परळी (रिपोर्टर): माझ्या नावाने इन्स्टाग्राम या सोशल साईटवर अज्ञात व्यक्तीने बनावट खाते तयार करून दोन समाजात तेढ व वितुष्ट निर्माण होईल अशा स्वरूपाची फेक पोस्ट व्हायरल करण्यात आली असून, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. याबाबत परळी वैद्यनाथ पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडे रीतसर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
इन्स्टाग्राम या सोशल साईटवर वाल्मिक कराड यांच्या नावाने (ुरश्राळज्ञ_ज्ञरीरव_1717) अशी आयडी दाखवणारे बनावट अकाउंट काढून त्याद्वारे इन्स्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण होईल व वाल्मिक अण्णा कराड यांची बदनामी होईल अशा स्वरूपाचा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. आज सायंकाळी वाल्मिक कराड यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी परळी शहर पोलिसात या बनावट खात्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली असून, संबंधित इन्स्टाग्राम खात्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. सदर प्रकार हा कुणीतरी जाणीवपूर्वक व खोडसाळ वृत्तीने केवळ बदनामी व दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केला असल्याचे वाल्मिक कराड यांनी म्हटले आहे. दरम्यान सदर अज्ञात व्यक्तिविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 500, 505(2), तसेच आयटी ऍक्ट 66 (क) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास परळी पोलीस करत आहेत.
दोन समाजात विष पेरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार्यांवर पोलीस योग्य कारवाई करतील असा आपल्याला विश्वास असून, अशा समाज कंटकांविरुद्ध सत्याच्या मार्गाने लढत राहू, असे वाल्मिक अण्णा कराड यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.