मुंबई (रिपोर्टर): विधान परिषदेत काँग्रेसचे सात आमदार फुटले होते. त्यामुळेच शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव सहन कराला लागला होता. काँग्रेसने या फुटलेल्या आमदारांवर कठोर कारवाईचे संकेत दिले होते. या गद्दार आमदारांना ओळखण्यासाठी काँग्रेसने ट्रॅप देखील रचला होता. यातील सहा आमदारांनी नावे समोर आली आहे. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
विदर्भातील 1, मराठवाड्यातील 3 , उत्तर महाराष्ट्रातील 2 तर मुंबईतील एक आमदार फुटला असल्याचं समजत आहे. मराठवाड्यातील आमदार हे अशोक चव्हाण यांचे समर्थक असल्याची माहिती आहे. काँग्रेस या सर्वांवर कठोर कारवाई करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यासंदर्भातील अहवाल दिल्ली हायकमांडकडे पाठवणार आहेत.
काँग्रेसचे कोण-कोणते आमदार फुटले?
झिशान सिद्दीकी
सुलभा खोडके
हिरामण खोसकर
शिरीष चौधरी
मोहन हंबिर्डे
जितेश अंतापूरकर
विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणूक झाली. यात महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात होते. पण, महायुतीने धक्का देत आपले नऊ उमेदवार निवडून आणले. शरदचंद्र पवार यांच्या पाठिंब्याने शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी जोर लावला होता. पण, अखेर जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. यासाठी काँग्रेस आमदारांची मतं कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना रिंगणात उतरवले होते. काँग्रेसकडे अधिकचे मतं होते. त्यामुळे काँग्रेसने विधान परिषदेत दोन गट केले होते. एक गट सातव यांना मतदान करणार होता. तर, दुसरा गट जयंत पाटील यांना मतदान करणे अपेक्षित होते. दुसर्या पसंतीचे मतं देखील जयंत पाटील यांना पडले नाहीत. त्यांना शरदचंद्र पवार गटाची पहिल्या प्राधान्यक्रमाची 12 मतं पडली. नाना पटोले यांनी आमदार फुटल्याने नाराजी व्यक्त केली आहे. या गद्दार आमदारांना पुन्हा विधानसभेला संधी देऊ नये अशी मागणी ते हायकमांडकडे करणार आहेत.