अंतरवली सराटी (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची पाचव्या दिवशी प्रकृती खालावल्याने उपस्थित समाजाने जरांगे पाटील उपचार घ्या, म्हणत विनवणी केली. त्याच दरम्यान मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास मंत्री शंभुराजे देसाई यांचे आणि जरांगे पाटील यांच्यात भ्रमणध्वनीवरून संभाषण झाले. समाजातील माता-भगिनींचा आग्रह पाहता रात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांना सराईन लावण्यात आली आहे. आज सकाळी चार सलाईन लावल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे अंतरवली सराटीकडे येणार्या रस्त्यावर बॅरीगेटस् लावल्याने मनोज जरांगे अधिक संतापल्याचेही बोलले जाते. मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केल्यानंतर तेथील बॅरीगेटस् काढण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने उपचारा बाबत समाजाने त्यांना विनवण्या सुरु केल्या होत्या. मध्यरात्री समाजाच्या विनवणीला मान देत त्यांनी सलाईन घेतली. त्याच दरम्यान मध्यरात्री मंत्री शंभुराजे देसाई यांचा फोन आला. या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यावेळी शंभूराजे देसाई यांनी प्रकृतीची काळजी घेण्याबाबत म्हटले. आज सकाळी जरांगे पाटलांना चार सलाईन देण्यात आल्या. मात्र त्याच दरम्यान पाटील यांना अंतरवली सराटीकडे येणारे रस्ते बॅरीगेटस् टाकनू बंद केल्याची माहिती मिळाल्यानंतर ते अधिक संतापले. प्रतिक्रिया देत ‘आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत अहोत, उगाच आडवाआडवी करू नका, लोकांना त्रास देऊ नका, आंदोलन चिघळू नका,’ असे म्हटल्यानंतर बॅरीगेटस् पुन्हा काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.