जयंत पाटलांच्या टीकेचा अमरसिंह पंडितांकडून सणसणीत समाचार
बीड (रिपोर्टर): धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यादरम्यान घडलेल्या घडामोडी पक्षप्रवेशाच्या आधी झालेल्या बैठका तसेच पक्षप्रवेशाच्या नंतर झालेल्या बैठका व त्यांचा एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवास या सर्व बाबींचा मी स्वतः साक्षीदार आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच बळकटी देण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केलेले आहेत. अनेक आंदोलने, मोर्चे, विविध यात्रा धनंजय मुंडे यांनी सबंध महाराष्ट्रभर यशस्वी करून दाखवल्या. त्याचबरोबर 2014 ते 2019 या कालावधीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केले ज्याचा मोठ्या प्रमाणात फायदा पक्षाला झाला. मात्र आज इतक्या वर्षानंतर धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्याचा प्लॅन हा आत्मघातकी होता असा साक्षात्कार उर्वरित पक्षातील एखाद्या नेत्याला होत असेल तर ते अत्यंत हास्यास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माजी अमरसिंह पंडित यांनी जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.
जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी बीड दौर्यावर आले असता त्यांनी धनंजय मुंडे यांचा काही वर्षांपूर्वी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश हा आमचा आत्मघातकी प्लान ठरला, अशा स्वरूपाची टीका केली होती. त्यावर ज्येष्ठ नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या बळकटीसाठी दिलेले योगदान हे ठळक दिसणारे आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून पाच वर्षे कामकाज केले, त्यादरम्यान विविध सामाजिक, राजकीय, आरक्षणाचे अशा अनेक विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरून निर्णय घेण्यास भाग पाडण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले. त्यांच्या याच पाच वर्षांच्या कारकिर्दीची नोंद प्रत्यक्ष पवार साहेबांच्या आत्मचरित्रात सुद्धा आढळते. त्यामुळे अशा नेत्याच्या पक्षातील अस्तित्वावर टीका करणे हे गैर असल्याचे अमरसिंह पंडित म्हणाले. मी सर्व गोष्टींचा साक्षीदार असल्याने मला हेही ठाऊक आहे की त्यावेळी धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेता पद देण्यात आले, तेव्हा पक्षातून काही नेत्यांनी त्यास विरोधी केला होता. आता ते विरोध करणारे कोण होते? पक्षात धनंजय मुंडे सारखे कर्तृत्ववान नेते कुणाला नको वाटत होते? याचा शोध सर्वांनीच घेतला पाहिजे, असा टोलाही अमरसिंह पंडित यांनी लगावला आहे.