फडणवीस-शिंदेंची बैठक होणार
मुंबई (रिपोर्टर)- महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आज भाजपाकडून सत्तास्थापनेला वेग देण्यात आला असून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाची महत्वपुर्ण बैठक झाली तर तिकडे गोव्यात असलेल्या बंडखोर आमदारांसोबत बैठक घेऊन एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते राज्यपालांची भेट घेणार असून या भेटीनंतर फडणवीस-शिंदेंची महत्वपुर्ण बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री मुख्यमंत्री पदासह विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आता महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी आणि मुख्यंमत्रीपदावर ‘पुन्हा येईल’ म्हणत विराजमान होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाची महत्वपुर्ण बैठक फडणवीसांच्या उपस्थितीत झाली असून या बैठकीची माहिती भाजपाच्या पक्षश्रेष्ठीला देण्यात आली आहे. तिकडे गोव्यामध्ये डेरेदाखल असलेले बंडखोर आमदार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. एक ते दीड तासाच्या बैठकीमध्ये सरकार स्थापनेसह मंत्रीपद आणि अन्य बाबींवर चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत आ. रवींद्र चव्हाण हे असून एकनाथ शिंदे हे मुंबईत आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपालांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असून या बैठकीनंतर सत्ता स्थापनेबाबत माध्यमांना माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतेर्.ें
उद्याच शपथविधीची शक्यता
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांसोबत आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर शिंदे आणि फडणवीस राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ते आज सरकार स्थापनेचा दावा करणार असून उद्या नव्या सरकारची शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील.