निवडणूक गंभीरतेने घेण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना
बीड (रिपोर्टर): विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील महायुतीत तूतू मैमै सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र आतापर्यंत प्रतिक्रिया देण्यास टाळलं होतं, मात्र आता त्यांनी प्रतिक्रिया देत कोण काय बोलतय, याकडे माझं लक्ष नाही. माझं लक्ष विधानसभा निवडणुकीबरोबर राज्याच्या विकासाकडे असल्याचे सांगत महायुतीत वाचाळ बडबड करणार्यांबाबत त्यांनी आज स्पष्ट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझं बोलणं मोदी-शहा-फडणविसांशी, तुम्ही जर असेच बोलत असाल तर माझे कार्यकर्तेही प्रतिक्रिया देतील. परंतु जे बोलतात त्यांना मी महत्व देत नसल्याचे सांगत अजित पवारांनी लोकसभेतलं नेरेटिव्ह बदलायचं असल्याचे सांगून आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक अत्यंत गंभीरपणे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी महायुतीतील शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करत वक्तव्य केलं. त्यापाठोपाठ भाजपाचे प्रवक्ते गणेश हाकेंनीही ‘असंगाशी संग’ अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं. यावर अजित पवार आता स्पष्ट बोलले आहेत. माध्यमांनी विचारल्यानंतर बोलताना अजितदादा म्हणाले, माझं बोलणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं आहे, तुम्ही जर असेच बोलत बसलात तर माझे कार्यकर्ते देखील प्रतिक्रिया देत राहतील. हाकेच्या बोलण्याला काही अर्थ नाही, माझं काम सुरू आहे. या उत्तरांना मी महत्व देत नाही, असे म्हणून अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना आणि पक्षातील नेत्यांना काही सूचना केल्या आहेत. निवडणूक अत्यंत गंभीरतेने घ्या, हलगर्जीपणा करू नका, लोकसभेचं नेरेयिव्ह आपल्याला बदलायचं आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या युवा अधिवेशनात त्यांनी कार्यकर्त्यांनाही अनेक सूचना करत नकारात्मक प्रचार होता कामानये, सोशल मिडियावर प्रचार वाढवण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या आहेत. यातून महायुतीत अलबेल नसले तरी अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अधिक सतर्क आणि सजगतेने काम करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.