बीड, (रिपोर्टर)ः- एसपी नंदकुमार ठाकूर हे सत्तर-ऐंशीचं दशक नव्हे अन् आत्ताचे चोट्टे शोलेमधले गब्बरही नाहीत, तरीही बीडच्या गल्लीबोळात चोरट्यांची दहशत आहे. जो तो रात्र जागून काढतोय. एक दिवस नव्हे दोन दिवीस नव्हे तब्बल भीतीदाय वातावरणात महिना उलटून गेलाय तरीही बीडचे पोलीस प्रशासन शहरवासियांना निर्भय करू शकत नाहीत ही बीड पोलिसांची निष्क्रीयताच. तेव्हा एसपी साहेब आता तरी तोंड उघडा, लोकांना सांगा, चोट्टे खरे किती खोटे किती? सोशल मिडियावर व्हायरल होणार्या व्हिडिओ, फोटोमधले सत्य किती? जोपर्यंत लोकांना तुम्ही विश्वास देणार नाहीत तोपर्यंत भीतीदाय वातावरण शहरात कायम राहिल. दुसरीकडे चोर आले म्हणून पोलिसांना फोन केले तरी तात्काळ पोलीस येत नाहीत. त्यासाठी असे काही पथक नेमा, फोन आल्याबरोबर पाच ते दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी जाईल.
गेल्या महिनाभरापासून बीड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. चोरटे दोन-चार नसतात, टोळक्याने येतात असे सांगितले जातेय. अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडतायत. लोक रात्र जागून काढतायत. मात्र चोरट्यांची भीती लोकांच्या मनातून जात नाही. हे भीतीदाय वातावरण निर्माण करणार्या चोरट्यांना पकडा, अशी सर्वस्तरातून मागणी होतेय. मात्र जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि जनतेला विश्वास देण्यासाठी अद्याप वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तोंड उघडलेच नाही. शहरात नेमके काय होतेय, खरे काय, खोटे काय यावर भाष्य केलेच नाहीत यामुळे शहरात आणखीच भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी चोर्या होत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातली भीती अधिक दृढ होतेय. एकतर त्या आधी चोर्या रोखा आणि लोकांना विश्वास द्या पोलीस तुमच्या सोबत आहे. परंतु पोलीस यंत्रणा चोर्या रोखण्यात सपशेल अपयशी होत आहेत. त्यामुळे काही खरे काही खोटे चोरट्यांचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर पडत आहेत. त्यामुळे शहरात भीतीदाय वातावरण निर्माण झाले आहे. त्यातले व्हिडिओ आणि फोटो किती खरे किती खोटे हे लोकांना सांगा. तेव्हा लोकांच्या मनातली भीती दूर होईल. अनेक ठिकाणी चोर आल्याची माहिती सर्वसामान्य जनता पोलिसांना देते मात्र घटनास्थळावर पोलीस वेळेवर जात नसल्याची ओरडही आता जनतेतून होत आहे. चोर्या रोखायच्या असतील, जनतेच्या मनातील भीती दूर करायची असेल तर फोन आल्याबरोबर पाच ते दहा मिनिटात पोलीस त्या ठिकाणी जाईल, अशी व्यवस्था करा. शहरात एवढे गंभीर वातावरण असताना चोरट्यांची दहशत असताना पोलीस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी निर्धास्त असल्याची टीका जनतेतून होत आहे. सर्वसामान्यांच्या जान आणि मालची जबाबदारी ही सर्वस्वी शासन व्यवस्थेची असते त्यामुळे गृहमंत्री, पालकमंत्री यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.