Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeसंपादकीयरोखठोक- हिंदुत्वाच्या राजकारणात हिंदू धर्माची हानी

रोखठोक- हिंदुत्वाच्या राजकारणात हिंदू धर्माची हानी

गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कुठल्या तरी पोथीची हुकमत माणसाचे विचार दडपण्यासाठी वापरायचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतो. पोथीनिष्ठ कर्मठतेविरुद्ध पुकारलेल्या बंडात येथे बर्‍याच वेळा बंडखोरांचा विजय झाला. ज्ञानेश्वर आणि त्याच्या भावंडांवर वाळीत टाकणारे ब्राह्मण इतिहासजमा झाले. ज्ञानोबाची आळंदी तीर्थक्षेत्र झाले. आंबेडकरांच्या महाडच्या सत्याग्रहामुळे तळे पतित व्हायच्या ऐवजी पुनित झाले. त्याचे गोमूत्राने शुद्धी करणारे ब्राह्मण इतिहासांत केवळ हास्यास्पद ठरले. हिंदू परंपरेत खास वाखाणण्यासारखे काही असेल तर ते हेच आहे.

जगाच्या पाठीवर अठरापगड जाती, विविध धर्म आणि शेकडो उपजातींना आपल्या पदराखाली घेवून भारत माता कित्येक वर्षापासून सहष्णुतेबरोबर अन्यायाविरूद्ध ताठरतेने उभी राहतांना दिसून आली आहे. जेंव्हा केंव्हा नतदृष्टांनी भारत मातेच्या पदराला हात घालण्याचा प्रयत्न केला तेंव्हा-तेंव्हा भारत मातेच्या सपुतांनी कधी बुद्ध होवून तर कधी सम्राट अशोक होवून, कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपात जन्म घेवून तर कधी-कधी शाहु, फुले, आंबेडकरांपासून गांधी, भगतसिंह-राजगुरू-सुखदेव यांच्या रूपात त्यांचे हात छाटले. यासर्वांचा कर्तव्यकर्माचा कार्यकाळ हा धर्म अभिमानापेक्षा माणुस धर्माला जागृत करणारा आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारा आहे. मात्र २१ व्या शतकाची चाहुल लागली अन् पारतंत्र्याच्या साखळदंडात २०० वर्षे अडकलेल्या भारत मातेला इ.स.१९४७ साली अनेक हुतात्मयातून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर अखंड जातींना सोबत घेवून प्रत्येक धर्माचा आदर राखण्याची शिकवण देणार्‍या भारत मातेच्या पत्राला अनेक वेळा धर्म, जातीवाद यांच्या दंगलीतले रक्ताचे डाग लागले. ते धर्म वाचवण्यापेक्षा सत्ताकारणातील खुर्ची हिसकावण्यासाठी लागल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले. हिंदुत्त्वाचं राजकारण हिंदु धर्माची हानी ठरणारं जसं ठरत आहे तसच मुस्लिम आणि दलित वोट बँकेचं राजकारण त्यांना स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही विकासापासून लांब ठेवत आहे. आता पुन्हा त्याच जातीय विषमतेपेक्षा विष कल्लोळाचा सर्रास वापर जेंव्हा होतांना दिसतो तेंव्हा एकटा भाजप हा हिंदुत्त्वाच्या मुद्यावर केंद्रस्थानी राहतो. परंतू कधी हिंदुंकडे वोट बँक म्हणून न पाहणार्‍या


कॉंग्रेसचे हे पाप
आहे का? याचा शोध आणि बोध घेण्याची नक्कीच गरज नाही. कारण भुगोलाबरोबर इतिहास असणार्‍या अखंड हिंदुस्तानात स्वातंत्र्यानंतर जी लोकशाही आली आणि त्या लोकशाहीत ज्या निवडणुका होत गेल्या त्या समाजकारणापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व देणार्‍या ठरत राहिल्या. कॉंग्रेसने इ.स.१९४७ नंतर ज्या काही निवडणुका लढल्या त्या पहिल्या दशकात स्वातंत्र्याचा विजय उत्सव ठरल्या. परंतू नंतरच्या निवडणुकांमध्ये सत्ताकारणाची हाव जशीच कॉंग्रेसच्या मस्तकात भिनली तशी जात,पात,धर्म,पंत याला निवडणुकी दरम्यान अधिक महत्त्व प्राप्त होत गेले. मुस्लिमांबरोबर दलितांचे आपणच कैवारी असल्याचे कॉंग्रेसने वेळोवेळी दाखवून त्या वोट बँकेवर २०१४ पुर्वीपर्यंत कॉंग्रेसने देशावर आधिराज्य गाजवले. सर्वात जास्त देशाचा कारभार करणार्‍या कॉंग्रेसला मुस्लिम आणि दलितांच्या आर्थिक विकासाचा स्तर वाढवण्याचे भान कधी राहिले नाही. केवळ निवडणुका आल्या की, मुस्लिम, दलितांची वोट बँक डोळ्यासमोर ठेवून जातीचे गणित आणि धर्माचे भागाकार करत कॉंग्रेसने प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला विजय मिळवला. मात्र त्यावेळी मुस्लिम, दलितांची वोट बँक असतांना हिंदु वोट बँकेकडे आपआपल्या परीने जातीच्या आधारावर कॉंग्रेस आपलं गणित जुळवीत राहिली. तथाकथीत सनातनवादी आणि हिंदुत्त्ववादी हिंदुंची वोट बँक निर्माण करण्याचा सातत्याने प्रयास करत गेले. परंतू


हिंदुत्त्व आणि हिंदु
याची व्याख्या जुळवतांना हिंदुत्त्ववाद्यांना २०१४ पर्यंत यश आले नाही. हिंदुंची वोट बँक निर्माण करायची असेल तर हिंदुत्त्ववाद्यांना इतर धर्माकडून हिंदु धर्माला किती धोका आहे? हे सांगणे क्रमप्राप्त ठरले. आणि हिंदु धर्माचा मसिहा निर्माण करण्यात हेतू सनातनवादी अन् हिंदुत्त्ववाद्यांनी कधी बाबरी मस्जिद तर कधी राम मंदिराचा सातत्याने उल्लेख करत नरेंद्र मोदींसारखा चेहरा समोर आणला. शेतात काय पिकतय यापेक्षा बाजारात काय विकतय हे मोदींना अधिक प्रमाणात उमजत असायचे. म्हणूनच विकासाच्या राजकारणापेक्षा कॉंग्रेसच्या मुस्लिम, दलित वोट बँकेला लक्ष करत अखंड हिंदुस्तानात भारतमुक्त कॉंग्रेसच्या नार्‍याला जे यश आले ते केवळ कॉंग्रेसच्या निधर्म राजकीय वलगणेपेक्षा धार्मिक वोट बँकेमुळेच हे त्रिवार सत्य नाकारता येणारे नाही. गेल्या २०१४ च्या कालखंडानंतर देशात जी हिंदुत्त्वाची मोट बांधली जाते आणि त्या मोटेला जे यश मिळत आहे. त्यात हिंदु धर्माचा सर्वांगीण विकास होतोय का? त्या धर्माचे पावित्र्य जपले जातेय का? हिंदु धर्माच्या साधुसंतांपासून समाजसुधारकांच्या कार्याला कट्टर हिंदुत्त्वाचे पताके फडकवले जातेत का? हिंदु धर्माची व्याख्या काय? हिंदु धर्म आणि त्या धर्मातील अठरापगड जातीतली वर्ण व्यवस्था एखाद्या धर्मात असू शकते का? ज्या धर्मामध्ये आमुकाने शिक्षण घ्यावे, तमुकाने सत्ता स्थापन करावी, एकाने रक्षण करावे, दुसर्‍याने अछुत होत तेवढेच तेवढे काम करावे, हिंदु धर्माची ही संहिता असुच शकत नाही परंतू हिंदुत्वाची ही संहिता नक्कीच आहे. पुन्हा एकदा भारतामध्ये


धर्माच्या रक्षणापेक्षा सत्ताकारणासाठी
कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीकडून जातीचे आणि धर्माचे राजकारण केले जाते. मग हे राजकारण करतांना कोणी गंगेत डुबकी मारतो, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदु वोट बँक तयार केल्याचा दावा करतो, तर कोणी मी हिंदु आहे परंतू हिंदुत्त्ववादी नाही असे संबोधतो. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरीता चावलेल्या लोकशाहीच्या राज्यात हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष विकासाच्या राजकारणापेक्षा धर्माच्या राजकारणावर वोट बँकेची निर्मिती करत असतील तर भविष्य ते काय असेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु वोट बँक तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांनी कळस चढवला अशा आशयाचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी करून पुन्हा एकदा भाजप हे केवळ धर्माचे आणि जातीचे राजकारण करायलाच निर्माण झाल्याचा दाखला दिला. हा दाखला केवळ सत्ताकारणासाठीच म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु वोट बँक तयार केली हे वक्तव्यच संतापजनक आहे. दस्तुरखुद्द महाराज सदरेवर असते आणि तिथं एखाद्या मंत्र्याने असे वक्तव्य केले असते तर नक्कीच महाराजांनी त्याचा कडेलोट केला असता. सोन्याच्या नांगराला आपल्या इतर जातीतील बाल संवंगड्यांना हात लावून स्वराज्याचं स्वप्न पाहणारा माझा राजा अखंड बहुजनांचा राजा होता. सर्वास पोटास लावणे हाच माझ्या राजाचे स्वप्न होते. परंतू आज त्याच माझ्याचा राजाचा हिंदुत्त्वाच्या सत्ताकारणासाठी हिंदु राजा म्हणून दुरूपयोग केला जात असेल तर स्वामी विवेकानंदांपासून छत्रपती शिवराय ते संत तुकाराम ज्ञानेश्‍वर यांना मानणारा वर्ग सत्ताकारणाच्या हिंदुत्त्वाला स्विकारणार नाही. त्या


इतिहासाची साक्ष
देतांना आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करणारे मिलिंद मुरुगकर एका लेखात हिंदू धर्मा बाबत पटवून देताना लिहितात, शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कुठल्या तरी पोथीची हुकमत माणसाचे विचार दडपण्यासाठी वापरायचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतो. पोथीनिष्ठ कर्मठतेविरुद्ध पुकारलेल्या बंडात येथे बर्‍याच वेळा बंडखोरांचा विजय झाला. ज्ञानेश्वर आणि त्याच्या भावंडांवर वाळीत टाकणारे ब्राह्मण इतिहासजमा झाले. ज्ञानोबाची आळंदी तीर्थक्षेत्र झाले. आंबेडकरांच्या महाडच्या सत्याग्रहामुळे तळे पतित व्हायच्या ऐवजी पुनित झाले. त्याचे गोमूत्राने शुद्धी करणारे ब्राह्मण इतिहासांत केवळ हास्यास्पद ठरले. हिंदू परंपरेत खास वाखाणण्यासारखे काही असेल तर ते हेच आहे.
हिंदू धर्मातील खुलेपणाचा विलोभनीय आविष्कार पाहायचा असेल तर आपल्याला वारकर्‍यांच्या दिंडीत, चंद्रभागेच्या तीरी जावे लागेल. जातिभेद विसरून, श्रीमंत-गरीब हा भेद विसरून उन्हापावसाची पर्वा न करता मलोन्‌मैल चालत जाणारे वारकरी जेव्हा एकमेकाला वाकून नमस्कार करत, गळाभेट घेत, तल्लीन होऊन विठ्ठलभक्तीचे अभंग म्हणतात तेव्हा अगदी नास्तिकाच्या डोळ्यातदेखील पाणी येऊ शकते. कारण या भक्तीत मनाची विशालता असते. देवापाशी काही मागणे नसते. अहंकाराचा लोप असतो आणि अनंताचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. ही भावावस्था कोणालाही भिडणारी असते. यात कोणते कर्मकांड नसते. असते ती निरपेक्ष आस. हिंदू परंपरेत व्यक्तीला अनंताचा वेध घेण्यासाठी कोणत्याही उपासनापद्धतीचे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यामुळेच हिंदू धर्मात कमालीचे वैविध्य, समृद्धी आहे. आता हेच पहा ना


पंढरीची वारी
वारीतील सामर्थ्य समता संगराला लाभावे’ या शीर्षकाच्या आपल्या एका लेखात डॉ. नरेंद्र दाभोळकर लिहितात : वारीच्या काळात वारकरी रोज वीस-वीस किलोमीटर चालतात. मिळेल ती भोजन-निवास व्यवस्था स्वीकारतात. पावसाचे झोडपणे, चिखल तुडवणे आनंदाने स्वीकारतात. वारकरी माळ धारण करतात. एका अर्थाने व्रतस्थ होतात. वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम,भक्ती,शांतीची प्रस्थापना आणि मानवतेची समानता हा असतो.’
नरेंद्र दाभोलकरांना वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम वाटणे हे स्वाभाविक होते. जो संघर्ष तुकाराम आणि इतर संतांनी सनातन्यांविरुद्ध केला तसाच संघर्ष दाभोलकरांना करावा लागला आणि त्यासाठी त्यांना बलिदानदेखील करावे लागले. अनेक हिंदुत्ववादी लोकांचादेखील सनातनवादी विचारांना विरोध असतो. पण एकदा का लोकांचे धार्मिक अस्मितेच्या मुद्दयांवर राजकीय ऐक्य साधायचे ध्येय बाळगले की सनातनवादी प्रवृत्तीबद्दलदेखील मौन बाळगावे लागते. कारण इतर हिंदुत्ववादी लोकांप्रमाणे सनातन’वादी लोकांची रणनीतीदेखील हिंदू धर्मीयांवर फार मोठा अन्याय होतोय असे सातत्याने मांडून, इतर धर्मीयांतील कट्टरतेकडे बोट दाखवून हिंदूंना असुरक्षित करून त्यांचे राजकीय ऐक्य साधण्याचीच असते. सनातनी नसलेले हिंदुत्ववादी आणि सनातनी हिंदुत्ववादी यांच्यातील हा संबंध महत्त्वाचा आणि बळकट आहे. दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांच्यावर ज्या अभद्र भाषेत सनातन प्रभात’मध्ये गरळ ओकण्यात आली त्यावर हिंदुत्ववादी नाही तुटून पडले. सनातन’वर टीका ज्यांना स्युडोसेक्युलर म्हणून हिणवले जाते अशा लोकांनीच केली. हिंदुत्वाच्या राजकारणामुळे
हिंदू संस्कृतीचे वेगवेगळ्या


पातळीवर नुकसान
झाले आहे. अडवाणींच्या रथयात्रेनंतर जे साधू’, संत’ देशाच्या राजकीय-सामाजिक क्षितिजावर उदयाला आले ते आणि भागवत धर्मातील खरे संत यांच्यात मुळातच मोठा विरोध आहे. खरे तर या लोकांना संत म्हणायला हिंदू समाजाने आक्षेप घेतला नाही हे दुर्दैव. एका अभंगात तुकाराम म्हणतात मांडीना स्वतंत्र फड, म्हणे अंगा येईल अहंता वाड नाही शिष्यशाखा, सांगो अयाचित लोका’ अशी अहंकार वाढवणारी स्वतंत्र फड आणि शिष्यशाखा जमवणारी आसाराम’ प्रवृती ही आज साधुसंत म्हणून मान्यता पावली आहे हा तुकारामाचा मोठा पराभव आहे. पण याची फारशी खंत हिंदू धर्मीयांना वाटतेय असे दिसत नाही. अटी संतांना’ आज मंत्रिपदाचा दर्जा दिला जातोय. हिंदुत्वाच्या राजकारणात तुकारामाचा पराभव अपरिहार्य आहे. कारण हिंदुत्वाचे राजकारण व्यक्तीला हिंदू’ नावाच्या समूहवादी अस्मितेत कोंडण्याचे आहे तर तुकारामाचे ध्येय व्यक्तीला अहंभावापासून मुक्त करण्याचे असल्याने तुकारामाची मांडणी अस्मितावादाला मुळातून छेद देणारी आहे. इस्लाम आणि सुफी परंपरा यात जे विळ्याभोपळ्याचे नाते आहे तेच नाते वैदिक परंपरा आणि संतांची भागवत परंपरा यांच्यात आहे. आणि आज हिंदुत्ववादी राजकारणाला जवळचे वाटणारे सर्व संत (?) हे कोणत्याही जातीतून आलेले असले तरीही ते वैदिक परंपरेशी नाते सांगतात यात आश्चर्य नाही. मनाची अशी विशालता आणि धार्मिक अस्मितेखाली लोकांचे संघटन करण्याची प्रेरणा यात एक मोठा ताण असतो. अशा विशालतेचा वारसा सांगणारी हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मीयांमध्ये असुरक्षितता आणि आक्रमकता निर्माण करू पाहाणारी हिंदुत्ववादी विचारसरणी या एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकणार्‍या गोष्टी आहेत.आज


भगव्या कपडयातील योगी’
आणि राज्यसत्ताचा हातात हात
पाहायला मिळत आहे . जगद्गुरू संत तुकोबा यावर म्हणायचे,
होउनी संन्यासी भगवी लुगडी, वासना न सोडी विषयांची,
लाम्बवूनी जटा नेसोनी कासोटा, अभिमान मोठा करिताती’
अखंड प्राणी जातकाला जो जे वांच्छिल तोते लाहो म्हणणारे माझे ज्ञानोबा भिक्षा मागत ज्ञान वाटायचे पण विषयाची वासना अंगी बाळगत आपणच धर्माचे रक्षक आहोत म्हणणारे त्या काळच्या धर्मांधानी, ज्ञानेश्‍वरांचा जो छळ केला तो हिंदु म्हणूनच ना? तेंव्हा ही हिंदुत्त्व आणि हिंदु यात संघर्ष असायचाच. सत्ताकारणासाठी आणि पोटपुजेसाठी हिंदुत्त्व तेंव्हाही जपले जात होते. धर्म अभिमान हा हिंदु धर्माचा होता की हिंदुत्वाचा होता? हे सांगणे अवघड असले तरी धर्माभिमान जागता ठेवणे ही हिंदुत्वाच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. आज अनेक हिंदू विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे योगदान करत आहेत. पण आज निर्माण होणार्‍या ज्ञानावर कोणत्याही एका देशाची आणि धर्माची छाप नाही. म्हणून हिंदुत्ववाद्यांना वेदकाळात जावे लागते. परिणामी आज हिंदू अभिमान जागवण्यासाठी सत्तेतील लोकांनी केलेली अत्यंत मठ्ठपणाची विधाने सातत्याने आपल्यावर आदळत आहेत. पूर्वी आपल्याकडे प्लास्टिक सर्जरीचे तंत्रज्ञान होते आणि गणपती हे त्याचेच उदाहरण आहे.’ या पंतप्रधानांच्या विधानाने या प्रक्रियेची सुरुवात झाली आणि ती प्रक्रिया थांबायचे नावच घेत नाहीये. तर्कावर न टिकणारी अशी हास्यास्पद विधाने करून आपण हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहोत याचे भानदेखील हिंदुत्ववाद्यांना नाही. त्याची किव करावी की इतिहासाची श्रीमंती असतांना आमच्या पदरी केवळ सत्ताकारणासाठी वैचारिक दारिद्रयच आहे म्हणावं की आम्ही दळभद्री म्हणावं.

Most Popular

error: Content is protected !!