Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमफरार गुटखा माफिया मुळे अखेर गजाआड

फरार गुटखा माफिया मुळे अखेर गजाआड


बीड (रिपोर्टर) गुटख्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद होण्याचे सत्र सुरु असताना ही फरार राहून बिनबोभाटपणे रॅकेट चालविणार्‍या माफियाला जेरबंद करण्यात अखेर बीड पोलिसांना यश आले. साडेतीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत औरंगाबाद, पुणे येथे फिरत होता. दरम्यान, 15 डिसेंबर रोजी पहाटे शहरातील गंगाधाम परिसरातील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली.


महारुद्र उर्फ आबा नारायण मुळे (रा.घोडका राजुरी, हमु, जालना रोड, गंगाधाम, बीड) असे त्या माफियाचे नाव आहे. पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी सप्टेंबर 2021 मध्ये घोडका राजुरी (ता.बीड) येथे गोदामावर छापा टाकून 62 लाख 81 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणात पिंपळनेर ठाण्यात महारुद्र मुळे सह अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा नोंद झाला होता. पाठोपाठ 13 ऑक्टोबर रोजी केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांनी नेकनूर ठाणे हद्दीत
गुटख्यावर धाडसत्र राबवले होते. मांजरसुंबा येथे गुटखा वाहतूक करणारे दोन ट्रक (केए 56-1167, केए 56-0711) पकडले होते. दोन्ही ट्रकसह गुटखा असा एकूण 57 लाख 24 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मांजरसुंब्यातील कारवाईनंतर चौसाळा (ता.बीड) येथे एका गोदामावर छापा टाकून सात लाख 4 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.


चौकशीत हा गुटखा महारुद्र मुळे याने मागविल्याचे समोर आले. दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यात महारुद्र मुळेचा आरोपी म्हणून समावेश होता. पिंपळनेर ठाण्यात गुन्हा नोंद होऊनही तो गुटख्याचे रॅकेट चालवित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तो पोलिसांच्या रडारवर होता. दरम्यान, तो 14 डिसेंबर रोजी रात्री घरी असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी पोलीस कल्याण विभागाचे सहायक निरीक्षक योगेश खटकळ यांच्यावर अटकेची जबाबदारी सोपविली. खटकळ यांनी सहकार्‍रूांना सोबत घेऊन गंगाधाम येथील घरातून त्यास 15 रोजी पहाटे अडीच वाजता ताब्यात घेतले. त्यास पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यास न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!