मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, उज्वल निकम, वर्षा गायकवाड, अनिल देसाईल, भारती पवार, राजन विचारे, अमोल किर्तीकर, पियुष गोयलांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
मुंबई (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांसह देशातील 8 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एकूण 49 मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून सकाळी अकरा वाजल्यापासून मतदान संथगतीने सुरू होते. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात कुठे 32 तर कुठे 34 टक्के मतदान झाले आहे. या 13 मतदारसंघात अनेक मातब्बर आपले नशिब आजमावत असून अरविंद सावंत, यामिनी जाधव, राहुल शेवाळे, अनिल देसाई, वर्षा गायकवाड, उज्वल निकम, रविंद्र वायकर, अमोल किर्तीकर, संजय पाटील, श्रीकांत शिंदे, भारती पवार यांच्यासह महाराष्ट्रातील तब्बल 264 व देशातील 695 उमेदवारांचे भाग्य आज सायंकाळी ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे.
अठराव्या लोकसभेसाठी आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईतील सहा मतदारसंघांसह राज्यातील 13 मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. ठाकरे कुटुंबियासह बॉलिवूड क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावत जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. या 13 लढतींमध्ये दक्षिण – मध्य मुंबईत शिंदे सेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे सेनेचे अनिल देसाईल, दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे सेनेचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे सेनेच्या यामिनी जाधव, उत्तर मुंबईमध्ये भाजपाचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील, उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपाचे उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, उत्तर-पश्चिम मुंबईमध्ये शिंदे सेनेचे रविंद्र वायकर विरुद्ध ठाकरे सेनेचे अमोल किर्तीकर, उत्तर-पुर्व मुंबईमध्ये भाजपचे मिहिर कोटेचा विरुद्ध ठाकरे सेनेचे संजय पाटील, ठाणेमध्ये ठाकरे सेनेचे राजन विचारे विरुद्ध शिंदे सेनेचे नरेश मस्के, कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर, भिवंडीत भाजपाचे कपील पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे सुरेश महात्रे, यासह पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या तेरा मतदारसंघातील मातब्बरांचे भवितव्य आज सायंकाळी मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ सहा टक्के मतदान झाले होते. दुपारी अकरा वाजेपर्यंत म्हणावा तसा मताचा टक्का वाढल्याचे दिसून येत नव्हते तर दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात कुठे 32 टक्के तर कुठे 34 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते.