शेख मजीद–
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला. भाजपाने आपली पहिली यादी जाहीर करुन प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केली. भाजपाला यावेळी 370 जागा जिंकायच्या आहेत. तसं त्यांनी लक्ष्य ठेवलं. दुसरीकडे ‘इंडीया’ आघाडीच्या अजुन तितक्या जोमाने हालचाली होतांना द्सित नाही. इंडीया आघाडीने सुरुवातीला चांगली बॅटींग केली. मात्र गेल्या काही दिवसापासून या आघाडीत थोडं गार वातावरण दिसू लागलं. नितीशकुमार यांनी इंडीया आघाडीला सोडचिट्टी दिल्याने बिहारमध्ये त्याचा बराच परिणाम जाणवणार. जितके समविचारी पक्ष ‘इंडीया’ आघाडीत सहभागी होतील. तितका त्याचा फायदा इंडीया आघाडीला होवू शकतो. महाराष्ट्र सर्वच पक्षासाठी महत्वपुर्ण आहे. भाजपाने राज्यात विशेष लक्ष घातलं. राज्यातील बडया नेत्यांना भाजपा लोकसभेचं तिकीट देवून राज्यातून आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातलं राजकारण आधीच बेचव झालेलं आहे. फोडाफोडीमुळे राजकारणाचा बाजार झाला. राष्ट्रवादी, शिवसेना फुटल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या गोंधळात पवार, ठाकरे आणि काँग्रेसला आपलं अस्तित्व टिकण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. आघाडीला आपल्या सोबत समविचारी पक्षांना घ्यावे लागणार. जागेच्या बाबतीत थोडं मागं-पुढं करुन तडतोड केली तरच आघाडी सोबत इतर पक्ष टिकून राहतील नाही तर ते स्वतंत्र लढवून आपली ताकद दाखवू शकतात.
वंचीतची ताकद
वंचीत बहुजन आघाडीची ताकद वाढली. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचीतची एक ही जागा निवडून आली नाही पण त्यांच्या मतांची टक्केवारी चांगली होती. वंचीतमुळे आघाडीचे नऊ उमेदवार पराभूत झाले. पाच वर्षाच बराच बदल झाला. पाच वर्षाच्या कार्यकाळात वंचीतने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा सतत प्रयत्न केला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभा जर बघितल्या तर त्या सभेतील गर्दी पाहता. वंचीतने मोठी झेप घेतली हे दिसून येत आहे. नेत्यांच्या सभा घेण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. काहीं नेत्यांना सभेला लोक आणण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला होत असलेली गर्दी विनापैशाची आहे. लोक स्वत:हून त्यांच्या सभेला गर्दी करु लागले. कारण लोकांना बदल हवा आहे. बाळासाहेब यांच्या सोबत वंचीत समाज सहभागी आहे. मग तो कोणत्या ही जाती, धर्माचा का असेना? आज पर्यंतच राज्याचं राजकारण हे काही ठरावीक नेत्यांच्या व घराण्यांच्या भोवती फिरत राहिलं. त्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. ‘वंचीतांचं’ राजकारण करण्याचं काम आंबेडकर करु लागल्याने त्यांची क्रेझ वाढली.
थेट आरोप
भाजपाने अनेकांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावल्याने बडे पुढारी बेजार आहेत. काहींनी शांत राहण्याची भुमिका घेतली तर काही जण भीतीपोटी भाजपाच्या वळचणीला जावून बसले. राज्यातील एक ही पुढारी केंद्रातील सत्तेच्या विरोधात बोलायला तयार नाही, उध्दव ठाकरे, संजय राऊत वगळता. काँग्रेस पक्ष मोठा आहे. काँग्रेसचे राजकारण गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून देशात सुरु आहे. राज्यात अनेक बडे नेते कॉग्रंेसचे आहेत तरी देखील हे नेते थेट भुमिका घ्यायला घाबरतात. पाच वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेसने एखादं मोंठं आंदोलन केलं नाही की, भाजपाच्या विरोधात रान उठवण्यासाठी काही प्रयत्न केले नाही. स्वत:चा पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करत नाहीत हे पक्षाचं दुर्देवं आहे. एकटे राहूल गांधी यांनी यात्रा काढून आणि आवाज उठवून पक्ष वाढत नसतो. जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी काही तरी हालचाली केल्या तरच पक्ष वाढेल ना? वंचीतचे आंबेडकर हे सत्ताधार्यांच्या विरोधात रोखठोक बोलतात. त्यांना प्रश्न विचारतात, त्यामुळे वंचीतच्या पाठीमागे लोकांची गर्दी वाढू लागली. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचीतने सर्वसामान्यांना उमेदवारी दिली होती. जेणे करुन ज्या जात, समुहांना आज पर्यंत कुणी राजकारणात विचारात घेतलं नाही. त्या समुहांचा सन्मान वंचीतने केल्याने छोटा जात समुह वंचीतच्या पाठीमागे उभा राहू लागला. हा छोटा जात समुह पुर्वी भाजपाच्या बाजुने होता तो आज वंचीतच्या पाठीमागे येवू लागल्याने वंचीतमुळे भाजपाला काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार?
बी टीम म्हणणारे …!
आपल्या पक्षाचं इतर छोट्या पक्षाकडून निवडणुकीत नुकसान झालं की, त्या पक्षांवर आरोप केले जातात. प्रत्येकांना निवडणुक लढवण्याचा, पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे. काही ठरावीक प्रस्थापित पक्षांची किंवा राजकारण्यांची राजकारणात मक्तेदारी थोडीच आहे. काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणुन घेतो. कॉग्रंेस किती प्रमाणात धर्मनिरपेक्ष आहे हे समोर येवू लागलं? कॉग्रेसचे बडे नेते स्वार्थी आणि लबाड आहेत. निवडणुकी पुरता मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा वापर करुन घेतला जातो. जेव्हा आपलं राजकीय करीअर धोक्यात येवू लागतं. तेव्हा हेच नेते तात्काळ बाजु बदलून इतर पक्षात उड्या मारतात. राज्यात अनेक काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. ज्यांनी, ज्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांची पुर्वीची वक्तव्य बघितले तर त्यांच्या बुध्दीची कीव येते. नुकतेच भाजपावाशी झालेले अशोक चव्हाण हे एमआयएम आणि वंचीतला भाजपाची बीटीम म्हणत होते तेच अशोक चव्हाण आज भाजपाचे मंगळसुत्र बांधून बसले. अशोक चव्हाण यांच्या प्रमाणेच नगरचे विखे पाटील देखील असेच आरोप करत होते, ते तर विरोधीपक्ष नेतेपदी असतांना भाजपात गेले. जेव्हा स्वत:च राजकारण संपत असल्याचं बड्या पुढार्यांना जाणवतं तेव्हा ते नको ते आरोप करुन स्वत:ची बाजु सेफ करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा संधीसाधू पुढार्याचं राजकारण जास्त दिवस टिकत नसतं. प्रस्थापित पुढार्यांना वाटत असतं, की राजकारण फक्त आपणच करावं. इतरांना संधी मिळू नये. कॉग्रंेसचं नुकसान फक्त प्रस्थापित पुढारी पोसल्यामुळेच झालं. जो पर्यंत कॉग्रंेस सर्वसामान्यांना संधी देणार नाही तो पर्यंत काँग्रेसचा विस्तार होणार नाही.
हे राजकारण आहे
राजकारणात काहीही होवू शकतं. कुणी कोणत्याही पक्षासोबत जावू शकतं. राजकारणाचा अंदाज कुणी बांधू नये. काहींचं असं मत असतं की, भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी कॉग्रंेसला, पवारांच्या राष्ट्रवादीला साध द्यावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते किती समविचारी आहेत हे सगळ्यांनी पाहितले. शिवसेना अनेक वर्ष भाजपा सोबत होती. राष्ट्रवादीने अनेक वेळा भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवार भाजपासोबत गेले आहेत. राजकारणात कुणी कोणाचा दुष्मन नसतो. वंचीतने आपल्या सोयीचं राजकारण केलं तर बिघडलं कुठं? काही जण म्हणत असतात की, वंचीत वेगळी लढली तर भाजपाचा फायदा होवू शकतो. आर्धे राज्यातील राजकारणी भाजपात जावून बसले त्याचं काय? वंचीत वेगळी लढली तर भाजपाचा फायदा होतो, म्हणजे त्यांनी राजकारण करायचं नाही का? काँग्रसेला इतकी चिंता आहे समविचारांची तर मग काँग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दिलाच नसता ना? सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे त्यांच्या कर्मामुळे पडले. माजी मुख्यमंत्र्यांना आपला मतदार संघ सांभाळता येत नाही हे आश्चर्य नाही का? आज त्याच शिंदे याचं तळ्यात आणि मळयात पाहावयास मिळत आहे. शिंदे पक्ष सोडणार अशी चर्चा होती. भविष्यात काही सांगता येत नाही. मुलींच्या राजकारणामुळे ते ही वेगळा निर्णय घेवू शकतात. प्रस्थापितांना पक्षाची नाही तर आपल्या मुलांच्या राजकारणाची चिंता लागून आहे. पुन्हा म्हणायचं वंचीत सारखे पक्ष कॉग्रंसेचे नुकसान करतात.
वंचीतच्या अपेक्षा का वाढू नये?
वंचीतने शिवसेने बरोबर युती केली होती. सध्या लोकसभा निवडणुकीची हवा आहे. राज्यात कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज आजच लावला जावू लागला. महाआघाडीत वंचीत असली तरी जागा वाटपा बाबत एकमत झालेलं नाही. कॉग्रेस आपला आडेलतट्टूपणा सोडायला तयार नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्याने या दोन्ही पक्षाचं मोठं नुकसान झालं हे मान्य करावं लागेल. कॉग्रेसही आर्धी फुटलेली आहे. निवडणुकीत आणखी किती नेते भाजपात जातात हे सांगता येत नाही. तिन्ही पक्षांची ताकद भाजपाने कमी केली. वंचीत सध्या चर्चेेत आहे. आघाडीने वंचीतला सोबत घेतलं पण वंचीतला योग्य जागा दिल्या तरच वंचीत आघाडी सोबत राहू शकते. कारण वंचीत दोन, चार जागावर समाधान मानू शकत नाही, आणि का मानावे? गेल्या निवडणुकीत कॉग्रंेसला फक्त एकच जागा जिंकता आली. राष्ट्रवादीच्या कशाबशा चार जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेच्या आठरा जागा निवडून आल्या होता पण शिवसेना फुटलेली नव्हती. गेल्या वेळची आणि आता परस्थिती वेगळी आहे. फुटलेल्या पक्षांनी जास्त जागा लढवून उगीच अवसान दाखल्यासारख आहे. नव्या दमाच्या पक्षाला सोबत घेवून त्या पक्षाला चांगली संधी दिली तर त्याचा फायदा होवू शकतो, नसता वंचीत वेगळी लढली तर महाआघाडीचं मोठं नुकसान होवू शकतं. त्यात कॉग्रंेसची जास्त वाट लागणार आहे. काँग्रेसने दोन पाऊल मागे घेतले पाहिजे, नाही तरी काँग्रेसचं काहंी राहिलंलं नाही. कॉग्रंेसचे नेते कधी धोका देतील याचा भरोसा नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कमी जाणवू लागली. तीच गत ठाकरे यांची झाली. अशा परस्थितीत वंचीतला सोबत घेणं हे फायद्याचं ठरू शकतं. वंचीत सोबत नसेल तर या तिन्ही पक्षाला आपलं अस्तित्वं वाचवणं अवघड होवू शकतं?