बीड (रिपोर्टर): दुकानामध्ये गोंधळ घालणार्या इसमास ‘तुम्हाला जे बोलायचे आहे ते मॅनेजरला बोला,’ असे म्हटल्यानंतर सदरच्या इसमाने महिलेशी हुज्जत घालत तिला पाठीमागून मिठी मारत ओढणी ओढून असभ्य वर्तन केल्या प्रकरणी संबंधित इसमाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील वाद हा तुळजाई चौकातील सनी शिंदे यांच्या ‘हॅप डेली निडस्’ या दुकानात चार दिवसांपूर्वी घडला.
बीड शहरातील तुळजाई चौकात सनी शिंदे यांचे हॅप डेली निडस् या नावाचे दुधाचे दुकान आहे. त्याठिकाणी 29 वर्षीय महिला काम करते. 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानामध्ये संत नामदेव नगर येथील राहणारे अमर रमाकांत पुरी हे त्याठिकाणी आले. त्यावेळी दुकानातील महिला व त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले. त्यावेळी महिलेने जे बोलायचे आहे ते मॅनेजरला बोला, असे म्हटले, या वेळी आरोपीने दुकानातील सामानाची फेकाफेक केली व फिर्यादीच्या पाठीमागे जावून मिठी मारत ओढणी ओढून असभ्य वर्तन केले. तुझी अवकात काय? असे म्हणत जातीवाचक भाष्य करून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी 28 नोव्हेंबर रोजी सदरील महिलेने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यावरून गु.र.नं. 610/2023, कलम 354, 323, 504 भा.दं.वि.सह 3 (1) (आर) (एस), 3 (डब्ल्यू) (आय) अनुसूचीत जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक वाळके हे करत आहेत.