बीड, (रिपोर्टर)ः- जिल्ह्यातील ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी, जिजाऊ, शुभकल्याण, मातोश्री, लक्ष्मीमाता, मराठवाडा, परळी पिपल्स या मल्टीस्टेट व अर्बन बँकांनी मराठवाड्यातील ठेवीदारांना कोट्यावधी रूपयांना गंडवले. ठेवीदारांचे पैसे तात्काळ देण्यात यावे व सर्व मल्टीस्टेट अर्बन बँकांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा ठेवीदारा संघर्ष कृती समितीचे मुख्य प्रवर्तक प्रा. सचिन उबाळे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असुन त्यांची प्रकृती प्रचंड प्रमाणात खालावली आहे. प्रशासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असुन जिल्ह्यातील ठेवीदार उपोषण स्थळी त्यांना पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. तर दुसरीकडे संघर्ष समितीच्या वतीने उद्या सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातल्या डझनभर मल्टीस्टेट आणि अर्बन बँकानी मराठवाड्यातील ठेवीदारांच्या कोट्यावधी रूपयांच्या ठेवी न देता बँकेचे प्रशासन कुठे फरार झाले आहेत तर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र कोट्यावधी रूपयांच्या ठेवी अडकून पडलेल्या सर्व सामान्य गोर गरीब लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या सर्व ठेवीदारांचे पैसे तात्काळ देण्यात यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांनी गेल्या चार दिवसापासुन त्यांनी उपोषण सुरू केले आहे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसुन येत आहे. याआधी अनेक वेळा उपोषण मोर्चे काढण्यात आले मात्र ठेवीदारांचे पैसे अद्याप देण्यात आले नाही. उबाळे यांची प्रकृती खालावत चालली आहे तर दुसरीकडे जिल्हाभरातील ठेवीदार उपोषण स्थळी येवून पाठींबा देत आहेत. सर्व मल्टीस्टेट आणि अर्बन बँकांची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्याची असुन ठेवीदारांचे पैसे परत मिळावे यासाठी उद्या सोमवार 1 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे वतीने सांगण्यात आले आहे.