मुंबई (रिपोर्टर) मुख्यमंत्र्यांसोबतच्या पत्रकार परिषदेत माईक ओढून घेणे आणि चिठ्ठी देणे या प्रकारावरून टीका झाल्यानंतर पुन्हा असं होऊ नये याची खबरदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येत असल्याचं आजच्या पत्रकार परिषदेत दिसलं आहे. दोन माईक ठेवलेले आहेत आणि कोणतीही चिठ्ठी नाही, असं पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना शिंदेंसमोरचा माईक ओढून घेतला होता. त्यावरून बरीच टीका झाली होती. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचा आक्षेप विरोधी पक्षांकडून घेण्यात आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा असा अपमान कधी झाला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. तर हे सरकार टिकणार नाही यांची आतापासूनच माईकची ओढाओढी सुरू झाली, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं होतं.
माईक ओढण्याच्या प्रकारानंतर दुसर्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी चिठ्ठीवर मजकूर लिहून शिंदेंसमोर चिठ्ठी सरकवली होती. यावरूनही टीका होत आहे. या टीकेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सावध झाले असून शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन माईक ठेवण्यात आले होते. तसंच कोणतीही चिठ्ठी नाही असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.
पुन्हा नामांतर; औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात ’छत्रपती’ या शब्दाची भर घालत ’छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार हे अल्पमतात असूनही राज्यातील काही शहरांच्या नामांतराचा घाईगडबडीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयांबाबत पुढे काही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आम्ही नामांतराच्या निर्णयांना स्थगिती दिली होती.