– दूषित पाणीपुरवठा
– भावी नगरसेवक नगराध्यक्ष गायब
– तक्रार करावी कोणाकडे ? शहरवासीयांचा सवाल
———–
माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव नगरपालिकेचा कार्यकाळ संपून सुमारे दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरीही शासन नगरपालिका निवडणुकीचे नाव घेत नाही त्यामुळे माजलगाव शहराची अवस्था बकाल झाली असून शहरात सर्वत्र अस्वच्छता, घाण, दुर्गंधी पसरली आहे. शहरवासियांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने माजलगावकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे माजलगाव ला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माजलगाव शहराच्या उशाला धरण आहे त्यामुळे त्यामुळे पाण्याची उपलब्धता असल्याने तालुका परिसरातील शेती व माजलगाव ची बाजारपेठ समृद्ध आहे. त्याचबरोबर खामगाव पंढरपूर आणि कल्याण विशाखापट्टणम हे दोन राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेलेले असल्याने माजलगाव शहर मोठ्या शहरांना जोडले गेलेले आहे. असे असले तरी नगरपालिकेचा कार्यकाळ संपून पालिकेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांची नियुक्ती शासनाने केलेली आहे. परंतु चंद्रकांत चव्हाण यांना कार्यालयात कधीही पाहिले जात नाही ते सतत गैरहजर असतात त्यामुळे कर्मचार्यावर कोणाचाही वचक अथवा अंकुश राहिलेला नाही याचे परिणाम शहरवासीयांना भोगावे लागत आहेत शहरातील विविध भागांमध्ये वेळेवर स्वच्छता होत नाही, पालिकेत कुठलाही कागद आणण्यासाठी गेल्यास कर्मचारी भेटत नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे माजलगाव शहराची बकाल अवस्था झाली असून अशा परिस्थितीत भावी नगरसेवक व भावी नगराध्यक्ष मात्र गायब असल्याचे चित्र आहे. त्यामुळे माजलगाव शहराला कोणी वाली आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान अधिकारी महोदय हे कार्यालयात गैरहजर असल्याने तक्रार करावी कोणाकडे ? असा सवाल देखील शहरवासीय उपस्थित करत आहेत. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.
——-
पालिका कर्मचारी संपावर
माजलगाव नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्याने आधीच कर्मचार्यांचा असलेला मनमानी कारभार आणि त्यात आता पुकारलेला संप हे मात्र शहरवासीयांच्या अडचणीत वाढ करणारे ठरत आहे त्यामुळे शासनाने संपाचा तोडगा लवकरात लवकर काढण्याची गरज आहे.
——
मुख्य रस्त्यावरील अर्धवट नाल्यांच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम
माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावर पालखी महामार्ग खामगाव पंढरपूर या रस्त्याचे काम झाले परंतु मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे आणि विविध अडचणीमुळे रस्ता अरुंद करावा लागला. संबंधित कंपनीने रस्त्यासह नाल्या केल्या परंतु बहुतांश ठिकाणी अर्धवट नाल्या केल्या त्यामुळे पावसाळ्यात अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या नुकसानीचा सामना येथील व्यापार्यांना करावा लागतो या नाली प्रश्नाकडे देखील कोणाचेही लक्ष नाही.