केज – मांजरसुंबा रस्त्यावर मस्साजोग येथे माजी आ. संगीता ठोंबरे यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या मालकीचा सुभद्रा पेट्रोल पंप असून या पंपावर मॅनेजर म्हणून आकाश बालासाहेब पाखरे (रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) हा मागील दोन वर्षांपासून 8 हजार रुपये प्रति महिना पगारावर काम करीत होता. पाखरे हा दररोज विक्री होणारे डिझेल, पेट्रोल याचा हिशोब, पेट्रोल, डिझेलची मागणी करणे, इतर नोकराची पगार करणे, पंपासंबंधी सर्व कामे, व्यवहार तो मॅनेजर म्हणून करीत रोज जमा झालेले पैसे केज शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत शुभद्रा पेट्रोलीयम नावाने असलेल्या खात्यावर भरणा करीत होता. 5 ऑगस्ट रोजी इंडीयन ऑईल कंपनीचे सेल्स ऑफिसर अमीत बोडसे यांनी डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांना फोन करून तुमचा पंप मागील चार दिवसांपासून का बंद आहे ? अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी मॅनेजर आकाश पाखरे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन बंद असल्याने त्यांनी पेट्रोल पंपावरील कामगार अनिल पोपळे याच्याशी संपर्क साधून विचारणा केली. त्याने आकाश हा गावाकडे गेल्याचे व पंपातील डिझेल, पेट्रोल संपल्याने पंप बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी पुण्याहून येऊन पेट्रोल पंपावर जाऊन रेकॉर्ड बघितले. मात्र कुठल्याही रेकॉर्ड आढळून नाल्याने त्यांना कामगारांनी 26 जून पासून डिझेल, पेट्रोल विक्रीतून 11 लाख 43 हजार 570 रुपये आल्याचे सांगितले. पेट्रोल पंपाच्या बँक खात्याने आकाश पाखरे याने 27 जून पासून रक्कमेचा भरणा केला नसल्याचे निदर्शनास आल्याने आकाश पाखरे हा 11 लाख 43 हजार 570 रुपयांची रक्कम घेऊन पसार झाला. डॉ. ठोंबरे यांनी दिल्यावरून मॅनेजर आकाश पाखरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.