बीड(रिपोर्टर): शिरूर कासार बाजार तळावर ऑनलाईन चक्री जुगार सुरू करून गोरगरीब ऊसतोड मजुरांना लूटीचा गोरख धंदा राजरोस होता. याबाबत वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रकाशित होताच शिरूर पोलीसांना जाग आली आणि आज सकाळी त्या ठिकाणी धाड टाकून चार जणांच्या मुस्क्या बांधत त्यांच्याकडून रोख रक्कमेसह चक्री जुगाराचे साहित्य जप्त केले.
ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर मजूर मोठ्या प्रमाणात गावाकडे आले आणि हंगामाच्या पुर्वसंध्येला हे मजूर उचल घेत आहेत, याच उचलीवर डोळा ठेवून शिरूर कासार येथील बाजार तळावर विनोद पवार, सलमान शेख, रामजी उर्फ राम शेळके आणि विजय तळेकर यांनी ऑनलाईन चक्री मटका सुरू केला होता. याबाबत वृत्तपत्रामध्ये या जुगाराचे वृत्त प्रकाशित होताच शिरूर पोलीसांनी आज सकाळी त्या ठिकाणी धाड टाकून वरील चौघाजणांच्या मुस्क्या बांधत त्यांच्याकडून रोख 2 हजार 10 रुपये व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शिरूरचे ठाणेप्रमुख पीआय माने, पीएसआय मस्के, सहाय्यक फौजदार सिरसाट, गुजर, सुरवसे यांनी केली.