शरद पवार गटाची जय्यत तयारी
काँग्रेस शांत, ठाकरे सेनेची शरद पवारांना डोकेदुखी, अजित पवार गटाच्या उमेदवारांची निर्णायक तयारीत, शिंदे गटाला जागा मिळणार का?
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा निवडणुकीसाठी कुठल्या पक्षाकडून कुठल्या नेत्याला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून असून ना. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात जिल्ह्यात महायुती तयारीच्या सुप्त लाटेत दिसून येत आहे तर तिकडे आघाडीचा मात्र जिल्हाभरात उथळ खळखळाट पहावयास मिळत आहे. भाजपात मात्र नाराजीचे सत्र गेवराई-माजलगावात स्पष्टपणे चालूच असून शरद पवारांच्या गटाची जय्यत तयारी असली तरी ठाकरे सेना पवारांच्या तयारीला डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते. इकडे अजित पवार गटाच्या उमेदवारांची निर्णायक तयारीत झाल्याचे चित्र पहावयास मिळत असून शिंदे गट जिल्ह्यात कुठली जागा मागणार यावर नुसती चर्चा होताना दिसून येते.
कधीकाळी भाजपाचा गड राहिलेल्या बीड जिल्ह्यात कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकारणातले चित्र बदलले. कालचे सखे आजचे वैरी बनले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची? हे प्रश्न प्रत्येक पक्षासमोर उभे राहिले. बीड जिल्ह्यात हे प्रश्न उपस्थित असले तरी अजित पवार राष्ट्रवादी गटाने या प्रश्नावर आधीच तोडगा काढत भाजपाला दोन तर अजित पवार गटाला चार जागा अधिृकत ठरल्या. महायुतीत उद्याच्या निवडणुकीसाठी निवडणुकीची तयारी सुप्त लाटेत पहायला मिळत आहे. फक्त गेवराईतील भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांची पक्षाविरुद्धची भूमिका, आष्टीत भाजपाचे धस-धोंडे यांच्यातला राजकीय वैरभाव आणि माजलगावमधील भाजपाचे मोहन जगताप यांची बंडखोर हालचाल पाहिली तर महायुतीत बाकी सर्व व्यवस्थीत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत जो तो शरद पवारांच्या नेतृत्वात काम करण्यास इच्छुक आहे. पवारांनी नेहमीप्रमाणे जिल्ह्याचं राजकारण अस्थिर करण्याचा खटाटोप सुरु ठेवला आहे. सहाही मतदारसंघात ते चाचपणी करत आहेत आणि त्या चाचपणीत आपलाच उमेदवार या मतदारसंघात दिला जाणार, ही चर्चा घडवून आणत आहेत. त्या एकअंगी निर्णयक्षमतेला ठाकरे सेना आता आक्रमकपणे आडवी येत असल्याचे दिसून येते. गेवराईत भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार हे शरद पवारांच्या वळचणीला जातील, यावर चर्चा होत असतानाच काल ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेवराईत बैठक घेतली आणि माजी मंत्री बदामराव पंडित हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे ठणकावून सांगितले. तसे त्या परळी, अंबाजोगाईत बैठकी घेत राहिल्या आणि ना. मुंडेंना टार्गेट करत राहिल्या. मात्र ठाकरे सेनेची बीड जिल्ह्यात ताकद किती? हा शोधाचा विषय आहे. दुसरीकडे जिल्ह्यामध्ये पाटील घराण्यापुरती शिल्लक राहिलेली काँग्रेस सध्यातरी शांत दिसून येत असून काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्याच हालचाली पहावयास मिळत नाहीत. शिंदे सेनेकडून बीड जिल्ह्यात बीड विधानसभेची जागा मागितली गेली असली तरी त्या मागणीत तेवढा प्रभाव पहायला मिळत नाही. इकडे मात्र अजित पवार गटाच्या चारही मतदारसंघात निर्णायक तयारी झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.