==================
लोकांचे प्रश्न सोडवणे, त्यांचे अश्रू पुसणे हा खरा काकुंचा वारसा, तो जपण्याचं काम ज्या पद्धतीने त्यांच्या पुढच्या पिढीने केले, त्या पद्धतीने ते काम मीही करत आहे. आमचं घर फुटलं, तीन विचारधारा झाल्या, त्या विचारधारामध्ये माझे प्रमुख विरोधक हे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर असतील. आमच्या काकांनी निवृत्ती घ्यावी की नाही हे त्यांनी ठरवावं त्यांना सांगणारा मी एवढा मोठा झालो नाही. पक्ष प्रवेश करताना कुटुंबासह कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून आपण पक्षप्रवेश केलेला आहे. उमेदवारीचा शब्द घेवून मी पक्षात आलेलो नाही. पश्चिम महाराष्ट्रासारखा माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा हे आपले ध्येय असल्याचे सांगत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सायं.दै. बीड रिपोर्टरच्या थेट सवालांना कार्यकारी संपादक गणेश सावंत यांच्या सोबत उत्तरं दिली.
==============
प्रश्न : आपण वैद्यकीय शिक्षण घेतलं, सेवाही सुरू केली. मग अचानक राजकारणात सक्रीय होण्याचे कारण?
उत्तर : माझ्या घरामध्ये माझ्या जन्माच्या आधीपासून राजकारण, समाजकारणाचा पिंड आहे. सुरूवातीपासून मलाही राजकारणामध्ये रस आहेच. मी ज्या घरात जन्मलो त्या घराला राजकीय घर मानलं जातं. घरामध्ये लोकांची सातत्याने असलेली वर्दळ, त्यांची कामे, नेत्यांच्या भेटीगाठी, मुक्काम, जेवण हे सर्व पाहत आलो आहे. शालेय जीवनात असतांना अनेक निवडणूका पाहितल्या, त्या निवडणुकांमध्ये अपसूक थोडाफार सहभाग आमचा असायचाच. जरी शिक्षणासाठी बाहेर राहिलेलो असलो तरी घरचा संपर्क, माहिती कायम असायची. डॉक्टर झालो म्हणून राजकारण, समाजकारणापासून बाजुला जायचं असं कधी मनात आलंंही नाही. त्यामुळे राजकारणात सक्रीय झालो.
प्रश्न : स्व.काकुंचा वारसा नेमका कोण चालवतो? आणि हो काकुंचा वारसा नेमका काय आहे?
उत्तर : काकुंसह नानांना सातत्याने लोकांमध्ये राहणं पसंत असायचं. ते लोकात राहायचे. त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे. मतदारसंघाचा ते सातत्याने दौरे करायचे. बीड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या कायम दुष्काळी आणि मागास असतो. इथे पाऊस कमी पडतो, त्यामुळे इथले लोक ऊसतोडणीला जातात. हे पाहताना काकुंना नेहमी वाटायचं इथलं सिंचन क्षेत्र वाढावं, आपले लोक इथेच राहावेत त्यासाठी त्यांनी सिंचन, शिक्षण आणि कारखानदारीवर भर दिला. आपल्या लोकांच्या मुलामुलींना शिक्षण घेता यावं म्हणून शिक्षणाचं जाळं जिल्हाभरात त्यांनी विनलं. त्यातून गोरगरीबांची मुलं शिकली. त्याच मुलांना संस्थेमध्ये नोकर्या दिल्या. तो काळ अशिक्षितांचा असायचा त्यामुळे अधिकार्यांकडून सर्वसामान्य लोकांचे शोषण व्हायचे. ते शोषण त्यांनी होवू दिले नाही. भ्रष्टाचार होवू दिला नाही. एकुणच सर्वसामान्यांतील सर्वसामान्य माणसाला त्यांच्या मुलभूत गरजा हे त्यांचे हक्क असे काकु नेहमी म्हणायच्या हाच त्यांचा प्रमुख वारसा आहे. तो वारसा पुढे अण्णांनी, माझ्या वडिलांनी चालवला. परंतु पुढे विद्यमान आमदार यांनी मात्र काकुंचा वारसा सातत्याने बोलून दाखविला. कृतीतून कधीच त्यांनी तो चालवला नाही. त्यांचे पीए असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील हे सरळ सरळ लोकांची लूट करत आहेत. अधिकार्यांवर दबाव टाकणं, ब्लॅकमेलिंग करणं, एलएक्यूच्या माध्यमातून तोडपाणी झाली की माघार घेणं, कोणाच्या कोणावर अंकुश त्यांच्या काळात नाही. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. सकारात्मक राजकारण, समाजकारण व्हावं यासाठी मी राजकारणात सक्रीय झालो आहे.
प्रश्न : महाराष्ट्रात काका पुतण्याचं राजकारणाची नेहमीच चर्चा असते, तुम्ही अचानक आपले काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना का सोडलं?
उत्तर : आमचं घर केव्हाच फुटलेलं आहे, तो विषय आता जुना झाला आहे. सर्वांना माहित आहे. परंतू मी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये अजीतदादा आणि धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अण्णांना ही ऑफर होती. मात्र अण्णांना आणखी वेळ हवा होता. परंतू अपक्ष राहून कुठल्याही पक्षात न राहता आपण लोकांची कामे करू शकणार नाहीत. लोकांची कामे होत नाहीत. त्यामुळे आपली भुमिका स्पष्ट झाली पाहिजे. आपल्या पक्ष हवा असं माझं मत होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांचं मत तसंच होतं. म्हणून मी निर्णय घेतला.
प्रश्न : आज जे आपल्यासमोर राजकारणाचं चित्र दिसतं, यामध्ये आपले प्रमुख विरोधक जयदत्त क्षीरसागर की संदीप क्षीरसागर?
उत्तर : आज आपल्याकडे एवढे पक्ष झाले आहेत, त्यात कोण कोणासोबत युती करतयं, कोण कुठं आणि कोणाकडून उभा राहतयं? क्षीरसागर परिवारच नाही तर अन्य पक्षाचे लोकही इथे उभे राहणार आहेत. त्यावेळेस काय परिस्थिती राहतेय, याचे आकलन आज करता येणार नाही, हे त्यावेळेसच सांगता येईल, माझा प्रमुख विरोधक कोण असेल ते!
प्रश्न : क्षीरसागर घराण्याचा मतदारसंघावर चांगला दबदबा आहे. आता त्याच घरात तीन विचारसरणी झाल्या आहेत. म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला हे विचारतो, या दोघांपैकी तुमचा प्रमुख विरोधक कोण?
उत्तर : संदीप जेव्हा बाजुला झाले, तेव्हा क्षीरसागरांवर प्रेम करणारे लोक त्यांच्यासोबत गेले नाहीत, जे त्यांच्यासोबत होते ते नक्कीच विरोधक होते. जेव्हा अण्णा आणि आम्ही एक होतो तेव्हा काकु-नानांपासून जे परिवार आमच्यासोबत होते ते आजही आमच्याच सोबत आहेत. विद्यमान आमदार हे खरे तर माझे प्रमुख विरोधक असतील.
प्रश्न : जेव्हा अण्णांची साथ सोडण्याचा निर्णय झाला तेव्हा या निर्णयाला कुटुंबियांची साथ होती का?
उत्तर : राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असतांना लोकांची कामे करणे महत्त्वाचे असते. आणि लोकांची कामे करायची असतील तर त्यासाठी कुठला तरी पक्ष असणे महत्त्वाचं असतं असं मला नेहमी वाटायचं. मी जेवढ्या पद्धतीने पक्षात जाण्याबाबत निर्णयावर आलो, त्यापेक्षा अधिक तिव्रतेने कुटुंबालाही आपण एखाद्या पक्षामध्ये असावं असं वाटायचं. हा निर्णय घेताना माझ्या परिवारासह जो माझा कार्यकर्त्यांचा विस्तारीत परिवार आहे, त्यांसोबत चर्चा करूनच आपण अजीतदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे.
प्रश्न : महायुतीत तीन पक्ष आहेत. इकडे भाजपाचे मस्के तिकीट मागतायत, तिकडे शिंदे सेनेचे जगताप तिकीट मागतायत, राष्ट्रवादीमध्येही अनेकजण इच्छूक आहेत तर अशा परिस्थितीत तुम्हाला उमेदवारी मिळणार का?
उत्तर : जेव्हा ही महायूती झाली तेव्हा युतीमध्ये काही निकष ठरलेले असतात. जेथून ज्या पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक लढवलेली आहे, बहुदा त्या पक्षालाच त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचे अलिखित संकेत असतात. इथे गेल्यावेळेस राष्ट्रवादीची जागा होती, त्यामुळे इथली जागा ही राष्ट्रवादीच्याच गटाला येणार आहे. पक्षप्रवेश करण्याच्या आधीपासून आम्ही मतदारसंघामध्ये काम सुरू ठेवलेलं आहे. लढण्याची तयारी दाखविलेली आहे. गेल्या चार वर्षांपासून निवडणूकीची तयारी आम्ही केलेली आहे.
प्रश्न : म्हणजे पक्ष प्रवेश हा उमेदवारीचा शब्द घेवून केला असं म्हणता येईल?
उत्तर : बिल्कुल नाही, पक्षप्रवेश करताना मी कुठल्या कामाचा अथवा उमेदवारीचा शब्द घेतलेला नाही, आणि दिालेला नाही. परंतू शब्दाचे पक्के असलेले आमचे नेते अजीतदादा पवार व ना.धनंजय मुंडे यांच्यासोबत संवाद कायम चालू होता. आम्ही कुठलाही शब्द घेतलेला नाही, केवळ आमच्या भागातला विकास व्हावा एवढ्यासाठीच आम्ही तेव्हा पक्षप्रवेश केलेला आहे.
प्रश्न : आत्ता लोकसभेची निवडणूक झाली, बीड मतदारसंघ महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचंड मायनस गेला, काय कारण?
उत्तर : अनेक कारणे आहेत, त्यामध्ये जातीचा संघर्ष होता, वेगवेगळे ‘नेरिटिव्ह’ त्यावेळेस विरोधकांकडून तयार करण्यात आले होते. भाजप आलं तर मुस्लिमांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल अशी त्यांना भिती घालण्यात येत होती. दलित समाजाला भाजप आलं तर संविधान बदललं जाईल असं सांगितलं जात होतं. वेगवेगळा अपप्रचार महायुतीबाबत सातत्याने होतहोता, तो अपप्रचार रोखण्यात महायुतीला अपयश आले, त्यामुळे ही मते मोठ्या प्रमाणात आघाडीच्या उमेदवाराला मिळाली.
प्रश्न : बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागरांमुळे आघाडीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळाले का?
उत्तर : तुम्हाला माहीत आहे ते काय दावे करतात आणि त्यांचे काय काम आहे. लहानपणापासून त्यांना मीपणा आणि मीच केले हे सांगण्याची सवय आहे. आता दोन महिन्यात घोडामैदान समोर आहे, तेव्हा दिसेल कोणामुळे काय झाले ते!
प्रश्न : लोकसभेत मायनस झालेला बीड मतदारसंघ विधानसभेत तुम्हाला प्लस दिसेल?
उत्तर : प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, निवडणूक लढवणारे उमेदवार वेगवेगळे असतात. गेल्यावेळेसच्या निवडणूकीचंच पहा आष्टी मतदारसंघात लोकसभेला भाजपाच्या उमेदवाराला सर्वाधिक लिड होती आणि विधानसभेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. असं काही नसतं, फरक होत असतो.
प्रश्न : बीड जिल्ह्यात ओबीसी विरूद्ध मराठा वाद पहायला मिळतो, तुम्ही याकडे कसे पाहता?
उत्तर : जातीवाद काही अंशी असतो, मागच्या काळामध्ये आंदोलने झाली, तेव्हा तो उफळून आल्याचे दिसून आले. बीड जिल्ह्यात नाही तर सर्वत्रच असतं, आता ती स्थिती नाहीयं. काही दिवस रुसवे, फुगवे असतात, पुन्हा लोक एकत्र येतात, आता सर्वत्र सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत आहे.
प्रश्न : विधानसभेच्या निवडणूकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा किती प्रभावी असेल?
उत्तर :मराठा समाजातील मुलांना नोकर्या मिळत नाहीत, शिक्षणात अडचणी येतात, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा तो प्रश्न तसाच आहे. साहजिक लोकांमध्ये असंतोष असणारच, त्यात त्यांच्या प्रश्नाला मनोज जरांगे यांच्या माध्यमातून व्यासपिठ मिळालं, आता सरकारही हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यातून कुठे ना कुठे मार्ग नक्की निघेल अशी अपेक्षा आपण करू.
प्रश्न : उद्याच्या निवडणूकीत कुठले व्हिजन घेवून तुम्ही लोकांसमोर जाणार आहात?
उत्तर : मी एक सुशिक्षित आहे आणि मला नेहमी वाटतं, माझा मतदारसंघ हा विकसित असावा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकास कामे होतात, त्या पद्धतीची कामे आपल्याकडे का होवू शकत नाहीत हा प्रश्न मला नेहमी सतावतो. आम्ही न.प.च्या माध्यमातून ज्या पद्धतीने विकास केलेला आहे, त्या पद्धतीने ग्रामीण भागाचाही विकास व्हायला हवा आणि तो होवू शकतो. हा विचार माझ्या मनात नेहमी असतो, त्यामुळे चांगल्यात चांगले काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
प्रश्न : आपण म्हणता बीड न.प.त मोठा विकास झाला, मग आजही पाणी प्रश्न आणि अस्वच्छतेवर ओरड का होते?
उत्तर : हल्लीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी ज्या जबाबदारीने काम करतात, त्यांना निवडणुका लढवायच्या असतात, लोकांमध्ये राहायचं असतं, लोकप्रतिनिधी नेहमीच अलर्ट असतात मात्र अधिकारी आणि कर्मचारी हे सकाळी 10 ते 6 काम करतात. आठवड्यात दोन सुट्ट्या असतात त्यांना त्यांच्या नोकरीचंच पडलेलं असतं. लोकांच्या कामाचे महत्त्व त्यांना वाटत नसते. तरीही त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही ना.मुंडे आणि सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत, परंतू जोपर्यंत न.प.मध्ये शासन येत नाही आणि प्राशसनाच्या हातामध्ये कारभार राहील तोपर्यंत या अडचणी राहतील, मी हे प्रमाणिकपणे मान्य करतो, काही प्रमाणात पाणी आणि अस्वच्छतेचा प्रश्न आहे.
प्रश्न : माजलगावचे काका प्रकाश सोळंकेंनी रिटायरमेंट घेतली, पुतण्याला समोर केले. तुम्हाला वाटतं का तुमच्या काकांनी निवृत्ती घ्यावी?
उत्तर : आमचे काका ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत. त्यांनी नेमकं काय करावं हे मी सांगू शकत नाही. तेवढा मी मोठा नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेच देवू शकतात. त्यांनी काय विचार करावा यापेक्षा आजची मतदारसंघातली परिस्थिती काय आहे. हे त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी पहावं, त्यांचा तो वैयक्तीक प्रश्न असेल.
प्रश्न : विद्यमान आमदाराच्या कार्यपद्धतीकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर : विद्यमान आमदाराची कार्यपद्धतच नाही. ते केवळ आणि केवळ स्वत:ला काय मिळतं याकडे जास्त लक्ष देतात. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी बीडमध्ये एकही प्रकल्प आणला नाही. एखादा प्रोजेक्ट ते आणू शकले नाहीत, जे काही रस्त्याची कामे झालेली आहेत, त्याचा पाठपुरावा आम्ही केला. ना.धनंजय मुंडेंच्या माध्यमातून आम्ही उलट जास्त कामे केली. त्यांनी ते अडवण्याचे आणि त्यात काय मिळते हे पाहण्याचे काम केले. हे सर्वांना माहित आहे.
प्रश्न : मतदारांना काय आव्हान कराल?
उत्तर : बीड विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामे करण्यासाठी इथले सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी लोकांच्या मुलभूत गरजा त्यांना मिळवून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशिल असतो आणि भविष्यातही राहणार आहे. त्यासाठी मला विश्वास आहे, लोक माझ्या पाठीशी उभे राहतील आणि लोकांच्या सहकार्यातून मी या मतदारसंघात भविष्यात चांगले काम करेल.