गणेश सावंत –
लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांचा पाहिलेला दबदबा आणि त्यातून महायुतीची झालेली पिछेहाट पाहता आता विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यासह राज्यातल्या अनेकांना ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतय’ चे स्वप्न पडत असल्याने जो तो 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावू पाहत आहे. पक्ष आणि पक्षविरहीत धनीक आणि निर्धनिक गुडघ्याला बाशींग बांधून बोहल्यावर चढण्यासाठी उतावळे झाल्याचे दिसून येत आहेत. अशा स्थितीत प्रस्थापितांची मात्र अडकीत्यात सुपारी होऊन बसली. जरांगे नाआवडते असले तरी प्रस्थापितांना जरांगेंचं कोडकौतुक करावं लागतं. कारण भविष्याच्या विजयाचं घोंगडं जरांगेंच्या खाली अहकलं आहे. तेच ओळखून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आता इच्छुकांच्या बहुगर्दीला अंतरवली सराटी इथे आणण्यापेक्षा थेट प्रत्येक मतदारसंघात जावून
घोंगडी बैठक
घेण्याचे प्रयोजन सुरू केले आहे. सर्वात पहिली बैठक ही गेवराई शहरात 5 सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात आली असून बीड जिल्ह्यासह राज्यातल्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये या घोंगडी बैठकीच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील जाहीरसभा घेणार असल्याचे दिसून येते. यातून मनोज जरांगे पाटील हे आपल्या मराठा आरक्षणाच्या मागणीवर जेवढे ठाम आहेत तेवढेच ते निवडणुकीच्या आखाड्यामध्ये हाबूक ठोकण्यासही तयार असल्याचे दिसून येते. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून उभारण्यात आलेल्या आंदोलनामुळे भारतीय जनता पार्टीसह महायुतीच्या उमेदवारांना राज्यभरात जो फटका बसला आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून आले ते पाहता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इफेक्ट त्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे जाणवला आणि इथेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जो तो जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्ठा करू लागला. जरांगे पाटलांनी आरक्षण दिलं नाही तर महायुतीला महाराष्ट्रातून पायउतार करण्याहेतू सर्व ताकद लावण्याचे इशारे दिले आहेत. एवढेच नव्हे तर विधानसभेची निवडणूकही लढवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे पाटलांच्या या निर्णायक भूमिकेमुळे प्रस्थापितांच्या राजकारणाला सुरंग लागणार हे निश्चित झाले आहे. जिथे निवडणुका आल्या की, प्रस्थापितांमधले दोन-चार उमेदवार चर्चेत राहायचे, तिथे मनोज जरांगे पाटलांच्या इफेक्टिव्ह राजकारणामुळे अनेकांना
‘मला आमदार झाल्यासारखं वाटतं’
या दिव्य स्वप्नाबरोबर मतांच्या धु्रवीकरणासाठीही अनेकजण विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरू पाहत आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या कालखंडामध्ये अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची अनेक प्रस्थापीत, विस्थापीत, हौशे-नौशे यांनी भेटी घेऊन उमेदवारीचे प्रस्ताव जरांगेंसमोर ठवेले. ज्या भाजपाच्या विरोधात मनोज जरांगे हे आक्रमकपणे भूमिका मांडतात त्या भाजपाच्या सक्रिय पदाधिकार्यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. बीडमधून सहा मतदारसंघांसाठी शेकड्यावर इच्छूक जरांगे पाटील यांच्याकडे डेरेदाखल झाले आणि त्यांनी उमेदवारी बाबत अर्ज दिले. अशा परिस्थितीत जागा एक इच्छूक अनेक यावर उत्तर शोधण्यासाठी जरांगेंनी आता एक पुढचं पाऊल टाकलं… आणि ते पाऊल
‘घोंगडी बैठक’
चे असणार आहे. 5 सप्टेंबरपासून या बैठकांना सुरुवात होणार आहे. सर्वात पहिली बैठक ही बहुचर्चीत असलेल्या गेवराईमध्ये होत आहे. या मतदारसंघात पंडित-पवार याचें कायम अधिराज्य पहायला मिळालेले आहे. आता 2024 च्या निवडणुकीमध्ये महायुती झाल्याने आणि अजित पवार महायुतीत सामील झाल्याने आधीच महायुतीला उमेदवारीचं कोडं पडलेलं असताना जरांगे पाटलांचे आशीर्वाद मिळण्याहेतू अनेकजण ‘गेवराई माझी’ म्हणत ‘मुक्ती’ची भाषा सोडून देत ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणा देऊ लागल्याने या बैठकीला आता अनन्यसाधारण महत्व राज्यपातळीवर पहायला मिळत आहे. ही बैठक सभेचं स्वरुप घेईल आणि तशाच बैठका पुढे जिल्ह्यात आणि राज्यातल्या बहुतांशी भागांमध्ये होतील. सत्ताधार्यांसाठी आणि विरोधकातील प्रस्थापीतांसाठी जरांगेंची घोंगडी बैठक ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. जरांगे आक्रमक पद्धतीने सरकारवर ताशेरे ओढत असताना राज्य सरकारही जरांगेंना बाटलीत उतरवण्याहेतू डावपेच आखत आहेत. परंतु प्रत्येक डावावर विजयी मिळवित जरांगेंचा प्रतिडाव हा महायुतीसाठी अडचणीचा ठरत चालला आहे. त्यामुळे जरांगेंविरोदात आक्रमक भूमिका सत्ताधारी महायुतीतील नेत्यांना घ्यायची असली तरी
घोंगडं अडकलं
म्हणून ती घेताही येत नाही. ग्रामीण भागामध्ये एक म्हण प्रचलीत आहे…‘समजा एखाद्यासोबत आपले घनिष्ठ संबंध आहेत आणि त्याच्या सोबत आपण आपल्या नाआवडत्या ठिकाणी गेलोत, तेथून आपल्याला तात्काळ निघायचं आहे, परंतु आपले घनिष्ठ संबंध असलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला तेथेच ठाण मांडून बसावे लागते, तसं प्रस्थापीतांसह सत्ताधार्यांचे होऊन बसलेय. जरांगे त्यांना नाआवडते आहेत, जरांगेंबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. परंतु सत्ताकारणाची आणि विजयाची गुरुकुल्ली ही मराठा आरक्षणाच्या दिशेने जाते आणि त्याच मराठा आरक्षणाची घोंगडी आजमितीला जरांगे पाटलांच्या खाली आहे. ती घोंगडी घेतल्याशिवाय सत्ताधार्यांना अथवा विरोधकांना तेथून जाता येणार नाही म्हणजेच थेट जरांगेंना विरोधही करता येणार नाही. अडकीत्यात सुपारी असावी तशी सत्ताधार्यांची हालत होऊन बसली आणि राज्यातलं
दूषित वातावरण
आपल्या सत्ताकारणाला बाधीत करील म्हणून महायुती 2024 च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सर्वबाबींची चाचपणी करत आहे. आत्ताच तीन राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाली. प्रत्येक पाच वर्षाला त्या राज्यांसोबत महाराष्ट्राची निवडणूक होत असते या वेळेस ती होत नाही. याचा अर्थ सत्ताधारी 2024च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी अनुकूल नाहीत, ते वेळकाढूपणा करत आपली अडकलेली घोंगडी काढू पाहत आहेत. परंतु जरांगे पाटील हेही खाली अंथरलेली घोंगडी खांद्यावर घेऊन उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकर्यांची गर्जमाफी, सुशिक्षीत बेरोजगारी, राज्यातला भ्रष्टाचार, असुरक्षीत महिलांचा प्रश्न घेऊन महाराष्ट्रासमोर घोंगडी बैठकीच्या माध्यमातून जाणार आहेत.