणाला आरोग्य मंत्र्यालाच सामोरे जावे लागणार आहे, त्याचं उत्तर आरोग्य मंत्र्याकडे असेल का?


म्हाडाचा पेपर रद्द केला
एखादी घटना घडल्यानंतर पुढे साधवगिरीने पाऊल टाकलं जातं. आरोग्य विभागाचा पेपर फुटला त्याची सर्वत्र चर्चा होत असतांनाच रविवारी म्हाडाची परिक्षा होती. या परिक्षेचा पेपरही फुटल्याची कुणकुण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना झाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री सोशल मीडीयावर पेपर रद्दची घोषणा केली. रात्री पेपर रद्द झाल्याची बातमी सगळीकडे पोहचली नव्हती. जेव्हा बहुतांश विद्यार्थी रविवारी सकाळी पेपर देण्यासाठी परिक्षा केंद्रावर गेले. तेव्हा त्यांना तेथे पेपर रद्दची माहिती कळाली. काही विद्यार्थी इतर ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेले होते. त्यांच्यासाठी हा प्रकार अंत्यत दुर्देवी होता. अचानक पेपर रद्द झाल्यामुळे उमेदवारात संताप व्यक्त केला जात होता. त्यांचा हा संताप बरोबरच आहे. म्हाडाच्या प्रकरणात काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेपर अचानक रद्द करायचा म्हणजे हा प्रशासनाचा निव्वळ फालतूपणा आहे, करतं एक आणि भोगावं लागतं सगळ्याना असाच प्रकार आहे. परिक्षा रद्द केल्यामुळे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागीतली असली तरी माफी मागून काय होणार आहे. विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं ते भरुन थोडचं येणार आहे. परिक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी रात्र-दिवस एक करत असतात. इतकी मेहनत घेवून परिक्षा रद्द होते, म्हणजे हे विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळण्यासारखचं आहे. परिक्षा लांबत गेल्यामुळे अनेक तरुणांचे वय निघून जाते. एकदा वय निघून गेले की, त्यांना पुन्हा परिक्षेला बसता येत नाही. विद्यार्थ्याचं जे नुकसान होत आहे. त्याला शासन जबाबदार असून शासनाने आपली जबाबदारी निट पार पाडली पाहिजे. जेणे करुन विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. आरेाग्य आणि म्हाडाच्या परिक्षेत हजारो विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यांनी फार्म भरण्यापासून ते तयारी करण्यासाठी आर्थिक झळ सहन केलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा दुसर्‍यांदा कधी परिक्षा होते याची वाट पाहत बसण्याची वेळ आली आहे. प्रशासनावर विश्‍वास ठेवावा की नाही असचं झालं आहे.


आता पर्यतच्या भरतीचं काय?
आरोग्य विभागातील पेपर फुटीचा प्रकार समोर आल्यानंतर सगळेच आवाक झाले. नौकरीसाठी पैसे द्यावे लागतात, असं अनेक वर्षापासून काही लोक म्हणत आले, फुकट नौकरी लागत नाही असं लोक उघड, उघड बोलत असतात. त्यांचं हे म्हणणं आज खरचं आहे असं आता वाटू लागलं. नौकर भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी ऑनलाईन, नवं तंत्रज्ञान यासारख्या बाबी समोर आल्या. त्यात ही गैरप्रकार होत आहे हे लपून राहिलं नाही. आता पर्यंत ज्या काही नौकर भरत्या झाल्या आहेत. त्यात गैरप्रकार झाला नसावा हे कशावरुन? अनेक तरुण नौकरी लागल्यानंतर सांगत असतात, नौकरीसाठी इतके, इतके लाख रुपये खर्च केले, तेव्हा कुठं नौकरी लागली? काही तरुणांची नौकरीसाठी जमीन, घर विकण्याची तयारी असते, नौकरी ही आज सर्वस्व मानली जाते. शेती, व्यवसाय हे दुय्यम ठरले आहेत. शिपाई का असेना नौकरी हवी अशी लोकांची समज झालेली आहे. नौकरी लावतो म्हणुन काही भामटे लोकांची फसवणुक करतात. यात कित्येक लोक फसत असतात. असे फसवणुकीचे प्रकार पोलिस ठाण्यात पर्यंत येत असतात. नौकर भरतीत अनेक जण गडगंज झाले हे नाकारुन चालणार नाही. भरती प्रकरणाचं रॅकेट आहे. त्यात काही प्रशासनाचे अधिकारी, राजकीय पुढारी, पुढार्‍यांचे पीए याचा समावेश असतो. त्यांच्यावर कुठलीही कारवाई अथवा त्यांची कधी चौकशी होत नाही, ही लाच्छांस्पद बाब आहे. प्रशासन आणि शासन कसं पैशाच्या मागे फिरत आहे. चुकीचं कामे करत आहे हे भरतीच्या प्रक्रियेतून समोर आलं आहे.


काय कारवाई होणार?
पैसा फेकला की, काहीही होतयं हे लोकांच्या अंगवळणी चांगलंच पडलं. त्यामुळे लोक गुन्हे करायला भीत नाही. परिक्षा खाजगी कंपनीच्या माध्यमातून घेतली जात आहे. त्यामुळे हा सगळा घोळ होवू लागला. सरकार इतकं आळशी आणि बिनकामाचं झालं की, त्याला परिक्षा घ्यायला वेळ नाही, ते कंत्राटी पध्दतीने भरती करण्याचे काम देत आहे. कंत्राटी पध्दत ही किती पारदर्शक आहे याचा विचारच शासन कधी करत नाही. पैसे देवून पेपर विकत घेता येतो हे किती सोपं काम म्हणावं लागेल? जेव्हा प्रशासन चालवलं जातं. तेव्हा त्यावर संबंधीत खात्याची नजर असली पाहिजे. आपल्या खात्यात काय चाललं हे पाहण्याचं काम संबंधीत विभागाच्या मंत्र्याचं असतं, पण आजचे मंत्री महोदय यांना तितका वेळ नसतो. पैशावाल्यांनाच जर नौकर्‍या लागत असतील आणि गोर-गरीब असे उपाशी राहत असतील तर गरीब मुलात उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. नौकरीच्या तयारीसाठी दरवर्षी लाखो मुलं अभ्यास करत असतात. पैशा पेक्षा विद्यवत्तेला महत्व आहे असं ते मानत असतात. आरोग्य विभागाच्या भरतीवरुन मुलांचा विश्‍वास उडाल्याशिवाय राहणार नाही. विद्यवत्तेला नव्हे तर पैशाला महत्व आहे हे यातून दिसून येवू लागलं. आरोग्य विभागाचा पेपर फोडणार्‍याविरोधात अशी कारवाई करु, नंतर असं करण्याचं कुणी धाडस करणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. त्यात किती तथ्य असेल हे येत्या काळात दिसून येईल. प्रशासनात किती भ्रष्टपणा आहे हे नेहमीच दिसून आलेलं आहे. त्यात भरती प्रकरणाची भर पडली. प्रशासन स्वच्छ असेल तरच सर्वसामान्यांना न्याय मिळेल. प्रशासनालाच वाळवी लागलेली असेल तर सर्वसामान्यांना कधीच न्याय मिळू शकणार नाही. इथं कुंपनच शेत खावू लागलं.

Most Popular

error: Content is protected !!