Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईममंत्री बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासक शिवाजीनगर ठाण्यात, तक्रारीनंतरही तीन तासांपासून...

मंत्री बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासक शिवाजीनगर ठाण्यात, तक्रारीनंतरही तीन तासांपासून गुन्हा दाखल झाला नाही, शिवाजीनगर पोलिसांसह अधिकार्‍यांवर कोणाचा दबाव?


रिझर्व्ह बँकेसह न्यायालयाच्या आदेशानंतरही गुन्हा का दाखल होत नाही?
बीड (रिपोर्टर) आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून कुप्रसिद्ध झालेल्या बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेसह न्यायालयाने दिल्यानंतरही बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आज सकाळी द्वारकादास मंत्री बँकेवर नेमलेले प्रशासक अशोक कदम आणि चाळक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या दोषी संचालक मंडळासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत. तक्रारही दिली आहे. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दस्तुरखुद्द डीवायएसपी वाळके हे पोलीस ठाण्यात आहेत. मात्र गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब का होतोय? हे कळायला मार्ग नसून बीड पोलिसांवर कुठल्या राजकीय नेत्यांचा दबाव या प्रकरणात आहे यावर चर्चा होत आहेत. ठेवीदारांच्या पैशाचा गैरव्यवहार करणार्‍या बँकेवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल न्यायालयाबरोबर आता जनताही बीडच्या पोलिसांना विचारत आहे.


बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेत ३१६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड झाल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेने सदरील मंत्री बँकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाकल करण्याचे सांगितले. मात्र या प्रकरणात दोषींवर गुन्हे अद्याप पावेत दाखल झाले नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सदरचं प्रकरण एका तक्रारदारामार्फत गेलं. न्यायालयाने सहकार आयुक्तांसह पोलीस प्रशासनावर कडक ताशेरे ओढत गुन्हे का दाखल केले जात नाहीत? असा सवाल केला. त्यानंतर आज द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक असलेले अशोक कदम व चाळक शिवाजीनगर पोलिसात मंत्री बँकेच्या संचालक मंडळासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार घेऊन गेले. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. जिल्हा पोलीस उपअधिक्षक वाळके हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात


या प्रकरणी बसून होते. मात्र तक्रार दिल्यानंतरही मंत्री बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या दोन ते तीन तासांच्या कालखंडात पोलीस ठाण्याचे पीआय ठोंबरे आणि डीवायएसपी वाळके यांनी केली नसल्याचे दिसून आले. पोलिसांकडे पंधरा दिवसांचा कालावधी असतो, असे त्रोटक उत्तर माध्यमांना देण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून झाला. द्वारकादास मंत्री बँकेत झालेल्या अपहार प्रकरणात गुन्हा दाखल करून न घेण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? राजकीय लोक यामध्ये हस्तक्षेप करतायत काय? न्यायालयाचा आदेश असताना बीड पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ का करतात? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत असून या प्रकरणातील प्रशासकांनी मात्र द्वारकादास मंत्री बँकेच्या संचालक मंडळावर तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकरण…
३८५ कोटी वापरले, ९२ कोटी व्याज भरलेच नाही, २०१४ पासून प्रकरण आले उघडकीस, सहकार विभागाच्या लेखा परिक्षकाने ताशेरे ओढले, डीडीआरसह रिझर्व्ह बँकेने गांभीर्याने घेतले, रिझर्व्ह बँकेने थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले, गुन्हे दाखल होत नसल्याने एक जण कोर्टात गेला, न्यायालयानेही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत पोलिसांसह सहकार आयुक्तांवर ताशेरे ओढले, आज सहकार आयुक्तांच्या आदेशाने प्रशासक तक्रार घेऊन ठाण्यात, दुपारी दीड वाजेपर्यंत तरीही गुन्हा दाखल नाही, बीड पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव

Most Popular

error: Content is protected !!